January 16, 2017
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा या आठवड्यात शपथविधी होत असून, त्यांचा शपथविधी नव्या जागतिक समीकरणाची नांदी असेल, असे संकेत आहेत. आणि या नव्या समीकरणात भारत व पाकिस्तान हे शेजारी देश परस्परविरोधी गटातच राहणार आहेत.
चीन व रशिया हे जगातील दोन मोठे साम्यवादी देश. एका देशाने- रशियाने- साम्यवादाला झुगारले, तर चीनने साम्यवादाची भाषा बदलून टाकली. जगातील सर्वात जुने लोकशाही राष्ट्र अमेरिका व साम्यवादी हुकूमशाही असलेला चीन जवळ येत आहे असे वाटत असताना, ट्रम्प यांनी चीनविरुद्ध बिगुल फुंकला आहे. ओबामा राजवटीतच चीन-अमेरिका संबंधात काही गतिरोध निर्माण झाले होते. ट्रम्प यांनी तर उघडउघड चीनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. परराष्ट्र संबधात म्हणजे मुत्सद्देगिरीत एक शालीनता पाळली जाते. ट्रम्प यांनी मात्र थेट गावठी भूमिका घेत, चीनला विरोध करण्याचे ठरविले आहे.
नवी युती
जगात ‘कोल्ड वॉर’ म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात झाली ती रशिया व अमेरिका यांच्यात. सारे जग या दोन राष्ट्रांमध्ये विभागले गेले होते. केवळ आर्थिक संबंधच नाहीत तर लष्करी संबंध, क्रीडाजगत सारे काही या दोन राष्ट्रांच्या गटात विभागले गेले होते. दोन्ही गटांत नसणार्यां्नी एक तिसरा गट स्थापन केला होता, त्यात भारत आघाडीवर होता. शीतयुद्ध संपले, तिसरा गटही संपुष्टात आला. नवी समीकरणे तयार झाली. ट्रम्प सत्तेवर येत असताना जागतिक समीकरणांमध्ये मोठे बदल होत असून, रशिया-अमेरिका या दोन राष्ट्रांची एक घट्ट युती तयार होत असताना दिसत आहे. अमेरिकन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रशियाने, डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिटंन यांना अडचणीत आणणार्या काही ई-मेल लीक केल्या. त्याचा फायदा ट्रम्प यांना मिळाला. याचा बदला म्हणून मावळते राष्ट्रपती ओबामा यांनी अमेरिकेतील काही रशियन मुत्सद्यांविरुद्ध कारवाई केली. यावर रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी कोणतीही प्रतिकारवाई केली नाही. पुतीन-ट्रम्प यांच्यात किती सहकार्य व सलोखा आहे, याचा हा एक पुरावा मानला जातो.
रशिया-अमेरिका-भारत
अमेरिका-रशिया सहकार्य केवळ या दोन राष्ट्रांपुरते मर्यादित न राहता त्यात भारताचाही समावेश होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या मनोनित संरक्षणमंत्र्यांनी त्याचा संकेत दिला आहे. चीनवर दबाव ठेवण्यासाठी भारत उपयोगी ठरेल, असे अमेरिकेला वाटते.
चीन-पाकिस्तान यांच्यात घनिष्ठ संबंध तयार झाले असताना, त्याला प्रतिशह म्हणून ट्रम्प भारताचा वापर करू शकतात. ट्रम्प यांनी अद्याप सत्ता हाती घेतली नसतानाही त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय संबंधात उमटत आहेत. सत्तेवर आल्यानंतर ते काय काय करतील, याचा अंदाज कुणालाही करता आलेला नाही.
चीनने अमेरिकेचे एक द्रोण विमान पकडल्यानंतर ते परत करण्याची तयारी चीनने दाखविली होती. त्यावर ट्रम्प यांनी, ते द्रोण चीननेच ठेवून घ्यावे, आम्हाला परत करण्याची गरज नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
चीनला रोखणे
जगाच्या राजकारणात चीनचा दबदबा वाढू द्यायचा नाही, असे अमेरिका व रशियाचे धोरण असल्याचे दिसत आहे. चीनला आता रोखण्यात आले पाहिजे, असे प्रतिपादन ट्रम्पसमर्थक करीत आहेत. यासाठी वेळ पडल्यास भारताला मजबूत करावयाचे, असे या दोन्ही देशांचे धोरण दिसून येते. मधल्या काळात रशियाने भारताला थंड्या बस्त्यात टाकले होते. याचा परिणाम म्हणून रशियाने पाकिस्तानसोबत संयुक्त सैनिक कवायती सुरू केल्या होत्या. कारण, मधल्या काळात अमेरिका-भारत संबधात सुधारणा झाली होती. याचा परिणाम म्हणून अमेरिकेने पाकिस्तानशी आपले संबंध कमी करीत भारताशी आपले संबंध वाढविणे सुरू केले होते. आता ट्रम्प प्रशासन सरळसरळ पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेण्याची चिन्हे आहेत. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला खडसावणे सुरू झाले आहे. येणार्याच काळात पाकिस्तानवरील हा दबाव आणखी वाढविला जाईल. याचा परिणाम म्हणून पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ जाईल, असे मानले जाते. याचा अर्थ चीनचा पाकिस्तानला पाठिंबा, तर अमेरिका व रशियाचा भारताला पाठिंबा, असे समीकरण तयार होईल.
भारताचा फायदा
बदलत्या जागतिक घटनाक्रमातील भारताची एक चूक म्हणजे भारतीय अधिकार्यांाना अमेरिकेतील मतदारांचा कौल ओळखता आला नाही. अमेरिकेच्या निवडणुकीत हिलेरी क्लिटंन विजयी होणार, हे भारताने गृहीत धरले होते. ट्रम्प विजयी झाल्यानंतर त्यांच्या सल्लागारांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया भारताने सुरू केली. सध्याच्या स्थितीत भारताला ताकद देणे ही अमेरिकेचीच गरज असल्याने, याचा प्रतिकूल परिणाम भारत-अमेरिका संबधावर होणार नाही. या बदलत्या जागतिक स्थितीचा भारत आपल्या हितासाठी कसा व कितपत फायदा करून घेतो, हे येणार्याध काळात दिसेल.
दुधारी तलवार
लष्कर व निमलष्करी दलातील जवानांनी सोशल मीडियावर आपल्या तक्रारींचे व्हिडीयो टाकणे सुरू केल्याचे भयावह परिणाम होण्याची शक्यता विचारात घेऊन, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी तकडाफडकी कारवाई सुरू केली, हे योग्य झाले. वास्तविक असे व्हिडीयो टाकणार्यांलना तातडीने लष्करातून बरखास्त करण्यात आले पाहिजे. प्रसिद्धी व ब्लॅकमेलिंग तंत्राचा वापर हे जवान करीत आहेत. कोणतेही लष्कर अशा प्रकारे काम करू शकत नाही. लष्करात फार चांगल्या प्रतीचे भोजन दिले जाते. काही ठिकाणी गडबड असू शकते. पण, त्या स्थानिक गडबडींना मोठे करून जगात भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न हे जवान नकळतपणे करीत आहेत. सोशल मीडिया हे कसे दुधारी हत्यार आहे, हे यानिमित्ताने सिद्ध होत आहे. उत्तरप्रदेशात काही काळापूर्वी झालेल्या दंगली सोशल मीडियाचा प्रताप होता! सुरक्षा दळ-सरकारी कर्मचारी यांना आपल्या तक्रारींचे गार्हा्णे मांडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू दिल्यास कोणतेही सरकार काम करू शकणार नाही, कोणतेही सुरक्षा दळ काम करू शकणार नाही. यात प्रसिद्धिमाध्यमे अकारण प्रसिद्धी देत आहेत. यात प्रसिद्धिमाध्यमांनी स्वनियंत्रण पाळावयास हवे होते. टीआरपी मिळविण्याच्या वा वाढविण्याच्या नादात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे सर्व मर्यादा ओलांडू शकतात, हे यानिमित्ताने दिसून आले.
No comments:
Post a Comment