Total Pageviews

Thursday, 3 January 2013

जावेद मियांदादला ‘व्हिसा’

saamnaa


जावेद मियांदादला ‘व्हिसा’ दिल्याने हिंदुस्थान सरकारचे निर्लज्ज थोबाड पुन्हा समोर आले. जावेदसाठी पायघड्या घालणार्‍यांनी एक प्रकारे दाऊदच्या पायांचे तीर्थच प्राशन केले.
 
दाऊदच्या पायाचे तीर्थ!
पाकिस्तानसारखे दुष्मन राष्ट्र हिंदुस्थानच्या वाटेत नुसते काटेच नाही तर बॉम्ब पेरत असते. या पेरलेल्या बॉम्बने अनेक निरपराध जीव मरत असतात, पण आमच्या सरकारला त्या मेलेल्या जिवांची अजिबात पर्वा नाही. तसे असते तर सरकारने पाकड्या क्रिकेटपटूंसाठी हिरवे गालिचे अंथरले नसते व त्या हिरव्या गालिच्यांवरून जावेद मियांदादसारख्यांचे आगत-स्वागत केले नसते. पुन्हा हे सर्व इतके वाजतगाजत सुरू आहे की, सरकारी निर्लज्जपणाची किळसच यावी. पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदाद यास दिल्लीतील क्रिकेट सामना पाहता यावा म्हणून हिंदुस्थानने त्याला व्हिसा दिला आहे. खुद्द मियांदाद याने इस्लामाबादेत असे जाहीर केले आहे की, ‘हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी मी ६ जानेवारीला हिंदुस्थानात जाणार आहे. तसेच अजमेर शरीफला जाण्यासाठीही व्हिसा मिळाला असून मी तिथेही जाणार आहे!’ जावेद मियांदाद हा आता फक्त क्रिकेटपटू राहिलेला नाही. हिंदुस्थानच्या कडवट दुश्मनाशी म्हणजे त्या नराधम दाऊद इब्राहिमशी त्याचे नाते आहे. दाऊदच्या मुलीशी जावेदच्या मुलाचा निकाह लागला आहे. २००५ मध्ये हा निकाह झाला तेव्हापासून मियांदाद याने हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसाची मागणी केली नव्हती. आता हे मियां जावेद येत आहेत. खरे तर जावेदला व्हिसा नाकारून हिंदुस्थानने दाऊदसारख्यांना कडक संदेश देण्याची ही संधी होती. कोण हा दाऊद? कोण हा जावेद? तिकडे दाऊदच्या पोरीस सून म्हणून स्वीकारतो आणि पुन्हा इकडे
हिंदुस्थानच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी
दिल्लीत येतो. अर्थात झाले गेले विसरून जाऊया व पाकिस्तानशी क्रिकेट खेळूया हीच दिल्लीतील राज्यकर्त्यांची इच्छा असल्यावर देशातील जनतेने करायचे तरी काय? जावेद हा दाऊदचा व्याही आहे. त्यामुळे दाऊदच्या कृत्यांतला तो आता एक भागीदारच बनला आहे. त्या जावेदला व्हिसा देऊन आमच्या निर्लज्ज सरकारने अप्रत्यक्ष दाऊदशीच हातमिळवणी केली आहे. इतके दुर्बल व निर्लज्ज राज्यकर्ते असल्यावर पाकड्यांचे फावणारच! हा जो कोणी जावेद मियांदाद आहे तो शिवसेनाप्रमुखांच्या भेटीसाठी काही वर्षांपूर्वी ‘मातोश्री’च्या पायर्‍या चढलाच होता. जावेद मियांदादने तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे मन वळविण्याचा कसोशीने प्रयत्न केला की, ‘बाळासाहेब, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध करू नका. त्यांना हिंदुस्थानात खेळू द्या. खेळात राजकारण आणू नका.’ वगैरे वगैरे. पण शिवसेनाप्रमुखांनी त्याचे काहीएक ऐकले नाही व स्पष्ट शब्दांत त्याला सांगितले, ‘मी क्रिकेटचा चाहता आहे. एक खेळाडू म्हणून तुझे आमचे वैर नाही, पण पाकिस्तानशी आमचे भांडण आहे व राहणार! जोपर्यंत पाकिस्तान हिंदुस्थानात अतिरेकी पाठवत आहे, दहशतवादी हल्ले करीत आहे, हिंदुस्थानात फाळणीचे कारस्थान शिजवीत आहे, कश्मीर पेटवीत आहे तोपर्यंत तुमचे ‘पाकडे’ पाय मी माझ्या हिंदुस्थानास लावू देणार नाही! जाऊन सांगा तुमच्या पाकिस्तानला!’ हे इतके परखड बोल शिवसेनाप्रमुखांनी जावेद मियांदादला सुनावले तेव्हा तो दाऊदचा व्याही बनला नव्हता. अर्थात, तसा तो असता तर त्या जावेदला ‘मातोश्री’च्या पायरीवरही शिवसेनाप्रमुखांनी उभे केले नसते. कारण देशाच्या आड येणारा खेळ असो, धर्म असो नाहीतर कोणतीही मोठी व्यक्ती असो शिवसेनाप्रमुखांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. आता कॉंग्रेसचेच काही पुढारी जावेद मियांदादला ‘व्हिसा’ दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.
या ढोंगास काय म्हणावे?
सगळ्यांनी त्यांचा विरोध जाहीरपणे प्रकट केला पाहिजे व सरकारला खडे बोल सुनवायला हवेत. जावेद मियांदाद आता हिंदुस्थानात येणार. क्रिकेटचे सामने पाहणार. मग अजमेर शरीफ दर्ग्यावर जाऊन स्वदेश म्हणजे पाकिस्तानसाठी दुवा मागणार. पाकिस्तानसाठी दुवा म्हणजे हिंदुस्थानचा सत्यानाश होण्याचीच मागणी असणार ना? अर्थात त्यासाठी दोषी आमचे राज्यकर्तेच आहेत. कारण हिंदुस्थानचा सत्यानाश व्हावा यासाठी आमच्याच राज्यकर्त्यांनी जावेदसारख्यांना व्हिसा दिला आहे! जावेदभाई हिंदुस्थानात येऊन संसदेवरील हल्ल्याचा निषेध करणार आहे काय? मुंबईवरील हल्ल्याचा धिक्कार करणार आहे काय? कश्मीर खोर्‍यातील दहशतवादाचा विरोध करणार आहे काय? पण एकही पाकडा इकडे येऊन असे करील तर शपथ! ते गझलवाले, टीव्हीवरचे गाने-बजानेवाले, ते हास्यसम्राट पाकिस्तानातून येतात व इकडे मालामाल होऊन निघून जातात आणि आमचे निर्माते-दिग्दर्शक राष्ट्रीय स्वाभिमानाची ऐशी की तैशी करून हिंदुस्थानच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे धंदेवाईक कार्य पार पाडीत असतात. हिंदुस्थानच्या स्वाभिमानाची व स्वातंत्र्याची ही खुली विक्री क्रिकेटच्या मैदानापासून टीव्ही वाहिन्यांपर्यंत राजरोज सुरू आहे. जावेद मियांदादला ‘व्हिसा’ दिल्याने हिंदुस्थान सरकारचे निर्लज्ज थोबाड पुन्हा समोर आले. जावेदसाठी पायघड्या घालणार्‍यांनी एक प्रकारे दाऊदच्या पायांचे तीर्थच प्राशन केले. दाऊदच्या हल्ल्यात ज्यांचे रक्त सांडले, जे मेले त्यांचे जीव कवडीमोलाचेच ठरले. नुसते शब्दांचे धिक्कार करून तरी काय होणार? त्या जावेदच्या विरोधात मशाली सोडा, निदान मेणबत्त्या तरी पेटवा हो

No comments:

Post a Comment