Total Pageviews

Sunday 22 January 2017

भारतीयांच्‍या हृदयातले नेताजी


प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर एखादा महामानव काळाच्या पडद्यावरून नाहीसा होतो. मात्र, त्यानंतर त्याचे जीवन लोकांना सातत्याने प्रेरणादायी ठरू शकते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या हयातीपेक्षाही निर्वाणानंंतरच्या काळात लोकांच्या चिंतनाचे, विचारांचे आकर्षण बनले. हे त्यांचे खरे मोठेपण होय... नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय राजकारणातील अतिशय धगधगते होमकुंड होते. स्वातंत्र्यलढ्याच्या यशामध्ये नेताजींचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. असीम त्याग, सेवा व समर्पण यांचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांच्या प्रखर देशभक्तीने आणि समर्पणामुळे भारतीय स्वातंत्र्याचा क्षण समीप आला. त्यांच्या तेजपुंज आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तोड नाही. ब्रिटिश राज्यकर्त्यांचा प्रखर विरोध असूनही नेताजींनी आपल्या युयुत्सू लढाऊ बाण्याचे दर्शन नेहमीच घडवले. साम्राज्यवादाशी अहर्निश लढा देऊन स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण त्यांनी जवळ आणला. नेताजी सुभाषचंद्र बोस नसते, तर भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण आणखी 20 वर्षे लांबला असता, असे मत इंग्लंडचे माजी पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केले होते. त्यावरूनच नेताजींच्या कार्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. नेताजींच्या कर्तृत्वाची साक्ष तत्कालीन कागदपत्रांवरून आणि त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथांतून प्रकट होते. आता नेताजींविषयीची कागदपत्रं पुढे आली आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक नव्या पैलूंचे दर्शन घडते आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांची नवभारताची दृष्टी याबाबत अनेक नवे पैलू समोर येत आहेत. त्यापैकी काही पैलूंचे दर्शन प्रस्तुत लेखात घडवले आहे. नेताजींच्या स्वप्नातील भारत कसा होता, तसा भारत घडवण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करावे लागतील यामागचे चिंतन या लेखात केले आहे. धगधगते होमकुंड नेताजी हे स्वातंत्र्यलढ्याचे धगधगते होमकुंड बनले होते. “ही धरती, आकाश आणि भूमी ही भारतमातेच्या मुक्तीसाठी जागृत झाली आहे. आजवर या भूमीने बराच विसावा घेतला. परंतु, ही भूमी आता एवढी जागृत झाली आहे की, ती आता मुक्तीच्या लढ्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’’ अशा स्वरूपाचा करारच जणू नेताजींनी केला होता. भारतीय युवाशक्तीला जागृत करण्याचे आणि युवाशक्तीला स्वातंत्र्याच्या मध्यवर्ती प्रवाहात आणण्याचे कार्य हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जितक्या प्रभावीपणे केले तितक्या प्रभावीपणे त्या काळात इतर कुणीही केले नाही. नेताजींनी योग्य वेळ येताच स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची स्थापना केली. जपानमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय जवानांना एकत्र करून त्यांच्या सहाय्याने ही सेना त्यांनी उभा केली. सुरुवातीला 3000 इतकी संख्या होती. परंतु, पुढे ही संख्या सातत्याने वाढत गेली. नेताजींचा जीवनपट असे सांगतो की, प्रखर बुद्धिमत्ता आणि प्रतिभाशक्ती हे त्यांचे महत्त्वाचे शक्तिस्थळ होते. महाविद्यालयीन जीवनात कोलकाता, कटक येथे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला, तरुणाईचे संघटन केले आणि प्रसंगी इंग्रजांशी लढा दिला. 1922 मध्ये पदवीधर झाल्यावर नेताजी आयपीएसीसी ही परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात ‘क्रॉनिकल’ या इंग्रजी दैनिकाने भारताविषयी लिहिलेल्या अपमानास्पद मजकुराविषयी त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. नेताजींचे हे यश विलक्षण होते. एकानंतर एक असे दोनवेळा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषवण्याचा विक्रम त्यांनी केला. लाहोर अधिवेशनात त्यांनी संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्यांनी संमत करून घेतला. त्यावेळी काँग्रेसमधील काही नेत्यांना टप्प्याटप्प्याने स्वराज्य घ्यावे, असे वाटत असे. परंतु, नेताजींचा असा आग्रह होता की, अंतिम स्वराज्य किंवा संपूर्ण स्वराज्य एकदाच घेतले पाहिजे, याविषयी त्यांचे गांधीजींशी मतभेद झाले; पण नेताजी आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी लाहोरमध्ये अखेर पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करून घेतला. गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. नेताजींच्या समग्र जीवनाचे तत्त्वज्ञान व त्यांची दूरदृष्टी पाहता त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताचे चित्र कसे होते, याबाबत विचार जरूर केला पाहिजे. नेताजींच्या जीवनावर पडलेले प्रभाव आणि त्यांची विकसित झालेली विचारधारा यांचा विचार करता काही महत्त्वपूर्ण बाबींची नोंद करावी लागेल. नेताजींच्या विचारांवर मजूर पक्षांच्या नेत्यांचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांचा कल इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या ध्येयधोरणांकडे होता. इंग्लंडप्रमाणे समाजवादी आणि कल्याणकारी ध्येयधोरणे हिंदुस्थानात राबवावीत, असा त्यांचा आग्रह होता. हुजूर पक्षाच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही. मजूर पक्षाचे नेतेच भारताला स्वातंत्र्य देऊ शकतील, हा नेताजींचा विश्‍वास अखेर खरा ठरला. लॉर्ड अ‍ॅटली पंतप्रधान असताना भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचा पर्वकाळ दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटणार आणि महायुद्ध सुरू होणार ही परिस्थिती भारतीय स्वातंत्र्यासाठी एक पर्वणीच आहे, असे नेताजींच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी जर्मनी, सोव्हिएत रशिया आणि जपानचा दौरा केला आणि आझाद हिंद फौज स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. नाझी जर्मनीमधील चित्र पाहून त्यांची निराशा झाली. परंतु, जपानकडून त्यांना भरघोस सहकार्याचे आश्‍वासन मिळाले. आपल्या देशातील दैन्य, दारिद्य्र दूर करण्यासाठी त्यांना रशियातील व्यवस्था त्या काळात प्रभावी वाटली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्याला संकटात टाकण्याची आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याची हीच संधी आहे, असे त्यांना वाटत होते. भारतामधील दारिद्य्र, आर्थिक विषमता आणि असमतोलाचे चित्र बदलण्यासाठी आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आखावा आणि गरिबी निर्मूलनासाठी दमदार पावले टाकावीत, असे त्यांचे मत होते. इंग्लंडमधील मजूर पक्षाची जशी प्रांतदर्शीय पुरोगामी धोरणे होती तशी धोरणे आपण स्वतंत्र हिंदुस्थानात लागू केली पाहिजेत, असा त्यांचा विश्‍वास होता. आध्यात्मिक प्रभाव कर्मवादाचा संदेश देणार्‍या भगवद्गीतेचा त्यांच्यावर आध्यात्मिक प्रभाव होता. गीतेतील अध्यात्म हे त्यांच्या राष्ट्रीय पुनर्रचनेतील एक प्रेरणास्थान बनलेले होते. ऐन तारुण्यात त्यांच्या विचारांवर स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारधनाचा प्रभाव पडलेला होता. स्वामी विवेकानंदांचे विश्‍वबंधुत्व, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि निरलस वृत्तीने समाजसेवा करण्याचे विचार त्यांना प्रेरणादायी वाटत होते. हिंदू समाजातील रूढी-परंपरा आणि विषमतेवर विवेकानंदांनी केलेली टीका त्यांना सामाजिक सुधारणेसाठी आवश्यक वाटत होती. लिओनार्ड गॉर्डन या इतिहासकाराच्या मते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाची बैठक ही भारतीय आध्यात्मिक परंपरेत दिसते. परंतु, या परंपरेतील नवतेचा विचार त्यांनी स्वीकारला आणि कालबाह्य झालेल्या रूढींचा त्याग केला, हेही महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक प्रेरणा हा त्यांच्या नेतृत्वाचा स्थायीभाव होता. नवसमाजाची रचना करताना परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भविष्यात भारताला संवर्धित करण्यासाठी, बलशाही बनवण्यासाठी लोकशाही हा जीवनाचा मार्ग ठरावा, हा त्यांचा विचार होता. लोकशाही विचाराने स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल व्हावी, अशी त्यांची दृष्टी होती. सर्वांनी एकजुटीने, सामोपचाराने, विचारविनिमय करून दारिद्य्र आणि विषमतेवर मात केली पाहिजे. त्यासाठी ठोस असा विकास कार्यक्रम आखला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. राष्ट्रीय पुरुषार्थांची जडणघडण करण्यासाठी त्यांनी सामाजिक राष्ट्रवादाची कल्पना उचलून धरली. बलशाली राष्ट्र म्हणून प्रगत लष्करी शिस्त अनुसरावी आणि एक राष्ट्र म्हणून जगात आपण बलाढ्य व बलशाली व्हावे ही त्यांची भूमिका होती. त्यांनी दिलेल्या ‘चलो दिल्ल्ली’ किंवा ‘जय हिंद’ या सर्व घोषणा तरुणाईमध्ये राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या होत्या. भारतीयांना भविष्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत आणि तेवढेच अद्ययावत असे शिक्षण दिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. शेती, उद्योग आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, याची त्यांना खात्री होती. सामाजिक ऐक्य, परस्पर सुसंगती, सुसंवाद आणि समर्पणाची भावना ठेवून सामाजिक सुधारणांचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे त्यांचे मत होते. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रगत आणि आधुनिक विचार जोपासून परिवर्तनाचे चक्र हाती घ्यावे लागेल, असा त्यांचा विश्‍वास होता. लोकशाही जीवनप्रणाली अधिक सर्वसमावेशक आणि अधिक व्यापक आणि परिवर्तन प्रक्रियेचा आधार कशी बनेल, यासाठी त्यांचे चिंतन सुरू होते. प्रगत जगाच्या तुलनेत भारत कधीही मागे राहू नये आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे सदैव जगाचे नेतृत्व करावे एवढ्या बलशाली भारताचे स्वप्न नेताजींनी पाहिले होते. नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 11 वेळा तुरुंगवास पत्करला. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणकाळापासून जपानमधील त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेताजी स्वातंत्र्यासाठी अव्याहत कार्यरत होते. नेताजींच्या जीवनातील दोन टप्पे महत्त्वाचे ठरतात. पहिला टप्पा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा जो कोलकाता आणि कटक इथे झालेल्या संस्करातून झालेला दिसतो. दुसरा टप्पा म्हणजे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील प्रथम श्रेणीतल्या नेतृत्वाचा होता. 1937 ते 40 काळातही दोनवेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करून घेतला. पुढे स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाची गरज ओळखून त्यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्यांच्या आयुष्यातील दुसर्‍या टप्प्याची सुरुवात होते 1941 पासून. 1941 ते 1946 या काळात ते जर्मनीत वास्तव्यास होते. तेथील एकूण परिस्थितीचे साक्षीदार होते. त्यानंतर ते जपानला गेले आणि तिथे जाऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ही फौज इंफाळपर्यंत येऊन थडकली आणि रंगून इथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. ब्रिटिशांना स्वातंत्र्यासाठी कोंडीत पकडण्याची हीच वेळ आहे, हे लक्षात घेऊन नेताजींनी जागतिक पातळीवर घडवलेले संघटन, दाखवलेले चातुर्य यामुळे भारतीय स्वातंत्र्य समीप आले, असे म्हणता येईल. समारोप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत खरोखर उभारायचा असेल, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणावा लागेल. राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर करावे लागेल. तसेच शेती, उद्योग आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या क्षेत्रात अद्ययावत प्रगतीचा टप्पा गाठावा लागेल. आपल्या आर्थिक विकासाला आध्यात्मिक ध्येयांची जोड द्यावी लागेल. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात मेळ घालून प्रगत जगाला नवे नेतृत्व देण्याची क्षमता दाखवावी लागेल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीतील समाजसत्तावादी विचारधारा, त्यांचे सांस्कृतिक अधिष्ठान या दोन्ही बाबी 21 व्या शतकात भारताची वाटचाल होण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. एखादा महामानव काळाच्या पडद्यावरून नाहीसा होतो. मात्र, त्यानंतर त्याचे जीवन लोकांना सातत्याने प्रेरणादायी ठरू शकते. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या हयातीपेक्षाही निर्वाणानंंतरच्या काळात लोकांच्या चिंतनाचे, विचारांचे आकर्षण बनले. हे त्यांचे खरे मोठेपण होय. इतिहासातील प्रत्येक शाश्‍वत असतो, चिरंतन असतो, तेवढाच तो गतिमान असतो. नेताजींनी कालचक्राच्या प्रवाहावर उमटवलेला ठसा म्हणजेच त्यांचे नवभारताचे स्वप्न होय. ते स्वप्न साकारण्यासाठी जो कोणी महानायक प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, त्याला नेताजींच्या विचारांचे परिशीलन करून पुढे वाटचाल करावी लागेल. गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘फळाची आशा न धरता कार्य करत राहणार्‍या युगपुरुषाची गरज आहे’. ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः’ म्हणजेच माणसाचे शरीर नश्‍वर असले, तरीही त्याचा आत्मा अमर आहे, असे गीतेचे तत्त्वज्ञान सांगते. नेताजींच्या विचारांचे खरे अमरत्व हे त्यांच्या याच क्रांतिदर्शी विचारांत आहे.

No comments:

Post a Comment