सैन्यामध्ये नाना बहाणे करून निरनिराळया ठिकाणी लोक पाठवून सैनिकांपर्यंत ते आपला हेतू पोहोचवत होते. ब्राह्मण, कीर्तनकार, प्रवचनकार, मुल्लामौलवी, फकीर असे निरनिराळे वेष धारण करून शेकडो क्रांतिदूत ते सैन्यात पाठवत होते.
nanasaheb peshwaब्रिटिश सत्ता रानटीपणाने न्याय-अन्याय न बघता भारतात सर्व ठिकाणी दडपशाही करत होती. शेतक-यांपासून संस्थानिकांपर्यंत सर्वत्र जुलूमशाहीचा रणगाडा फिरत होता. त्यातही मुख्य पिळवणूक आर्थिक होत होती. असे कित्येक संस्थानिक होते की, त्यांचे वारस मान्य न करता त्यांची संस्थाने ताब्यात घेतली.
संस्थानातली सगळी संपत्ती सरकारजमा केली. त्यांच्या तोंडावर निर्वाहापुरतं निवृत्तीवेतन देण्यात आलं. सैन्यात दडपशाही, न्यायालयीन चौकशीला नकार, केव्हाही अकारण बडतर्फी, भावनांचा अपमान अशी सर्व बाजूंनी गळचेपी होत होती. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी उचलली.
श्रीमंत नानासाहेब पेशवे हे दुस-या बाजीरावांचे दत्तक पुत्र होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना देण्यात येणा-या आठ लक्ष रुपयांच्या पेन्शनवर त्यांचा हक्क नाकारण्यात आला. त्याबरोबरच पेशवे म्हणून असणारे इतर सन्मानही ब्रिटिशांनी काढून घेतले. नानासाहेबांनी आपला एक हुशार वकील अजीमुल्लाखान याला विलायतेला पाठवलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
या स्वातंत्र्य युद्धासाठी बाहेरची राष्ट्रे काही मदत करतील का हे बघण्यासाठी त्यांनी वकिलाला रशियात पाठवलं. जागतिक राजकारणाचा अभ्यास आणि मुत्सद्दीपणा त्यांच्याजवळ होता. दिसण्यात अतिशय रुबाबदार आणि छाप पाडील असं सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ते विद्याशास्त्र संपन्न आणि युद्धशास्त्रातही पारंगत होते. उत्तम संघटन चातुर्य होतं. इंग्रज अधिक-यांना खिळवून ठेवणारं प्रभावी वक्तृत्व होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची प्रशंसा इंग्रज अधिकारीही करत.
इंग्रजांविरुद्ध संघटित उठावाची उभारणी ब्रह्मावर्तातच झाली. नानासाहेब कधी केवळ एका ठिकाणी बसून पत्रव्यवहार करत होते. कधी तीर्थयात्रेचे निमित्त काढून भाऊ आणि वकील यांच्यासह दिल्ली, अंबाला, सिमला, लखनौ, काल्पी व इतर अनेक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून आले. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात प्रेमाची, आदराची भावना होती.
सैन्यामध्ये नाना बहाणे करून निरनिराळया ठिकाणी लोक पाठवून सैनिकांपर्यंत ते आपला हेतू पोहोचवत होते. ब्राह्मण, कीर्तनकार, प्रवचनकार, मुल्लामौलवी, फकीर असे निरनिराळे वेष धारण करून शेकडो क्रांतिदूत ते सैन्यात पाठवत होते. सैनिकांची गरम डोकी अधिक भडकावीत होते.
ब्रिटिशांच्या अरेरावीचा आणि पारतंत्र्याचा गळा धरायला सैनिकांचे हात शिवशिवत होते. अत्यंत शांतपणे क्रांतीचा संदेश गावोगावी फिरत होता. पाषाणाच्याही पलीकडचे पाहू शकणारे शासकांचे डोळे किंवा तिखट कान या सर्वावर मात करेल असा प्रभावी प्रचार होता. चपात्या आणि लाल रंगाचं कमळ एवढीच प्रचारसाधने होती. इंग्रज अधिका-यांनी फुलाचा वास घेतला. चपातीची चव घेतली; पण त्यांना काहीच संशय येत नव्हता. अर्थात त्यांना तो संदेश पोहोचणं अपेक्षित होतं. तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचत होता.
नानासाहेबांच्या प्रयत्नामुळे दिल्लीचा बादशहा बहादूरशहा जाफर, बेगम झिनतमहक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूरचा महाराणा कुमारसिंहजी हे सर्व राजपुरुष जीवावर उदार होऊन हाती असलेल्या शस्त्रांसह एकदिलाने या क्रांतीला सिद्ध झाले होते. ३१ मे १८५७ ही उठावाची तारीख ठरली होती. पण मंगल पांडे या सैनिकाच्या अतिरेकी उत्साहामुळे एक महिना आधीच सर्व उठाव बरबाद झाला.
हातात शस्त्र धरून उठावाला सिद्ध झालेले क्रांतिकारी क्रांतिकारकांच्या मार्गाने जाऊन हुतात्मे झाले. रणरागिणी लक्ष्मीबाई गेली. रणशूर तात्या टोपे, ऐंशी वर्षाचे कुमार सिंहजी गेले.
शत्रूला सतत झुंजवत ठेवून आपल्या अतुल पराक्रमाची शर्थ करून शेवटी आपल्या सैन्यासह नानासाहेब नेपाळमध्ये गेले. नेपाळच्या राजाची मदत मिळावी, अशी अपेक्षा होती. पण ती सफल झाली नाही आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचा हा महान प्रणेता नेपाळातच अंतर्धान पावला. त्याचं नेमकं काय झालं हे आजपर्यंत अज्ञातच राहिलं
No comments:
Post a Comment