भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केले होते
लोकसत्ता ऑनलाइन | January 28, 2017 7:23 PM
वाजपेयींच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा; हवाई दलाने उडवले होते पाकिस्तानी बंकर
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २००२ मध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. मात्र ती संपूर्ण कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळेच ती कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि जवानांना सरकारकडून कोणतेही पदक देण्यात आले नाही. ‘हफिंग्टन पोस्ट’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. २००२ मध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा यांनी केले होते. त्यावेळी मिश्रा २९ वर्षांचे होते. ज्यावेळी मिश्रा यांना कारवाईची तयारी करण्यासाठी बोलावण्यात आले होते, त्यावेळी त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यासोबत कारवाईत आणखी दोघांचा सहभाग होता.
२००२ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते, तर जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. २००२ च्या जून महिन्यात हे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही देशांना समजवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र यामध्ये पुतीन यांना अपयश आले होते.
आधी लष्करी हल्ल्याची योजना होती
भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानात घुसून हल्ला करतील, अशी पहिली योजना होती. मात्र त्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख सुंदरराजन पद्मनाभन यांनी ही योजना रद्द केली. यानंतर हल्ल्याची योजना बदलण्यात आली आणि पाकिस्तानवर जमिनीवरुन हल्ला करण्याऐवजी हवाई मार्गाने कारवाई करण्याची योजना निश्चित करण्यात आली.
या कारवाईची वाच्यता कुठेही केली जाणार नाही, हे त्यावेळी ठरवण्यात आले होते. या कारवाईबद्दल कोणीही भाष्य करणार नाही, असेदेखील निश्चित करण्यात आले होते. पश्चिमेकडील सीमेवरील सर्व हवाई तळांना पाकिस्तानच्या प्रत्युत्तरासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या कारवाईसाठी जवानांच्या पथकाने १ ऑगस्टला श्रीनगरसाठी कूच केले होते.
असा झाला होता हल्ला
सर्वात आधी हेलिकॉप्टरच्या मदतीने दोन जवानांना श्रीनगरमधील सीमेवर पाठवण्यात आले. त्यानंतर हे जवान सीमा पार करुन पाकिस्तानात गेले. पाकिस्तानी बंकर्सचा ठावठिकाणा हवाई दलापर्यंत पोहोचवण्याचे काम या जवानांकडे होते. लेजर गाईडन्स सिस्टमच्या आधारे जवानांनी हवाई दलापर्यंत पाकिस्तानी बंकर्सची माहिती हवाई दलापर्यंत पोहोचवली. यानंतर फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा आणि त्यांच्या टिमने कुपवाडा सेक्टरमधील पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त केले.
या हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, याबद्दलची माहिती हफिंग्टन पोस्टने दिलेली नाही. मात्र २००२ मधील सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्याचा विचार पाकिस्तानने केला नाही. अटल बिहारी वाजपेयी सरकार सर्जिकल स्ट्राइकची कारवाई गुप्त राखण्यात यशस्वी ठरले. हवाई दल आणि तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला. मिश्रा आता निवृत्त झाले असून ते व्यावसायिक वैमानिक आहेत.
No comments:
Post a Comment