इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) म्होरक्या यासीन भटकळच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये पुण्यातील काही व्यक्ती हत्यारे बनविण्याचे काम करत असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. गेली आठ वर्षे या 'साथीदारां'ची साधी कुणकुणही दहशतवादविरोधी पथक; (एटीएस) तसेच देशभरातील तपासयंत्रणांना लागली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या 'साथीदारां'चा अन्य कोणत्या स्फोटांमध्ये हात आहे काय, यापुढील काळात त्यांनी देशभरात आणखी कोणत्या हल्ल्यांचा कट रचला आहे काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता तपास यंत्रणांपुढे आहे.
यासीनने २००४ मध्ये 'जिहाद' पुकारून भटकळमध्ये हत्यारे बनविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी रियाझ भटकळने त्याला ४० हजार रुपयांची मदती दिली. या मदतीच्या आधारे त्याने 'अल्-हादीथ' नावाचे वर्कशॉप सुरू केले होते. हे वर्कशॉप तेथील एका रेसिडेन्सिअल कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती यासीननेच 'एटीएस'ला तपासादरम्यान दिली. यासीनच्या अटकेनंतर 'आयएम'चा प्रमुख रियाझ भटकळ आणि यासीनचे पुण्यातील 'कनेक्शन' उघड होवू लागली आहेत. जर्मन बेकरी स्फोटासाठी स्फोटके पुरविणारा इब्राहिम, कातिल सिद्दिकीचा पुण्यातील नातेवाइकांबरोबरच यासीनच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपैकी ४० वर्षीय नासीर भाई बेपत्ता असल्याने यत्रणांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी यासीनला 'एटीएस'ने अटक केली असून, त्याला कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. यासीनचे पुण्यातील वास्तव्य आणि त्याचे पुण्यातील 'काँटॅक्ट' आदींबाबत त्याच्याकडे कसून तपास करण्यात येत आहे. पुण्यातील नासीरभाई आपल्या वर्कशॉपमध्ये काम करीत होता. छोटी-मोठी कामे करतानाच तलवारी, चाकूही तयार करण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केल्याचे यासीनने सांगितले.
भटकळ शहराला जातीय दंगलींची पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी वारंवार दंगली होत असल्याने तरुणांना भडकवण्यासाठी त्यांच्या हातात हत्यारे देण्यासाठी हे वर्कशॉप सुरू केल्याचे यासीनने सांगितले. रियाझच्या सांगण्यानुसार २००४ च्या अखेरीला यासीन शारजाला गेला होता. तेथून त्याला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी जायचे होते. मात्र, काही कारणांमुळे तो पाकिस्तानात पोहोचू शकला नव्हता. तो पुन्हा भटकळ येथे परतला तेव्हा नासीर भाई भटकळमधून पुण्यात परतला होता, असेही त्याने तपास यंत्रणांना सांगितले आहे.
पुण्यातून हवाला
सुरत-अहमदाबाद येथील स्फोटांनंतर तपास यंत्रणा रियाझ, यासीन आणि इक्बाल भटकळचा माग काढत होत्या. तिघेही देशभर लपत फरत होते. दिल्ली, लखनौ असे फिरत असतानाच रियाझ आणि यासीन पुन्हा पुण्यात परतले. कातिलचा एक बबलू नावाचा नातेवाइक तेव्हा पुण्यात होता. 'आयएम'चा दुबईतील हस्तक आफिफने बबलूच्या नावे हवालामार्गे दोन लाख रुपये पाठवले. बबलूने हे पैसे यासीन आणि रियाझला दिले. या पैशांच्या जोरावरच रियाझ पाकिस्तानला पळून जाण्यात यशस्वी ठरला.
No comments:
Post a Comment