प्रजा आत्मानंदात धुंद तर राज्यकर्ते स्वार्थात बेधुंद, हेच आपल्या ६३व्या प्रजासत्ताकदिनाचे चित्र आहे. दुर्दैवाने त्याची खंत ना सत्ताधार्यांना आहे ना प्रजेला. दोष तरी कुणाला द्यायचा?
धुंद प्रजा, बेधुंद राज्यकर्ते!प्रथेप्रमाणे देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा होईल. म्हणजे राजधानी दिल्लीत नेहमीप्रमाणे संचलन होईल, चित्ररथांच्या माध्यमातून बहुरंगी-बहुढंगी हिंदुस्थानचे दर्शन जगाला होईल, परकीय देशांचे खास पाहुणेदेखील या कार्यक्रमाचा आनंद लुटतील. बुलेटप्रूफ काचांच्या आडून राष्ट्रपती देशाला संबोधतील. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी दरवर्षी हेच चित्र दिसते. फक्त चेहरे बदलतात. मोहरेदेखील कधी कधी बदलतात. मात्र ज्या प्रजेचे हे सत्ताक आहे त्या प्रजेला मात्र आता ‘चेहरा’च राहिलेला नाही. बिनचेहर्याची ही प्रजा २६ जानेवारीला ‘सुट्टी’ म्हणत एन्जॉय करीत असते. त्यातही यंदा शनिवार आणि रविवार जोडून आला आहे, त्यामुळे शुक्रवारपासूनच देशातील मोठा वर्ग ‘पिकनिक मूड’मध्ये आहे. शनिवारी राजधानी दिल्लीपासून गल्लीतील सरकारी कार्यालयापर्यंत प्रजासत्ताक दिन साजरा होत असेल तेव्हा अनेक जण ‘एन्जॉयमेण्ट’साठी निघालेले असतील. त्यामुळे राष्ट्रपतींचे ‘विचार’ टीव्हीच्या पडद्यावरून किती जणांच्या कानावर जातील? हा एक प्रश्नच आहे. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन यांसारखे राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस ‘एन्जॉय’ करण्याचे आहेत की, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यासाठी ज्यांनी इंग्रजांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, बलिदान दिले, ज्यांनी स्वातंत्र्यानंतरही या देशासाठी सर्वस्वाचा होम केला, हौतात्म्य पत्करले अशा देशभक्तांचे पुण्यस्मरण
करण्याचे आहेत या नेहमीच्या प्रश्नावर यंदाही चर्चा होईल. अर्थात, गेल्या काही वर्षांत राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने ‘प्रजा’सत्ताकाला ‘स्व’सत्ताक बनवले आहे, त्यामुळे आता या चर्चेतही कुणी स्वारस्य दाखवीत नाही. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी असले तरी ही वेळ जनतेवर आणली आहे ती राज्यकर्त्यांनीच. २६ जानेवारी काय किंवा १५ ऑगस्ट काय, हे दोन्ही जनतेसाठी प्रेरणादिन असावयास हवेत. मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की, जनतेने प्रेरणा घ्यायची ती कसली? आणि कोणाकडून? उत्तम प्रशासन, स्वच्छ व पारदर्शक राज्यकारभार, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, हिंदू धर्माभिमान, विकास आणि प्रगतीचा ध्यास या सर्व गोष्टी राज्यकर्त्यांनीच खुंटीला टांगून ठेवल्या आहेत. त्याउलट घोटाळेबाज शासन, राष्ट्रभक्तीऐवजी सोनिया-राहुलभक्ती, हिंदूंना लाथ आणि मुस्लिमांना साथ, भ्रष्टाचाराचे टोलेजंग टॉवर्स असेच ‘आदर्श’ राज्यकर्ते जनतेसमोर आहेत. कथित हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा मुस्लिम लाचारपणापायी उभा केला गेलाच आहे. पुन्हा देशाचे गृहमंत्रीच ‘भगवा दहशतवाद’ यासारखी बालिश विधाने करून पाकड्या दहशतवाद्यांच्या हाती कोलीत देत आहेत. पाकिस्तान आमच्या सीमेत घुसून आमच्या जवानांना ठार मारून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करीत आहे आणि आमचे राज्यकर्ते मात्र त्याबद्दल ब्रदेखील न काढता हिंदूंनाच दहशतवादाच्या पिंजर्यात
उभे करीत आहेत. पुन्हा त्याविरोधात आवाज उठविणार्यांच्या तोंडात ‘धर्मनिरपेक्षते’चा बोळा कोंबण्यात येतो. म्हणजे एकीकडे येथील हिंदुत्व, राष्ट्रवादावर धर्मनिरपेक्षतेचा वरवंटा फिरविला जात आहे, तर दुसरीकडे सामान्य जनतेला ‘आर्थिक सुधारणांच्या’ बुलडोझरखाली चिरडले जात आहे. पुन्हा या देशातील हिंदूंनादेखील ‘स्व’त्वाचा तसा विसरच पडला आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यांवर उतरणारी तरुणाई पाकड्यांनी आमच्या जवानांचा शिरच्छेद केल्यानंतरही शांत शांतच राहते. तुमचे ते ‘मेणबत्ती आंदोलन’ही कुठे होत नाही. ‘सोशल नेटवर्किंग साइट’वरूनही एखादी वात पेटली आहे असे दिसत नाही. हाफीज सईदसारख्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याला ‘साहेब’ म्हणणार्या राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचे भानही या देशातील ‘प्रजा’ विसरून गेली आहे. प्रजा आत्मानंदात धुंद तर राज्यकर्ते स्वार्थात बेधुंद, हेच आपल्या ६३व्या प्रजासत्ताक दिनाचे चित्र आहे. दुर्दैवाने त्याची खंत ना सत्ताधार्यांना आहे ना प्रजेला. दोष तरी कुणाला द्यायचा? प्रजासत्ताक म्हणजे नेत्यांनी प्रजेवर सत्ता गाजवायची की प्रजेने नेत्यांवर? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात प्रजेलाही स्वारस्य नसेल तर कसे व्हायचे? प्रजासत्ताक दिन आला, तो साजरा करण्याचे सरकारी सोपस्कार पार पडले आणि जनतेनेही ‘सुट्टी’ एन्जॉय केली असाच ‘२६ जानेवारी’चा अर्थ सध्या झाला आहे. तो ज्या दिवशी बदलेल तो खर्या अर्थाने आपला ‘प्रजासत्ताक’ दिन ठरेल!
No comments:
Post a Comment