Total Pageviews

Sunday, 6 January 2013

बलात्कारानंतरचा बलात्कार!

दिल्लीतील ‘त्या’ बलात्कार प्रकरणामुळे बलात्काराचे क्रौर्य लोकांना कळले. मात्र त्यानंतरही बलात्काराबाबत अनेकांची जी फडफड सुरू आहे त्यामुळे त्यांचेही बुरखे फाटत आहेत. हासुद्धा बलात्कारानंतरचा बलात्कारच आहे.
बलात्कारानंतरचा बलात्कार!बलात्कारी व अतिरेक्यांना जात, धर्म, प्रांत नसतो व असे लोक बाईची जात-प्रांत पाहून बलात्कार वगैरे करीत नाहीत. जसे ‘दलित महिलांवर बलात्कार’ किंवा ‘अमुकतमुक जातीच्या महिलेची विवस्त्र धिंड’ काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. खरे म्हणजे अशी जातीची लेबलं अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना तुम्ही का चिकटवता? हे नराधम महिलांची जात पाहून बलात्कार करीत नाहीत. हा त्यांच्या मनातील राक्षस असतो. सध्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे जे कवित्व देशात सुरू आहे त्यावरून असेच म्हणावेसे वाटते. दिल्लीतील ती दुर्दैवी, पीडित तरुणी तडफडून मेली असली तरी अनेकांचे फडफडणे सुरूच आहे. हा विषय सहज विसरून जावा असा नाही म्हणूनच दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी त्या मृत तरुणीच्या मित्राने दिल्ली पोलिसांवर ‘कर्तव्य बजावण्यात दिरंगाई’चा आरोप केला. त्या तरुणाने त्या भयंकर रात्रीचे जे कथन केले त्यामुळे सारा देश थरारला व कोणत्या समाजात, कोणत्या देशात आपण राहतो, असा प्रश्‍न सगळ्यांनाच पडला. त्या पीडित तरुणीवरील बलात्कारानंतर दिल्लीच्या जंतर मंतर किंवा राजपथावर मेणबत्ती आंदोलन करणार्‍यांवरसुद्धा या तरुणाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्या रात्री पोलिसांचे व लोकांचे वर्तन मानवतेस काळिमा फासणारे होते व अशा लोकांना आंदोलनाच्या मेणबत्त्या पेटविण्याचा अधिकार आहे काय, असा सवाल त्या मृत तरुणीच्या मित्राने केला आहे. बलात्कारानंतर बसमधून दोघांना फेकून दिले. त्यांना चिरडून ठार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो तरुण सांगतो, ‘‘कपडे फाटलेल्या अवस्थेत मी येणार्‍या-जाणार्‍यांकडे मदतीची याचना करीत होतो, पण २० ते २५ मिनिटे कोणीही मदतीसाठी थांबले नाही. सुमारे अर्ध्या ते पाऊण तासानंतर पोलिसांच्या पीसीआर व्हॅन तेथे आल्या. मात्र घटनास्थळ कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते हे ठरवण्यातच त्यांनी बराचसा वेळ घालवला!’’ त्या तरुणाने दिलेली ही माहिती
धक्कादायक आहे. त्या मुलीस वैद्यकीय मदत मिळण्यात दोन तास लागले व तिची प्रकृती बिघडत गेली. हे फक्त त्याच मुलीच्या बाबतीत घडले असे नाही. आपल्या देशात रस्त्यावरील अपघातात प्रत्येकवेळी हेच घडत असते आणि ते फक्त दिल्लीतच घडते असे नाही. एखादी अपघाती व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर तडफडत असताना गुन्हा कोणत्या हद्दीत घडला, हे ठरवण्यास पोलीस वेळ लावतात. जबाबदारी किंवा जोखीम आपल्या अंगावर नको. दुसर्‍या हद्दीत ढकला. ही वृत्ती बळावली आहे. विशेषत: रेल्वेच्या हद्दीत असे अपघात किंवा गुन्हे घडले की त्या जखमीचे हाल कुत्रे खात नाही व मृतदेहाची तर ओढाताणच होते. पोलीस वेळेवर पोहोचले नाहीत व वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून रोज अनेक जखमींना रस्त्यावर तडफडत प्राण सोडावा लागतो. त्या ‘पीडित’ मुलीच्या बाबतीत तेच घडले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर तिला व तिच्या मित्रास फेकून दिले तेव्हा रिक्षावाले, कारवाले, जाणारे-येणारे प्रत्येकजण फक्त त्यांचे तडफडणे व किंकाळ्या ऐकत राहिले. एकानेही गाडी थांबवून त्यांना रुग्णालयात पोहचविण्याचे औदार्य दाखविले नाही. मात्र हे सर्व प्रकरण ‘मीडिया’ने उचलून धरताच चळवळ व आंदोलनाचे लोण पसरले. अर्थात नंतर जिवंत झालेला हा समाज त्या मुलीवर अत्याचार झाला त्या रात्री तिची रस्त्यावरची अवस्था पाहून जिवंत का झाला नव्हता आणि आपली जबाबदारी झटकून पुढे का निघून जात होता. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. बलात्कारी आणि अतिरेकी कोणत्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा असो त्याला फासावरच लटकवायला हवे, पण
समाज असा मुर्दाडासारखा वागणार असेल तर त्यांना कोणी वठणीवर आणायचे? बलात्कार्‍यांना सर्वत्र ‘फाशी फाशी’ अशी मागणी होत असताना पुण्यातील एका बलात्कार प्रकरणात संदेश अभंग या आरोपीस खालच्या कोर्टाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आणि जन्मठेप सुनावली. काय तर म्हणे आरोपी दारूच्या नशेत असल्यामुळे तो काय करीत होता हे त्याला कळले नसेल. म्हणजे आरोपी संदेश अभंग याने निर्घृण आणि अमानवी कृत्य केले हे न्यायालयाने मान्य केले आहे, पण त्यावेळी तो दारूच्या अमलाखाली होता म्हणूनच त्याचे हे ‘अस्वाभाविक कृत्य’ फाशी देण्यासाठी तेवढे सबळ ठरत नाही असे मत न्यायालयाने म्हणे नोंदवले आहे. त्यामुळेच त्या नराधमाची फाशीची शिक्षा ‘अभंग’ राहिली नाही. ती जन्मठेपेवर आली. न्यायालयानेच फाशीची शिक्षा जन्मठेपेवर आणल्यावर कोण काय बोलणार? कायद्याची चौकट, शिक्षेचे निकष वगैरे गोष्टी मान्य केल्या तरी संदेश अभंग या नराधमाने जे अमानवी कृत्य केले, चाकूचे तब्बल १८-१९ वार त्या महिलेवर केले तेदेखील शेवटी दारूच्या अमलाखालीच केले होते ना? तरीही ‘दारूचा अंमल’ हा फाशीऐवजी जन्मठेप होण्यासाठी ‘संशयाचा फायदा’ होत असेल तर कसे व्हायचे? मुळात बलात्कारी किंवा अतिरेकी यांना धर्म, पंथ, जात नसते. आता मात्र त्याने गुन्हा करताना कोणते पेय प्यायले आहे हादेखील शिक्षेचा निकष होऊ लागला आहे. म्हणजे बलात्कार्‍याने दारू प्राशन केली आहे की अमृत प्राशन करून नराधमी कृत्य केले आहे यावर शिक्षा ठरवली जाणार आहे का? बलात्कार्‍याने अमृत पिऊन गुन्हा केला तरच त्याला फाशी होईल असे समजायचे का? दिल्लीतील ‘त्या’ बलात्कार प्रकरणामुळे बलात्काराचे क्रौर्य लोकांना कळले. मात्र त्यानंतरही बलात्काराबाबत अनेकांची जी फडफड सुरू आहे त्यामुळे त्यांचेही बुरखे फाटत आहेत. मग तो दिल्ली पोलिसांचा असेल, राजकारण्यांचा असेल किंवा समाजाचा असेल. हासुद्धा बलात्कारानंतरचा बलात्कारच आहे

No comments:

Post a Comment