८ मार्च महिला
दिवसाच्या निमित्याने स्रियांची सुरक्षा,अवलोकन व ऊपाय योजना भाग एक
८ मार्चला आंतरराष्ट्रीय
महिला दिवस साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा
प्रकारच्या सकारात्मक बाबींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध
उपक्रम राबवले जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेचे काय? यापुढे
असे उपक्रम एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता सातत्याने राबवून त्यांना अधिकाधिक
सक्षम, समर्थ व स्वावलंबी करणे अत्यावश्यक आहे. तरच हा दिवस
साजरा करणे संयुक्तिक ठरेल.
आपल्याकडे एखाद्या स्त्रीवर, मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभर पुढील काही
दिवस पहायला मिळतात. निदर्शने, आंदोलने यातून फारसे काहीच
निष्पन्न होत नाही. 2023 मध्ये स्त्रिया आणि मुलींवर
झालेल्या अत्याचारात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे दिसते. अशा परिस्थितीत नेमके काय
करायला हवे?
प्रत्येक
भागाकरता नेमक्या सुरक्षेच्या उपाययोजना
आज स्त्री सुरक्षेचा प्रश्न
हा इतका गहन झाला आहे की प्रत्येक स्त्रीमागे एक पोलिस नेमला तरच अशा घटना थांबवता येतील. पण हे अव्यवहार्य
आहे. त्यामुळे आपल्याला व्यवहार्य उपाययोजनांचा विचार केला पाहिजे.
सर्वात पहिले स्त्रिया आणि
त्यांच्या कुटुंबियांनी आपण ज्या भागात राहातो, ज्या कॉलेजमध्ये जातो, ज्या नोकरीसाठी जातो त्या
सर्व ठिकाणी सुरक्षेची कुठली आव्हाने समोर येऊ शकतील याचा एकत्रित विचार करायला
हवा. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्त्रियांना नेमके काय करावे लागेल यावर
नियोजन केले जावे. कुटुंबिय, वस्तीतील,सोसायटीतील
रहिवासी यांनी एकत्रितपणे यावर विचार केला तर प्रत्येक भागाकरता नेमक्या
सुरक्षेच्या उपाययोजना करता येतील.
स्त्रियांनी
फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज
एखादा भाग किंवा रस्ता हा
निर्मनुष्य असतो, रस्त्यावर रात्री काळोख असतो,
रस्त्यावर समाजविघातक घटकांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी स्त्रियांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिस,
होमगार्ड किंवा इतर स्वयंसेवकांची गस्त घालणे शक्य होईल का? काळोख्या भागात पुरेशी प्रकाश व्यवस्था, संवेदनशील
भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळी पहारा देता येईल का?
एक समाज म्हणून नेमके काय
करता येईल? महिलांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते. दर वेळी वडील,
भाऊ, नवरा बरोबर नसतात, त्यामुळे
अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते. म्हणून
स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज आहे. संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची
वेळ आली तर तसे करता आले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी पाच ते दहा मिनिटे
स्वतःचे रक्षण कसे करता येईल यासाठी बॉक्सिंग, कराटे अशा
प्रकारचे स्वसंरक्षणात्मक धडे घेणे गरजेचे आहे. ते घेतल्यास सज्जन शक्ती मदतिस
येइपर्यंत स्त्रियांना आपला बचाव करता येइल.हे शिक्षण शाळेपासुन सुरु केले जावे.
सुरक्षा अॅप
डाऊनलोड करा
दुसरा उपाय म्हणजे, हल्ली अनेकांकडे स्मार्टफोन असतात. अनेक सुरक्षा अॅप
पोलिसांनी निर्माण केले आहेत. मोबाईलचा वापर करणार्या सर्व तरुणी-महिलांनी ते
डाऊनलोड करावेत.
त्यातील सर्वात महत्त्वाचे
अॅप आहे निर्भया अॅप. संकटप्रसंगी मोबाईलचे बटण तीन चार वेळेला दाबले तर हे अॅप
त्वरीत सुरू होते आणि जिथे घटना घडत आहे तिथला क्रमांक एसएमएसद्वारे सुरक्षा
दलांना पाठवते. जीपीएसद्वारे लोकेशन पाठवून मदतीची हाक देता येते. त्यामुळे नजीकच्या
पोलिस स्टेशनशी संपर्क साधता येतो.
याव्यतिरिक्त एसओएस अॅप
आहे. हे स्टेसेफ अॅप डाऊनलोड केल्यानंतर पॉवर बटणच्या आधारे आपोआप सुरू होते आणि
तीन वेळा पॉवर बटण दाबल्यास आपत्कालीन परिस्थितीत आपला क्रमांक मेसेजद्वारे पाठवता
येतो. ज्या व्यक्तीने एसएमएस पाठवला आहे त्याची जागा शोधण्यातही पोलिसांना यश
येते. याशिवाय विथ यू नावाचे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे दोन
वेळा बटण दाबल्यास लोकशनसह मोबाईल नंबर पाठवता येतो. यामध्ये आपला नवरा, मित्र, आई, बहिण भाऊ त्यांनाही आपल्यावरील संकटप्रसंगाची
माहिती देता येते. त्यामुळे मदत लवकर पोहोचू शकते.
वुमन सेफ्टी हे अॅप्लिकेशन
देखील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यात आपण नातेवाईकांचे क्रमांक सेव्ह करू
शकतो.
थोडक्यात अशा प्रकारच्या
अॅपमुळे आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पोलिसांची किंवा इतरांची मदत आपल्याला चटकन मिळू
शकते. अर्थात अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते कसे वापरायचे त्याची पूर्ण माहिती असणे
आवश्यक आहे. त्यासाठी ते एक दोनदा ह्या अॅप्सचा वापरही करून बघितला पाहिजे. आपला
मोबाईल क्रमांक अडचणीत आहे हे समजल्यानंतर दहा ते वीस मिनिटांत पोलिस मदतीसाठी
धावून येतात.
स्त्रियांच्या
सुरक्षेसाठी उपयुक्त संसाधने:
- राष्ट्रीय महिला आयोग: https://wcd.nic.in/
- महिला हेल्पलाइन](https://wcd.nic.in
हेल्पलाइन:
- 1091: महिलांसाठी
राष्ट्रीय हेल्पलाइन
- 1098: महिलांसाठी
चाइल्ड हेल्पलाइन
- 181: महिलांसाठी
अत्याचार मदत
- आपत्कालीन वैद्यकीय मदत: 108
- पोलिस: 100
- महिला हेल्पलाइन
(ग्रामीण): 1097
- राष्ट्रीय महिला
हेल्पलाइन: 1800-102-9912
- सखी वन स्टॉप सेंटर: 1800-180-1234
आत्मसंरक्षणासाठी
काही गोष्टींचे भान बाळगा
स्त्रियांनी
आत्मसंरक्षणासाठी अजूनही काही गोष्टींचे भान बाळगता येईल. दागिने, मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणे कटाक्षाने टाळावे. रात्री
अपरात्री प्रवास टाळावे. दुर्दैवी प्रसंग ओढावण्याची शक्यता वाटल्यास स्वसंरक्षणासाठी
वेगाने धावा, आरडाओरडा करा. जर पळणे शक्य नसेल तर हल्ला
करणार्यावर पायाने लाथ मारणे, हल्लेखोराच्या नाजूक भागावर
हल्ला कऱणे, ढकलून देणे, डोळ्यात
मिरचीपूड टाकणे आदी उपाय करू शकतो. हल्ली पेपर स्प्रे मिळतो, तो हल्ला करणार्याच्या डोळ्यावर उडवता येतो. अंधारात प्रवास करताना
टॉर्चचा वापर करणे उपयुक्त आहे. खिशात शिट्टी असेल तर हल्ला झाल्यास जोराजोरात
शिट्टी वाजवून समोरच्या त्रास देणार्या व्यक्तीला बिचकवता येते.
रात्रीच्या वेळी वाहन बंद
पडल्यास ते लॉक करून तिथेच सोडून नंतर मदत घेऊन येणे हे जास्त महत्त्वाचे आहे. बस
किंवा लोकलमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला तिथल्या तिथेच
मारणे फायदेशीर होऊ शकेल. कारण मदत करायला इतर अनेक जण असतात. आपले पैसे एकाच
ठिकाणी ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा. बस किंवा लोकलमध्ये प्रवास
करताना, रिक्षा, कॅब
मध्ये एकट्याने प्रवास करताना, निर्मनुष्य रस्त्यावर आदी
विविध परिस्थितीत स्वसंरक्षण कसे करायचे याची योजना महिलांनीच मनाशी योजली पाहिजे.
जेणेकरून आपल्यावर संकट आल्यास स्वसंरक्षण करू शकतो. त्यासाठी शालेय स्तरावरच
शारिरीक क्षमता वृद्धी हा महत्त्वाचा विषय ठरवून त्यात प्रत्येक मुलीला
आत्मस्वसंरक्षण शिकवणे गरजेचे आहे.
कृतीशील
कारवाईची गरज
बलात्काराच्या घटना
पूर्णपणाने टाळायच्या असतील तर पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवून आणायला हवा.
त्यांचा स्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी संस्काराची, प्रबोधनाची आणि समुपदेशानची गरज आहे. ही प्रक्रिया अर्थातच
खूप व्यापक, दीर्घकालीन आहे. त्याला सहजासहजी यश येणेही
तितकेचे शक्य नाही. त्यामुळे सद्यपरिस्थितीचा विचार करुन स्रियांनी
आत्मसंरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर भर देणे अधिक हितकर ठरणारे आहे.
महिलांची सुरक्षितता हा येत्या काळात महत्त्वाचा
मुद्दा असेल. त्यामुळेच प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरातील महिला आणि मुली
सुरक्षित राहाण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करायला हव्यात. कारण प्रत्येक
परिसरातील धोके वेगवेगळे असतात. त्या भागात राहाणारे नागिरकच ठरवू शकतात की
त्यांच्या भागात महिलांना कोणत्या प्रकारचे धोके आहेत. थोडक्यात आपले कुटुंबिय, सहकारी, शेजारी
राहाणारे लोक यांच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेसाठीचा आपल्या भागा पुरता आराखडा
बनवला तर त्याचा वापर करून महिलांना सुरक्षित ठेवता येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार, अनेक संस्थांनी प्रयत्न केल्यानंतर
सुद्धा बलात्कार घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये 46% वाढ झाली आहे. 2022 मध्ये
महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत 4.45 लाख गुन्हे दाखल झाले आहेत .म्हणजेच
बलात्कार आणि गुन्ह्यांमध्ये वाढत होते आहे आणि महिलांना सुरक्षित करण्याकरता
आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील.
भाग दोन मध्ये महिलांना सुरक्षित ठेवण्याबाबतीत केंद्र सरकार आणि राज्य
सरकारने केलेल्या प्रयत्नाचे अवलोकन करू.सरकारकडून मिळणाऱ्या सगळ्या सुविधांचा
फायदा महिलांनी घेतलाच पाहिजे. आतापर्यंत
फक्त 70 टक्के महिलांनी या सुविधांचा फायदा
घेतला आहे.
No comments:
Post a Comment