तेथे कर माझे जुळती...
१९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण हसत हसत दिले. अर्थातच भारतीय सेना अजेय ठरली. ‘ऑपरेशन विजय’ या नावाने ओळखले जाणारे हे कारगिलचे युद्ध म्हणजे सैन्यदलाच्या बेजोड बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि देदीप्यमान त्यागाचा इतिहास आहे! त्याचे प्रत्येक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले पाहिजे!!
या कारगिलवीरांची शौर्यगाथा सांगणारा एक तेजस्वी, ओजस्वी दृक्श्राव्य कार्यक्रम शक्तिपीठाने नागपूरवासीयांसाठी २५ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता. पुणे येथील ‘लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई हा कार्यक्रम सादर करतात. सरहद्दीवर लढणारे आमचे वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा, सौहार्द्राचा पूल बांधण्याचे काम लक्ष्य फाउंडेशनने हाती घेतले आहे. भारतमातेच्या मुला-मुलींमध्ये देशभक्तीची भावना विविध कार्यक्रमांद्वारे निर्माण करणे, हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. दृक्श्राव्य माध्यमातून वीरांची यशोगाथा वर्णन करणे, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी व सैन्यदलात प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे, सैन्यदलात प्रवेश घेतलेल्यांचा सत्कार करणे, जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार मदत करणे, सणांच्या दिवशी जवानांना शुभेच्छापत्रे, खाऊ पाठवणे, आपल्याला त्यांची आठवण आहे हे दर्शवणे, असे बरेच उपक्रम लक्ष्य फाउंडेशनतर्फे हाती घेतले जातात. भविष्यात ‘वीरभवन’ पुण्यात बांधायचे आहे. -एक अशी संस्था, जिथे तरुणांना सैन्यात प्रवेश घेण्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन व मदत दिली जाईल.
या फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई म्हणजे एक सर्वसामान्य स्त्री. २००१ मध्ये लेह-लडाखला सहलीला गेल्या असताना कारगिल येथील विजय स्मारक पाहिले. त्यावरील नावे व शहीद सैनिकांची वयं वाचताना त्या गलबलून गेल्या. विशी-पंचविशीत ते शहीद झाले, हे पाहून त्यांचे आईचे हृदय कळवळले. हे जवान इथे मरत होते तेव्हा आपण मुंबईत काय करत होतो, या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केले. कारगिलमधील भौगोलिक परिस्थिती, विषम हवामान, -६० अंश से. पर्यंत गोठवणारे तापमान या सार्याशी सामना करीत आपले जवान तिथे देशासाठी कसे काम करीत, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले आणि भारतातल्या सामान्य लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याची शपथ त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी घेतली. आता तिथले सगळे जवान म्हणजे अनुताईंची मुलेच आहेत. त्यांना ते सगळे अनुताई, अनुमावशी म्हणूनच ओळखतात. त्यांच्या कुटुंबीयांशीदेखील त्या संपर्कात असतात. नुकताच व्हॅलेंटाईन डे देशात साजरा झाला तेव्हा जवानच माझा व्हॅलेंटाईन म्हणून जवानांसाठी शुभेच्छापत्रे, विविध शाळांधल्या मुलांकडून तयार करून घेऊन सीमेवर पाठविली. राखी पौर्णिमेला राख्या, दिवाळीत फराळ जवानांसाठी पाठवला जातो. दरवर्षी त्या ३०-४० जणांचा ग्रुप घेऊन कारगिलला जातात. जवानांनाही अशा भेटीचे अप्रूप असते.
अशा अनुताई, कारगिल हीरोज्वरील प्रस्तुत दृक्श्राव्य कार्यक्रम अशा आवेशाने सादर करतात की ऐकणारा, पाहणारा देशप्रेमाने प्रेरित होतो. जवानांविषयी प्रेम, कृतज्ञता आणि गौरव मनात दाटून येतो. जीवन कसे जगावे, यापेक्षा ते देशासाठी कसे झुगारावे, हे सांगणार्या वीरांच्या या कथा! ‘या तो तिरंगा लहराके आऊँगा या तिरंगे में लपेट के आऊँगा’ असे कोवळ्या कॅप्टन विक्रम बात्रांचे उद्गार ऐकून ऊर अभिमानाने भरून येतो. अशा नऊ वीरांच्या कथा सांगणार्या छोट्या पुस्तिकाही त्यांनी काढल्या आहेत व शाळांमधील मुलांना त्या विनामूल्य वाटतात. या कार्याने अनुताई पुर्या झपाटल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये व ऑफिसेसमध्ये तसेच सामाजिक संस्थांमध्ये हा तेजोमय कार्यक्रम त्या सादर करतात. त्यांच्या या कार्याची दखल सैन्यदलाने घेतली असून, २०१० व २०११ मध्ये द्रास येथील ‘विजय दिवस’ समारंभासाठी त्यांचा खास आमंत्रितांमध्ये समावेश होता. लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांच्या हातून स्मृतिचिन्हही त्यांना प्रदान करण्यात आले आहे. कारगिल मेमोरियलला पुष्पचक्र वाहण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे.
- वसुधा विनोद सहस्रबुद्धे, नागपूर
No comments:
Post a Comment