कमल हसन निर्मित विश्वरूपम
सांस्कृतिक दहशतवाद थांबवा!-शिवराय कुळकर्णी
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटातही स्वतःची आगळी वेगळी ओळख तयार करणार्या कमल हसन या अभिनेत्याला आज दुर्दैवाने हा देश सोडण्याची भाषा करावी लागली आहे. या देशातील सांस्कृतिक दहशतवादाने कमल हसन व्यथित झाला असून, असा सांस्कृतिक दहशतवाद थांबवण्याची मागणी कमल हसनने केली आहे.कमल हसन निर्मित विश्वरूपम हा सर्वात महागडा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी ९५ कोटी रुपये खर्च आला आहे. हा चित्रपट दाखवू न दिल्यास आपल्याला सर्वस्व गमवावे लागणार, हे कमल हसनसमोर स्पष्ट आहे. त्याच्या महत्त्वाकांक्षी विश्वरूपम या चित्रपटात मुसलमानांविषयी आक्षेपार्ह संवाद असल्याचे काही मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. या चित्रपटात मुसलमानांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असल्याचाही काही मुस्लिमांचा दावा आहे. मुस्लिम संघटनांची ओरड सुरू झाल्यानंतर मुस्लिम समुदायातील काही जणांसाठी काही दिवसांपूर्वी एक स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती. त्यानंतरही विश्वरूपम चित्रपटाच्या विरोधात काही लोकांकडून निदर्शनं करण्यात आली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार असल्याचे आंदोलक मुस्लिमांचे म्हणणे आहे. या प्रकरणी चित्रपटातून कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची आपण पूर्ण काळजी घेतली असल्याचे कमल हसन यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेताच तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तत्सम कथित धर्मनिरपेक्ष सरकारांनी तत्काळ विश्वरूपमवर बंदी घातली. तामिळनाडूतील बंदीनंतर हैद्राबाद आणि बंगलोर शहरातही हा कथित वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करायचा नाही, असा निर्णय थिएटर मालकांनी घेतला. आपल्या चित्रपटाचे भवितव्य अधांतरी आहे, असे लक्षात येताच कमल हसनला स्वतःलाच न्यायालयात धाव घ्यावी लागली.
या देशातील कथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष मुस्लिमांनी आवाज उचलला की लगेच कान टवकारतात. त्यांच्या मागण्या आवश्यकतेपेक्षा जास्त पूर्ण केल्या तरच आपण आपले धर्मनिरपेक्षत्व सिद्ध करतो, असा या लोकांचा समज आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांमधून हिंदू संस्कृतीवर जाणून हल्ला चढवण्यात आला. नेहमीच भगवी वस्त्रे धारण केलेला साधू-सन्यासी हा चित्रपटात ढोंगी दाखवला जातो. या उलट ख्रिश्चन पादरी असल्यास त्याची प्रतिमा अत्यंत सेवाभावी दाखवली जाते. एखादा फकीर नेहमीच उदात्त विचारसरणीचा दाखवला जातो. चित्रपटातील मुस्लिम किंवा ख्रिश्चन भूमिका थोडीही वादग्रस्त दाखवली गेली की लगेच ‘इस्लाम खतरे मे है’चा नारा दिला जातो. संकटात असलेल्या हिरोला वाचवण्यासाठी चित्रपटातील गरीब मुसलमान अल्लाकडे प्रार्थना करतो आणि ती तत्काळ फळते. त्याच वेळी मोठ्या मंदिरातील पुजारी खलनायक दाखवले जातात. दहशत पसरवणारे गुंड नेहमीच देवभक्त दाखवले जातात. सार्याच कुप्रथा हिंदू धर्माशी जोडलेल्या दाखवल्या जातात. कधी काळी हिंदू संस्कृती जपणार्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, तर त्याला केराची टोपली दाखवली जाते. या देशात हिंदूंना झोडपण्याची पूर्ण मुभा आहे. हिंदूंनी आवाज उठवला, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजवले जातात. एम. एफ. हुसैन या चित्रकाराची मती मारल्या गेल्यावर या देशातल्या धर्मनिरपेक्ष राजकारण्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्याच गप्पा केल्या. उंची मद्याचे घोट घेत पंचतारांकित हॉटेलांमध्ये बसून यांनी एम. एफ. हुसैनचे गोडवे गायले. थेट हिंदूंच्या देवी-देवतांचे विकृत चित्रीकरण केल्यावरही हिंदूंनी आवाज उठवला, तर ते प्रतिगामी! मात्र, मुस्लिमांनी थोडा आवाज काढताच सारेच धर्मनिरपेक्ष राजकारणी खडबडून जागे होतात. तुमच्यापेक्षाही तुमच्या मजहबची आम्हालाच किती काळजी आहे, हे दाखवण्यासाठी हे लोक त्यांच्याही पुढे धावतात.
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्या म्हणजेच केवळ व्होट बँकेचे राजकारण करणार्या या लोकांचा फटका आता कमल हसन यांना बसला आहे. मुस्लिमांंचा गैरसमज झाला असल्याचे त्याने वारंवार म्हटले. आपल्या चित्रपटाविषयी आक्षेप घेतला आहे, ते काही मूठभर लोक मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व करतात का, असा सवालही कमल हसनने उपस्थित केला. मात्र, ऐकणार कोण? कमल हसन युक्तिवाद करीत फिरला. विनवण्या केल्या. अनेकांना हा चित्रपट आवडला आणि त्यात मुस्लिमही आहेत. सेन्सॉर बोर्डातही अनेक मुस्लिम लोक आहेत. त्यांनी चित्रपट पाहिला आहे. त्यांना विश्वरूपम आवडला आहे. त्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे कमल हसनने सांगितले. अखेर कमल हसनसारखा संवेदनशील कलावंत व्यथित झाला. त्याचे खरे दुखणे त्यालाचमाहीत. कारण, त्यानेे आपले सर्वस्व डावावर लावलेले आहे.
शेवटी कमल हसनने या घटनाक्रमाचे अतिशय योग्य विश्लेषण केले. भारतात मागील काही काळापासून सांस्कृतिक दहशतवाद सुरू आहे. सांस्कृतिक दहशतवाद्यांना यासाठी कोणत्याही हत्याराची, दारुगोळ्याची गरज नसते. दुसर्यांना धमकावणे, कलाकारांच्या भावनांना ठेच पोहोचवणे एवढेच त्यांचे काम असते. शेवटी ‘विश्वरूपम प्रकरणी आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आपण देश सोडू’, अशी निर्वाणीची भाषाही त्याला बोलावी लागली. आपल्याला खर्या धर्मनिरपेक्ष देशात रहायचं आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने धार्मिक एकता कशी तोडली जाते, हे दिसले. आपण राजकीय बळी ठरल्याचेही त्याला समजले. चित्रपटासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवली असलेल्या कमल हसनला असे उद्गार काढताना निश्चितच दुःख झाले असणार. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद कसा राबवला जातो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हिंदू धर्मीयांचे विकृत चित्रण वारंवार दाखवणारे आणि त्याला खतपाणी घालणार्यांचेच हे सांस्कृतिक दहशतवादाचे नवे कृत्य आहे.
No comments:
Post a Comment