Total Pageviews

Thursday 19 January 2017

चीनला धडा शिकवण्यासाठी... ऐक्य समूह


Tuesday, January 17, 2017 AT 11:33 AM (IST) Tags: st1 आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगतीत अडथळा आणतानाच पाकिस्तान तसेच नेपाळशी हातमिळवणी करून भारताला शह देण्याच्या प्रयत्नांवरून चीनकडून भविष्यात धोका असल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वरभूमीवर चीनचा संपूर्ण भूभाग व्याप्तीत येईल अशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने घेतली. त्यापुढील टप्पा म्हणून आशिया-प्रशांत टापूत चीनला शह देण्यासाठी ‘आकाश’ क्षेपणास्त्र व्हिएतनामला देण्याची तयारी भारताने दर्शवली आहे चीनने 1962 मध्ये केलेला विश्वापसघात ही भारताची पुढे काही वर्षांपर्यंत भळभळत राहिलेली जखम होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना या हल्ल्याने व्यक्तिशः जबरदस्त धक्का बसल्याचेही अनेक वेळा सांगितले जाते. एकीकडे ‘भारत-चिनी भाई-भाई’ अशी घोषणा देत चीनने भारताच्या नवजात स्वातंत्र्याच्या पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केल्याची आठवण भारतीय विसरलेले नाहीत. साहजिक त्यानंतर चीनने घेतलेला खास मित्राचा बुरखा फाटला आणि भारताचा कुटील शत्रू असे वेगळेच स्थान चीनला लाभले ते आजतागायत. म्हणूनच चीनच्या प्रत्येक कृतीचा आणि धोरणाचा भारतात बारकाईने अभ्यास केला जातो. चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यांच्या दहशतवाद्यांचे समर्थन केले. त्यानंतर नुकताच नेपाळसह संयुक्त कवायतींचा मनसुबा जाहीर केला. या पार्श्विभूमीवर व्हिएतनामला ‘आकाश’ हे क्षेपणास्त्र देऊ करून चीनच्या हालचालींना आळा घालण्याचे आणखी एक पाऊल भारताने उचलले आहे. हे क्षेपणास्त्र संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. ते मिळाल्यामुळे व्हिएतनामच्या ताकदीत मोठीच वाढ होणार आहे. जपान आणि व्हिएतनाम यांच्याशी चीनचे संबंध चांगले नाहीत. म्हणूनच या दोन देशांशी आपले संबंध अधिक बळकट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आण्विक पुरवठादार गटात समावेश होऊ नये म्हणून चीनने सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिवाय जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझरलाही संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून घोषित करू नये यासाठीही चीनने कंबर कसली आहे. याचा अर्थ चीनने भारताला उघड उघड आव्हान देण्याचं धोरण स्वीकारले आहे. म्हणूनच भारताचे हे प्रयत्न चीनचे नाक दाबणारे आहेत. चीनचे वाढते वर्चस्व सध्या चीन आणि व्हिएतनाम यांच्यात लष्करी संघर्ष घडण्याचा धोका वाढत आहे. 2011 पासून उभय देशांनी दक्षिण चिनी समुद्रावर दावे केल्यापासून त्यांच्यात जोरदार वितुष्टाची ठिणगी पडली आहे. या समुद्राचा 90 टक्के भाग हा आपला आर्थिक विभाग असल्याचा दावा चीनने केला आहे. शिवाय विवादास्पद क्षेत्रातील तेल काढण्यासाठी त्यांनी अनेक वेळा बोटी पाठवल्या. वादग्रस्त पॅरासेल बेटांचा काही भूभागही त्यांनी बळकावला आहे. तसेच संभाव्य लष्करी वापरासाठी त्यांनी तिथे काही तळांचे बांधकामही केले आहे. याच भागातून तेलावर मालकी हक्क सांगण्यासाठी व्हिएतनामनेही तेल काढण्याचे प्रयत्न केले असून त्यांची चिनी बोटींशी टक्करही झाली आहे. व्हिएतनामने अमेरिकेशी निकटचे लष्करी संबंध जोपासले आहेत. तसंच फिलिपिन्स आणि भारताशीही त्यांनी या दृष्टिकोनातूनच मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. आग्नेय आशियावर प्रभाव टाकण्यासाठी व्हिएतनाम आणि चीन स्पर्धा करत आहेत. 1970 ते 2000 या कालखंडात यात व्हिएतनामचीच सरशी झाल्याचे दिसते. या परिसरातील अनेक देशांमध्ये चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. शिवाय म्यानमार, कंबोडिया, थायलंड आणि लाओस यांच्याशी लष्करी भागीदारीही केली आहे. व्हिएतनाम आणि चीन या दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेत मोठीच वाढ होत असल्याने या स्पर्धेला आणखी धार चढली. व्हिएतनामशी संघर्ष दक्षिण चिनी समुद्रात नैसर्गिक वायूचा सुमारे 290 ट्रिलियन घनफूट साठा असावा, असा अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हेचा अंदाज आहे. याखेरीज तिथे माशांचीही मोठीच पैदास होते. जगातील दहावा भाग मासळी उत्पादन या भागातून येते. 2014 मध्ये व्हिएतनामने दावा केलेल्या सागरी प्रदेशात चीनने तेल उत्खननासाठी आपली जहाजे पाठवली. त्यावेळी तर व्हिएतनाममध्ये चीनविरोधी दंगे उसळले होते. त्यानंतर या दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले असले तरी दोन्ही देशांचे नेते समोरासमोर आल्यावर परस्परांकडे पाहणेही टाळत होते; एवढा तणाव त्यांच्या दरम्यान पसरला होता. मात्र चीनने त्यानंतरही असे प्रकार सुरू ठेवले आणि व्हिएतनामनेही त्यांना प्रत्त्युत्तर देण्याचे सत्र सुरू ठेवले. त्यामुळे सध्या या दोन्ही देशांदरम्यानच्या सागरी क्षेत्रात तणावपूर्ण शांतता आहे. 2011 मध्ये या संदर्भात करण्यात येणारा सामंजस्य करारही एकमत न झाल्याने तसाच भिजत पडला. त्याऐवजी सर्वसामान्य मार्गदर्शक सूचनांवर सह्या करण्यात आल्या. या पार्श्व भूमीवर व्हिएतनाम करत असलेल्या पाणबुड्यांच्या खरेदीला आणि घेत असलेल्या प्रशिक्षणाला अतीव महत्त्व आहे. याखेरीज चीन-व्हिएतनाम भूसीमेवरही 2014-15 मध्ये तणाव वाढला आहे. या दोन वर्षांमध्ये तिथे किमान दोन वेळा चकमकी झडल्या आहेत. मेकाँग नदीवरूनही या दोन्ही देशांमध्ये वाद आहेत. सीमारेषेच्या वादातून 1979 मध्ये या दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित युद्धही झाले होते. दोन्ही देशांमधील संतप्त जनभावनांची दखलही दोन्ही देशांच्या नेत्यांना घ्यावी लागत असल्यामुळे व्हिएतनामने अधिकाधिक शस्त्रसज्ज होण्याचा मार्ग अवलंबला आहे. चीनने पाकिस्तानला अधिकाधिक मदत करून भारताला शह देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवले आहेत. भारताची व्यूहरचना या पार्श्वयभूमीवर भारताने व्हिएतनामला हेलिकॉफ्टर आणि ड्रोन देण्याची आणि त्याबरोबरच ब्राह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र आणि वरुणास्त्र हा अग्निबाण देण्याची तयारीही दर्शवली आहे, ही बाब महत्त्वाची ठरते. या शिवाय यंदापासून व्हिएतनामच्या वैमानिकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. भारताचे सुखोई-30 एमकेआय हे लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याने या प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे. या इतर सहाय्यामुळे व्हिएतनामच्या युद्धकौशल्यात चांगलीच भर पडणार आहे. व्हिएतनाम हे भारताचे निकटचे मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे लष्करी संबंध अधिक बळकट करून चीनला शह देणे ही भारताची व्यूहरचना नक्कीच यशस्वी ठरेल. भारताने आपल्याला ‘आकाश’ क्षेपणास्त्राबरोबर त्याचे तंत्रज्ञानही द्यावे अशी व्हिएतनामची मागणी असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात फक्त क्षेपणास्त्रेच दिली जाणार आहेत. या क्षेपणास्त्रांचे संयुक्त उत्पादन करण्याची व्हिएतनाम सरकारची इच्छा आहे परंतु भारताने या टप्प्यावर तशी तयारी दर्शवलेली नाही. त्यावर विचार करण्याचे आश्वापसन दिले आहे. तंत्रज्ञान देण्याविषयीही सांगोपांग विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. याखेरीज पंतप्रधान मोदींनी व्हिएतनामला पाच दशलक्ष डॉलर कर्ज देण्याची योजना जाहीर केली होती. तिच्यावरही चर्चा होणार आहे. क्षेपणास्त्रांचे हस्तांतर करणे ही बाब मात्र प्रत्यक्षात तितकी सोपी नसते. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या हस्तांतराविषयी भारताला हा अनुभव येणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर आहे. रशियाच्या मदतीने हे क्षेपणास्त्र विकसित केले जात आहे आणि या क्षेपणास्त्रासाठी लागणारी सुमारे 60 टक्के सामग्रीही रशियाकडूनच आयात केली जाते. गेली तीन वर्षं व्हिएतनामच्या सैनिकांना भारताकडून ‘किलोक्लास’ या श्रेणीतील पाणबुड्यांसंबंधीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नेव्ही सबमरिन स्कूलमध्ये ‘आयएनएस सातवाहन’ आणि ‘विशाखापट्टण’वर व्हिएतनामी नौसैनिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय व्हिएतनामने किलोक्लास श्रेणीतील पाणबुड्यांची आणि सुखोई विमानांची रशियाकडून खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. व्हिएतनाम लष्करीदृष्ट्या अधिक सक्षम बनेल, तेवढी चीनला आपल्या सुरक्षिततेची अधिक काळजी करावी लागेल आणि शेजारी देशांना उपद्रव देणे कमी करावे लागेल यात शंका नाही. - ले. जन. दत्तात्रय शेकटकर

No comments:

Post a Comment