कोम्बिंगच्या 'शिक्षे'प्रकरणी नाराजी
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
सोनसाखळी चोर मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड भागात वास्तव्याला आल्याची खबर लागल्यानंतर ठाणे पोलिसांनी कोम्बिंग केले मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि दबावामुळे हे ऑपरेशन पोलिसांवरच उलटले. लोकप्रतिनिधींनी पोलिसांचा केलेला 'उद्धार' यू ट्यूब आणि व्हॉट्स अॅपवर फिरतोय. एका एसीपीला सक्तीच्या रजेवर धाडावे लागले. या साऱ्या घटनाक्रमामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची झाले असून, वरिष्ठ अधिकारीही कमालीचे नाराज आहेत. या प्रकारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळून कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गातही अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण व्हावा आणि लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने आवश्यकता असेल तिथे कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या मुंब्रा परिसरात यापूर्वीही अनेकदा कोम्बिंग होऊन त्यात गुन्हेगारही सापडले होते. गेल्या आठवड्यातील कोंम्बिंग ऑपरेशनही गुन्हेगारांची ठोस माहिती मिळाल्यामुळेच झाले. कोम्बिंगच्या आखून दिलेल्या कार्यपद्धतीला अनुसरूनच काम सुरू होते. त्यात काही निरपराध लोकांना त्रास झाला असेल ही शक्यता आम्ही नाकारत नाही.
वास्तविक अशा घटनांमध्ये लोकप्रतिनिधींनी मध्यस्थाची भूमिका घेणे अपेक्षित असते. मात्र, पोलिसांची बाजू ऐकून न घेता ते हमरीतुमरीवर उतरले. चौकशी पूर्ण झाली नसताना केवळ राजकीय दबावामुळे एसीपी अमित काळे यांना सक्तीच्या रजेवर धाडावे लागल्याने पोलिस दलात नाराजी निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले काम जर नोकरीच्या मुळावर येत असेल, तर यापुढे अशी कारवाई का करावी असा सवाल पोलिस उपस्थित करत आहेत.
चौकशी अहवाल आज
या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या चुका आणि सरकारी कामात लोकप्रतिनिधींनी केलेला हस्तक्षेप याची चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शुक्रवारी त्याबाबतचा अहवाल ते सादर करणार आहेत.
पोलिसांची कोंडी
या ऑपरेशमनध्ये पोलिसांच्या हाती कोणतीही शस्त्रे लागलेली नाहीत, त्यामुळे चौकशीदरम्यान त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या ५० ते ६० संशयितांना दबावामुळे सोडून द्यावे लागले. कारवाई पूर्ण होऊ दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंब्र्यातच गुन्हेगार सापडले
ज्या रशिद कंपाऊंड परिसरातील कोंम्बिंग ऑपरेशन हाणून पाडण्यात आले, दोन दिवसांनंतर तेथूनच शमू अहमद शेख (२४) या सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली. तर, कौसा भागातून इरफान अब्बास मुलानी याला अटक झाली. त्यांच्याकडून दोन सोनसाखळ्या, पाच हजार रुपये आणि एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. भायखळा पोलिसांनीही याच भागातून मोहम्मद साजीद सईद शेख (३०) याला अटक केली असून, त्याच्या विरोधात दागिने चोरीचे १८ गुन्हे दाखल आहेत.
No comments:
Post a Comment