Total Pageviews

Wednesday 12 March 2014

SECURITY COASTAL AREAS

कोकण किनार्‍याची सुरक्षा दहशतवाद्यांच्या हालचाली किनारी भागात वाढत आहेत आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी सागर किनारी भागाचा आश्रय दहशतवादी घेत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळे कोकण किनार्‍याकडे एटीएसचे विशेष लक्ष आहे अशी माहिती रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पोलीस रेझिंग डे च्या कार्यक्रमात बोलताना वरीष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र डोईफोडे यानी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोकण किनार्‍याच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.मंगलोर या कर्नाटकातील किनारी भागातील गावाजवळ भटकळ नावाचे एक सध्या सुधारलेले गाव आहे. तेथील रियाज आणि यासीन हे दोन भाऊ कसे काय पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात आले आणि त्या दोघांनी भारतात ४५ बाँबस्फोट घडवून आणण्याइतके भयानक नेटवर्क निर्माण केले याचा पत्ताच लागत नाही. कल्पना करवत नाही. दहशतवाद्यांची यंत्रणा केवळ शहरी भागात नाही, ती केवळ सीमा भागात नाही, ती केवळ पाकमधून कार्यरत नाही तर भारतात ग्रामीण भागात,बीडसारख्या मागास गावात दहशतवादी पोहोचले आणि तेथून त्यानी तरूणांच्या मनात भारताच्या विरोधात द्वेष भडकावून दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी त्याना पाकमध्ये नेऊन प्रशिक्षण दिले. मुंबईवरील हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार बीड जिल्ह्यतला होता. सध्या तो गेल्या वर्षी दिल्ली विमानतळावर पकडला गेल्यावर कारावासात आहे. अब्दुल करीम टुंडा, रियाझ भटकळ, यासीन भटकळ हे अत्यंत खतरनाक दहशतवादी भारतातीलच आहेत.दुर्गम आणि मागास गावात रहाणारे आहेत.पण त्याना दहशतवादी कारवायांसाठी पाकच्या यंत्रणेने कसे काय गाठले याची कल्पना केली की आपण हादरून जातो. यामुळे कोकणात अशा हालचाली नसाव्या किंवा होऊ शकणार नाहीत अशी शाश्वती देता येत नाही. कोकणात हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पैसा येतो हे आता गुपित राहिले नाही. हा पैसा खाजगी कुंटुंबांचाच नाही तर अनेक कारणांस्तव येत असतो. स्मगलिंग चालत असे. कोकणात अनेक ठिकाणी स्मगलिंगचे अड्डे होते. किनारी भागात या हालचाली चालतात. आता त्या कमी झाल्या. पण मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोने यांचे स्मगलिंग कोकण किनार्‍यावर चालत असे.आता कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यात मादक पदार्थांचे स्मगलिंग केले जात असावे असा संशय आहे. दहशतवादी अनेक माध्यमांचा वापर आपल्या कामासाठी करून घेतात.त्यांची एक टोळी पकडली गेली आणि तिची कार्यपद्धती सुरक्षा यंत्रणेला समजली की दहशतवादी नवी कार्यपद्धती अवलंबितात.यामुळे कोकण किनार्‍यावर दहशतवादी कारवायाना पूरक अशा हालचाली होऊ शकतात, तेथे आर्थिक मदतीची केंद्रे निर्माण केली जाऊ शकतात, अत्याधुनिक यंत्रणा येथे लपवून ठेवली जाऊ शकते. किनारी भागात घुसखोरी करून दहशतवादी येऊ शकतात.विकिमॅपिया, गुगल मॅपसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर आणि ग्लोबल पोझिंशनिंग सिस्टीमचा वापर करून कोकण किनार्‍यावर घुसखोरीसाठी सोयीची ठिखाणे एव्हाना दहशतवादी गटानी शोधून ठेवली असतील यात शंका नाही.अर्थात अशा अनंत शक्यतांचा अभ्यास सुरक्षा यंत्रणाना सतत करावा लागतो.कोकण किनार्‍यावर १९९२मध्ये आरडीएक्स हे संहारक स्फोटक आणि अत्याधुनिक हत्यारे कस्टममधील अधिकार्‍याना लाच देऊन त्यांच्या मदतीने उतरविण्यात आली होती.त्यात स्थानिक पोलिसांचाही समावेश होता. त्यानंतर २६ -११च्या मुंबईवरील हल्ल्यातील दहा अतिरेकी पाकमधून एका मासेमारी नौकेतून मुंबईत कुलाबा भागात राजरोस घुसले.गेटवेच्या जवळ त्यानी आपली नौका लावून किनारा गाठला होता. मुंबईवर झालेल्या दोन्ही भयावह संहारक हल्ल्यासाठी साधने आणि दहशतवादी सागरी मार्गाने आले. १९९२च्या मुंबईतील बाँबस्फोटानंतर कोकण किनार्‍यावर अहोरात्र गस्त घालण्यासाठी तटरक्षक दल, पोली, कस्टम आणि पोलिसांच्या मदतीने सागरी गस्ती पथके निर्माण करण्यात आली. ती व्यवंस्था सुरु असतानाच मुंबईवर हल्ला करण्यासाठी २६-११ रोजी सागरी मार्गाने दहशतवादी आले.त्यानंतर आता मुरुड आणि रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे तळ स्थापन करण्यात आले आहेत.पण या सर्व सुरक्षा व्यवस्थेमध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग असणे आवश्यक आहे.हे केवळ सुरक्षा यंत्रणेचे काम नाही. कारण गावात घातक विचार पसरविणारे, संशयास्पद हालचाली करणारे आणि काही चुकीच्या व्यवसायात गुंतलेले यांची माहिती नियमित सुरक्षा यंत्रणेला देणे हे सर्व नागरिकानी आपले कर्तव्य समजले पाहिजे, कोकण किनारा सुरक्षित नाही. सुरक्षा दलाना याची जाणीव आहे. त्यांचे या सुरक्षेचे काम चालूच असते. पण त्या कामात सर्व स्तरातील नागरिकानी आपुलकीने सहभागी झाले पाहिजे.देशाच्या सुरक्षेचे काम सर्वानी मिळून केले पाहिजे

No comments:

Post a Comment