अर्थमंत्रालय आणि संरक्षण खात्यात युद्धाचा भडका
एवढा पैसा दिला तो गेला कुठे?
युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या देखभालीत अक्षम्य दुर्लक्ष होतेय!
चिदंबरम यांचा ऍण्टोनींवर हल्ला
नौदलाचे ग्रह फिरले...
आयएनएस कोलकातात वायूगळती!
माझगाव डॉकमध्ये घबराट
नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था ) - संरक्षण मंत्रालयाला पैसा कमी पडतोय अशी ओरड का करता? एवढा पैसा दिला तो गेला कुठे? माझं तर ठाम मत आहे, युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय, असा जबरदस्त हल्ला अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी यांच्यावर चढवला. नौदलाच्या पाणबुड्यांना होणार्या अपघातांमुळे अर्थ मंत्रालय आणि संरक्षण खात्यातच युद्धाचा भडका उडाल्यासारखी स्थिती आहे.
चिदंबरम यांनी आयएनएस ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला झालेल्या ताज्या अपघाताचा यावेळी उल्लेख केला. पाणबुड्यांच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य बेफिकिरी दाखवली जात असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, ‘सिंधुरत्न’च्या अपघातामागील कारणे चौकशीतूनच उलगडतील, पण मी स्वत: जो अहवाल वाचला त्यावरून पाणबुड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मला कळून चुकले आहे. संरक्षण खात्याला पुरेसा निधी मिळत नाही, ही संरक्षण मंत्री ऍण्टोनी यांची ओरडही साफ खोटी असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. आपल्या अर्थ मंत्रालयाने संरक्षण खात्याला २.२५ लाख कोटींचा निधी दिला आहे असे सांगून ते म्हणाले की, हा निधी बर्यापैकी मोठा आहे.
नौदल अधिकार्याचा गुदमरुन मृत्यू
मुंबई : हिंदुस्थानच्या नौदलाचे ग्रहच फिरलेत. ‘आयएनएस सिंधुरत्न’ पाणबुडीमध्ये स्फोट होऊन दोन अधिकारी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच नौदलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार्या ‘आयएनएस कोलकाता’ या विनाशिकेवर शुक्रवारी प्रचंड वायुगळती झाली. इंजिन रूममध्ये कार्बनडायऑक्साइड वायू कोंडला. यात नौदल कमांडर कुंदल वाधवा (४२) यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर डॉकमधील कर्मचारी असलम काझी (५१) हे जखमी झाले.
कशी झाली वायुगळती
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार्या ‘आयएनएस कोलकाता’ या विनाशिकेवर शुक्रवारी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये परीक्षण आणि चाचण्या सुरू असतानाच तेथील कार्बन-डाय-ऑक्साईडचा मोठा सिलिंडर खाली पडला आणि वायुगळती होऊन एका नौदल कमांडरचा गुदमरून मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. या दुर्घटनेचा आंखों देखा हाल चौकशी करणार्या मुंबई पोलिसांनी दिला आहे.
कार्बनडायऑक्साइड इतक्या वेगात इंजिन रूममध्ये पसरला की, या ठिकाणी काम करणार्या कमांडर कुंदल वाधवा यांना बाहेर पडायची संधीदेखील मिळाली नाही. श्वास कोंडल्याने कुंदल यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच ठिकाणी काम करणारे माझगाव डॉकमधील कर्मचारी अस्लम काझी हेदेखील बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी माझगाव येथील प्रिन्स अली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मिसाइल उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेली युद्धनौका
सुमारे ६८०० टन वजनाच्या ‘आयएनएस कोलकाता’ या विनाशिकेचे २००६ साली जलावतरण करण्यात आले. १६३ मीटर लांबीची ही विनाशिका २०१० साली नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार होती. पण नवीन शस्त्रप्रणाली आणि सेन्सर यासारखे काही बदल नौदलातर्फे सुचविण्यात आल्याने या प्रक्रियेला विलंब झाला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या या युद्धनौकेत मिसाइल उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे
No comments:
Post a Comment