नौदलाच्या पाणबुड्या व युद्धनौकांचे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. दुरुस्ती-देखभाल आणि आधुनिकीकरणासंबंधीचे निर्णय तत्परतेने घेण्याची गरज आहे.
"जे आकाशात उडते ते जमिनीवर येतेच; पण जे समुद्रात बुडते ते वर येईलच असे सांगता येत नाही.''
नौदलाच्या "वीरबाहू' या पाणबुडी तळावरचे हे पोस्टर खूप बोलके आहे. पाणबुडीवर काम करताना किती मोठी जोखीम उचलावी लागते, याचीही कल्पना त्यावरून येते. भारतीय नौदलाच्या "सिंधुरत्न' या पाणबुडीला अपघात होऊन दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पाणबुड्या आणि त्यांची सद्यःस्थिती हा अगदी "तळा'शी गेलेला विषय चर्चाविश्वाच्या पृष्ठभागी आला आहे. परंतु या अपघातातून काही धडा आपण शिकलो असू आणि त्याप्रमाणे उपाय योजणार असू, तरच या मंथनाचा उपयोग आहे.
पाणबुड्यांवर काम करणाऱ्या नौसैनिकांना हवाई दलातील वैमानिकांप्रमाणे जोखीम भत्ता मिळतो; परंतु दोन्हीतील फरक असा, की हवाई दलात पायलट नेव्हिगेटर्सना प्रामुख्याने धोका असतो. पाणबुडीतील सर्वांनाच धोक्यांचा सामना करावा लागतो. पाण्याखाली असताना Sonar (प्रतिध्वनीच्या साह्याने पाण्याखालील वस्तूचा ठाव घेणारे उपकरण) किंवा तत्सम उपकरणावर अवलंबून राहावे लागते. पाणबुडीला खिडक्या नसतात. बॅटरीमधून हायड्रोजन (स्फोटक गॅस), क्लोरिन (विषारी गॅस) निघत असतो. अग्निशमन करण्यासाठी "फ्रिऑन' नावाचा वायू वापरला जातो. तोही धोक्याचाच असतो.
पाणबुडीत अगदी कॅप्टनसह सर्व नौसैनिक एकच जेवण घेतात. इतकेच काय, सर्वजण एकच स्वच्छतागृह वापरतात. तसेच ते समुद्रात जातात तेव्हा कोणालाच अंघोळ करता येत नाही. कारण तेवढे पाणीच उपलब्ध नसते. पाण्याखाली असताना शौचास जाणे हीसुद्धा अत्यंत "टेक्निकल' गोष्ट असते. एकच उदाहरण देतो. 1944 मध्ये जर्मनीची पाणबुडी U1206 च्या कॅप्टन शिल्टझ याने शौचालय वापरावयाच्या कृतीत चूक केली आणि पाणी, घाण बाहेर जाण्याऐवजी आतच उडाली व बॅटरीत गेली. बॅटरी दुरुस्तीसाठी पाणबुडी पाण्यावर आणावी लागली व दुर्दैवाने मित्रराष्ट्रांच्या विमानाने हल्ला करून तिला बुडविले.
1977 मध्ये मी कलवरी क्लासच्या "खंदेरी' पाणबुडीवर इन्चार्ज होतो. इंजिनमध्ये अर्धवट ज्वलन होऊ लागले. धुराबरोबर कार्बन मोनोक्साईड हा विषारी वायू तयार होऊ लागला व एक्झॉस्ट फ्लॅप बिघडल्याने धूर सातव्या कंपार्टमेंटपर्यंत जाऊ लागला. सात नौसैनिक चक्कर येऊन पडले. त्यांना उचलून तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये नेले, की तेथील शुद्ध हवेने ते ताजेतवाने होत. पण एकेकाला उचलून तिकडे नेणे ही मोठीच कसरत होती. हे सर्व एवढ्यासाठीच नमूद केले, की नौसैनिक कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची कल्पना यावी. अपघात प्रतिबंधाच्या उपाययोजनांची चर्चा करताना तशी ती येणे आवश्यक आहे.
""सिंधुरक्षक'' ही पाणबुडी मुंबई बंदरात स्फोट होऊन बुडाली. त्यापाठोपाठ ""सिंधुरत्न'' पाणबुडीला अपघात होऊन दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नौदलप्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला व तो तडकाफडकी मंजूर झाला. गेल्या सात महिन्यांत दहा अपघातांत नौदलाच्या युद्धनौका व पाणबुड्यांचे नुकसान झाले. त्याआधी फेब्रुवारी 2011 मध्ये ""विंध्यगिरी'' ही तीन हजार टनांची युद्धनौका जर्मन व्यापारी जहाजाशी टक्कर होऊन मुंबई बंदरात बुडाली. एकूणच हे अपघात रोखण्यासाठी योग्य ती पावले न उचलल्यास नौदलाच्या कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्य खालावेल. तसे होता कामा नये. भारतीय नौदलात जर्मन बनावटीच्या ""शिशुमार'' क्लासच्या चार पाणबुड्या आहेत. त्या ""हंटर किलर'' आहेत. म्हणजे त्यांचे काम शत्रूच्या पाणबुड्यांना बुडविणे आहे. तसेच रशियन बनावटीच्या ""सिंधुघोष'' प्रकारातील नऊ पाणबुड्या आहेत. 290 कि.मी. अंतरावर मारा करता येतील अशी "क्लब' मिसाइल्स त्यावर आहेत. "सिंधुघोष'च्या नऊपैकी आठ पाणबुड्या जुन्या झाल्या आहेत. आता सर्व पाणबुड्यांची, त्यातील उच्च तांत्रिक उपकरणांची काळजीपूर्वक तपासणी करून, ज्या पाणबुड्या समुद्रात जाण्याच्या अवस्थेत नसतील, त्यांना बाहेर काढले पाहिजे. गेल्या चौदा वर्षांत आपण एकही पाणबुडी नव्याने विकत घेतलेली नाही किंवा बनविलेली नाही. आहे त्याच पाणबुड्यांकडून काम भागविण्याच्या वृत्तीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. "सिंधुघोष' प्रकारच्या पाणबुड्या इराणकडेही आहेत व त्यांना "हटॅन्डर्ड' या भारतीय कंपनीने बॅटरी दिल्या आहेत. त्यांना समस्या उद्भवत नाही, याचे कारण ते त्या योग्यवेळी बदलतात. प्रगत देशांतही अपघातात पाणबुड्या बुडतात; पण ते देश त्या घटनेचा सखोल अभ्यास करतात, पूर्ण कार्यप्रणाली सुधारतात आणि अपघाताची पुनरावृत्ती होऊ देत नाहीत. त्या वृत्तीचे आपण अनुकरण केले पाहिजे.
संरक्षण मंत्रालयात निधी देण्याची निर्णयक्षमता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यात व संरक्षण दलात "ताळमेळ' दिसत नाही. म्हणूनच असे वाटते, की ज्या वेळी एखादी पाणबुडी सज्ज होऊन समुद्रात पाठवली जाते, तेव्हा सर्व संबंधित मुलकी, तसेच दुरुस्ती-देखभाल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणबुडीबरोबर पाठवून तेथील परिस्थितीचा थोडा तरी अनुभव दिला पाहिजे. तसा तो दिल्यास निधी देण्याबाबत जास्त योग्य निर्णय ते घेऊ शकतील आणि त्यातील तातडीही त्यांना कळेल. कारण शेवटी "ज्याचे जळते त्याला कळते', हेच खरे. हवेत, पाण्यात वा जमिनीवर आपल्या जवानांनी अतुलनीय शौर्य गाजविले आहे; पण "सरकारी टेबला'पुढे मात्र त्यांचे काही चालत नाही, हे दुर्दैवी चित्र बदलायलाच हवे.
जुन्या पाणबुड्यांची जागा नवीन पाणबुड्यांनी घेणे महत्त्वाचे. दुरुस्तीच्या व आधुनिक पायाभूत संरचना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. दहा ""सिंधुघोष'' पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये आपण खर्च केले. एवढा निधी भारतात खर्च केला, तर व्यापक पायाभूत संरचना निर्माण करता येईल. उत्तम प्रशिक्षण केलेल्या लोकांकडून पाणबुड्यांची व युद्धनौकांची देखभाल केली तर सुरक्षितता निश्चितच वाढेल.
आराखडा, बांधणी, प्रशिक्षण व देखभाल यांचा योग्य व अद्ययावत पद्धतींचा अभ्यास सातत्याने केला पाहिजे. आपल्याकडील "निरीक्षक' नावाचे जहाज फक्त 150 मीटरपर्यंत खोल बुडालेल्या पाणबुडीला वर काढू शकते. अमेरिकेकडून "डीप सी रेस्क्यू व्हेसल'(DSRV) घेतल्यास दुर्घटनाग्रस्त पाणबुडी बाहेर काढण्याची व्यापक क्षमता प्राप्त होईल. शांतता काळातील अपघात फारच क्लेशकारक असतात. ते रोखलेच पाहिजेत. जगातील सर्वांत सुरक्षित नौदल असा लौकिक पुन्हा प्राप्त करण्यासाठी आता दृढविश्वास व कठोर परिश्रमांची गरज आहे. कवीने म्हटल्याप्रमाणे "आली जरी कष्टदशा अपार, न सांडिती वीर कदापि थोर.' त्या जिद्दीने पुन्हा उभे राहिले पाहिजे
No comments:
Post a Comment