January 18, 2017024
लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते त्या पोलिसांच्या मन:स्थितीचा फारसा कुणी विचार करीत नाहीत. अनेकदा मानसिक तणावाला कंटाळून पोलिस कर्मचारी स्वत:च्याच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या करतात. वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, पोलिस कर्मचार्यांची कमतरता, कौटुंबिक समस्या, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, घरापासून कित्येक महिने लांब राहिल्याने निर्माण झालेल्या अडचणी, निवासाची समस्या, अतिरिक्त कामाचा बोझा आणि न मिळणारी विश्रांती, यामुळे दिवसागणिक पोलिसांवरील तणाव वाढत आहे. देशभरातील पोलिसांच्या एकूणच आकडेवारीवर नजर टाकल्यास, संपूर्ण देशातील पोलिस दलासाठी २२ लाख ६३ हजार जागांना मंजुरी आहे. मात्र, त्यापैकी अद्यापही ५ लाख जागा रिक्त आहेत. केवळ सुटी मिळाली नाही, म्हणून अनेक जवानांनी वरिष्ठाला गोळ्या घालून ठार मारले आहे. या साखळीतील ताजी घटना म्हणजे, बिहारमधील औरंगाबादची. सुटी मिळाली नाही म्हणून एका जवानाने चार सहकार्यांवर गोळ्या झाडून ठार मारले व आपला राग व्यक्त केला. याचे कारण, अपुरी संख्या. ही संख्या वाढविण्याची तातडी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिसांची पदे रिक्त असल्याने जे पोलिस दल सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोझा वाढतो आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट होऊन मानसिक तणावाखाली देशातला पोलिसवर्ग जगत आहे. महाराष्ट्रातील पोलिस दल तत्कालीन गृहमंत्री दिवगंत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वात सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. सध्या पोलिस दलाची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यांनी पोलिसांच्या अडचणी, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मुंबई शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अहोरात्र झटणार्या पोलिस कर्मचार्यांचा ताण मात्र कमी झालेला नाही. त्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष द्यावे लागेल. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिस दल अधिक कार्यक्षम असल्याचे सांगितले जाते. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार्या पोलिसांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी समाजातील लोकांनीसुद्धा आपली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment