Total Pageviews

Sunday, 6 January 2013

होय, बलात्कार इंडियातच अधिक होतात, भारतात कमी! $img_titleकेतन पाठक
नागपूर, ५ जानेवारी
देशपातळी असो की, महाराष्ट्र दोन्ही ठिकाणचा अभ्यास केला तर पाश्‍चिमात्य विचारसरणीचा पगडा असलेल्या मोठ्या शहरांमध्ये बलात्कार अधिक होतात, तर ग्रामीण भागात त्यांचे प्रमाण कमी असते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग या दोन्ही अहवालांचा अभ्यास केल्यानंतर बलात्काराचे प्रमाण भारतापेक्षा इंडियातच अधिक असल्याचे स्पष्ट होते आहे.
अमेरिकेसह अनेक देशांत शहरी आणि ग्रामीण भागातील गुन्ह्यांची आकडेवारी स्वतंत्रपणे ठेवली जात असली तरी भारताने मात्र त्याबाबत पाश्‍चिमात्य प्रणालीचा अंगीकार केलेला नाही. तरुण भारतने या पार्श्‍वभूमीवर काही आकडेवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. आता हेच पहा. महाराष्ट्रात एका वर्षांत १७०१ बलात्कार होतात. त्यापैकी १००२ बलात्कार हे केवळ आठ मोठ्या शहरांमधील आहेत. महाराष्ट्र सीआयडीने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती आणि अहमदनगर या केवळ आठ शहरांत मिळून १००२ बलात्कार होतात. याचाच अर्थ राज्यातील सुमारे ६० टक्के बलात्कार या आठ मोठ्या शहरांमध्ये होतात. उर्वरित ४० टक्के बलात्कार राज्यातील अन्य २४ जिल्हे मिळून आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या विधानातून एक वेगळेच वादळ देशभरात उठविण्याचा प्रयत्न तथाकथित पुरोगामी पत्रकारांनी केला खरा. पण, त्या विधानामागची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. ती जाणून घेतली असती, तर कदाचित या विधानाला पोकळ विरोध करण्याचा प्रयत्न कुणी केला नसता. देशभरातील बलात्काराची आकडेवारी पाहली तरी या प्रतिपादनातील तथ्य उजेडात यावे, इतकी स्वयंस्पष्ट ही आकडेवारी आहे. वाढती शहरीकरण, त्यातील राहनीमान आणि त्या शहरांवर पाश्‍चिमात्य विचारसरणीचा ग्रामीण भागाच्या तुलनेने अधिक असलेला पगडा याचा हा परिणाम असल्याचेच सरसंघचालकांना सांगायचे होते आणि सीआयडीची आकडेवारी यापेक्षा वेगळे चित्र दाखवित नाही. त्यातही या आठ महानगरांमध्येही आपसात तुलना करायची झाली तर पहिला क्रमांक मुंबईचा लागतो. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत एकूण ४०१ बलात्कार होतात. राज्यांतील अन्य शहरांमध्येही बलात्कार होतात. पण, त्याची संख्या तुलनेने कमी आहे.
केवळ बलात्काराच्या बाबतीत नाही, तर मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या चार शहरांचा क्रमांक राज्यातील एकूणच गुन्हेगारीच्या बाबतीत वरचा लागतो. या चार मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी आहे. आठ हजारांहून अधिक गुन्हे जेथे होतात, तेथे या चार शहरांचा क्रमांक लागतो. सहा हजार ते आठ हजार या वर्गवारीत पुणे, ठाणे, नागपूर आणि अहमदनगर या चार शहरांचाच क्रमांक लागतो. राज्यातील सर्वाधिक गुन्हे ३९.९ टक्के मुंबईत होतात. बलात्काराच्या बाबतीत एक स्थिती अतिशय धक्कादायक आहे, ती म्हणजे १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रमाणात २५.९३ टक्के इतकी वाढ झालेली आहे.
महाराष्ट्राच्या बाबतीत जेथे ही स्थिती आहे, तीच स्थिती देशाच्या पातळीवरही आहे. देशभरात महिला अत्याचाराचे २,२८,६५० गुन्हे होतात. त्यापैकी २४,२०६ हे बलात्कार असतात. या घटनांमध्ये २१ टक्के प्रकरणे देशातील ५३ मोठ्या शहरांतच होतात. राष्ट्रीय सरासरी १८.९ टक्के असताना या मोठ्या शहरांची सरासरी मात्र अधिक आहे. देशात बलात्काराच्या बाबतीत पहिल्या तीन शहरांचा क्रम लावायचा झाल्यास तोही दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद असाच लागतो. बलात्काराच्या बाबतीत कायदे कठोर करण्याची गरज प्रतिपादीत याचसाठी कारण बलात्काराच्या २४,२०६ प्रक़रणांपैकी ९३.८ टक्के प्रकरणात आरोपपत्र सादर होऊनही शिक्षा केवळ २६.४ टक्के लोकांना होते. याचाच अर्थ हे प्रमाण १:४ असे आहे. थोडक्यात चारपैकी केवळ एका आरोपीला शिक्षा होते आहे. १९७१ मध्ये भारतात २४८७ बलात्कार व्हायचे, ते प्रमाण आता २०११ मध्ये २४,२०६ वर गेलेले आहे. टक्केवारीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास बलात्काराचे प्रमाण ८३७.३ टक्क्यांनी वाढले आहे.
शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असल्याच्याही प्रतिपादनाला तर २०११ च्या जनगणनेनेच मोठा आधार दिला आहे. अवघ्या दहा वर्षांत शहरी भाग २७.८१ टक्क्यांवरून ३१.१६ टक्क्यांवर गेला आहे, तर ग्रामीण भाग ७२.१९ टक्क्यांवरून ६८.८४ टक्क्यांवर आला आहे. देशपातळीवर बलात्काराचा विचार करायचा झाल्यास उत्तर भारतात सर्वाधिक ६२२७ बलात्कार होतात, तर दक्षिण भारतात ३८९४ बलात्कार होतात. हे दोन भाग मिळून १०,१२१ बलात्कार आहेत, ज्याची टक्केवारी ४० टक्के इतकी आहे. अरुणाचल, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा या मागास राज्यांत कमीत कमी अशी २२४६ प्रकरणे आहेत.
महाराष्ट्रातील आठ मोठ्या शहरांतील बलात्कार
मुंबई ४०१
पुणे १६६
अमरावती ९१
नागपूर ८९
अहमदनगर ७८
सोलापूर ७५
नाशिक ६८
औरंगाबाद ३४
............................
एकूण १००२
............................
देशातील महिला अत्याचाराची प्रकरणे
गुन्ह्याचा प्रकार प्रकरणे शिक्षेची टक्केवारी
मुलींचे अपहरण ३५,५६५ २८.१
बलात्कार २४,२०६ २६.८
छेडछाड ४२,९६८ २७.७
लैंगिक छळ ८५७० ४५.८
पतीकडून छळ ९९,१३५ २०.२
तस्करी ८० ७.८
आकडेवारीचा स्त्रोत : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो/महाराष्ट्र सीआयडी-२०११
पाश्‍चिमात्याच्या भोगवादाचा हा पुरावा!
अमेरिकेच्या गुन्हेगारीतील राष्ट्रीय पातळीवर जी आकडेवारी प्रकाशित झाली, ती तर अधिकच स्फोटक आहे. अमेरिकेत महाविद्यालयात शिकणार्‍या प्रत्येक सातपैकी एका मुलीवर बलात्कार होतो. बलात्कार झालेल्या दहापैकी ९ मुली तक्रार करीत नाहीत. अमेरिकेत बलात्कार नोंदले न जाण्याचे प्रमाण ६१.५ टक्के आहे. अमेरिकेत २८ टक्के बलात्कार हे पतीकडून होतात. ७४ टक्के बलात्काराच्या प्रकरणात आरोपी हा ओळखीचा असतो. १० पैकी सहा प्रकरणात बलात्काराची जागा ही पीडितेचे घर, मित्राचे, आप्ताचे, शेजार्‍याचे घर असते. अमेरिकेत जगात सर्वाधिक बलात्काराचा दर आहे. तो इंग्लंडपेक्षा १३ टक्क्यांनी, तर जपानपेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे. ६१ टक्के बलात्कार हे १८ वर्षांपेक्षा कमी वयात होतात. अमेरिकेत मात्र शहरी आणि ग्रामीण अशी गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करण्यात येते, तेथेही शहरी भागात १३.६ टक्के बलात्कार होतात, तर ग्रामीण भागात १०.१ टक्के बलात्कार होतात. महिलांचे स्थान भारतात चांगले की पाश्‍चिमात्य संस्कृतीत, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट व्हावे. (स्त्रोत : नॅशनल सेक्सुअल व्हायोलेंस रिसोर्स सेंटर, युएसए

No comments:

Post a Comment