Total Pageviews

Tuesday, 14 May 2019

डिजिटल निवडणुका-हेमंत देसाई-PRABHAT


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्मार्ट फोन्सचा जेवढा वापर झाला, तेवढा पूर्वी कधी झाला नसेल. 2014 ची निवडणूक ही पहिली डिजिटलप्रधान निवडणूक होती. तर 2019 मध्ये समाजमाध्यमे जेवढी प्रचलित झाली होती, तेवढी ती पूर्वी कधीच झाली नव्हती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांनी समाजमाध्यमांचा वापर केला होता. भाजपची या माध्यमांवर पकड आहे. परंतु यावेळी कॉंग्रेस, तृणमूल, द्रमुक, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांनीही या माध्यमांचा भरपूर उपयोग केला आहे.
इतरांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचे निघाले. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच 2009 साली ते फेसबुक व ट्विटरवर आले. 2011 साली त्यांच्या फेसबुक पेजवर जेमतेम सहा लाख फॉलोअर्स होते. ट्विटरवरचे त्यांचे फॉलोअर्सही शशी थरूर यांच्यापेक्षा खूपच कमी होते. थरूर यांनी जागतिक संस्थामध्ये काम केले असल्यामुळे, त्यांना या माध्यमांची जाण पहिल्यापासून होती. ट्विटरवर गेलेले ते पहिले भारतीय नेते. 2014 मध्ये निवडणुका पार पडल्या, तेव्हा मोदींच्या फेसबुक पेजवर असलेल्या फॉलोअर्सची संख्या 15 लाखांवर गेली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा 
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर एवढे फॉलोअर्स असणारे मोदी हेच जगातील दुसरे नेते. विकास पांडे या कार्यकर्त्याने “आय सपोर्ट मोदी’ नावाचे, तर दुसऱ्या एकाने “नमो फॉर पीएम’ असे पेज तयार केले होते. ट्विटरवर तर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तेव्हा 42 लाखांवर गेली होती. दहापैकी पाच सर्वाधिक वाचले गेलेले इलेक्‍शन ट्विट्‌स मोदींच्या अकाउंटवरून पाठवले गेले होते. अहमदाबाद, गांधीनगर येथील व्यावसायिकांची खास टीम मोदींनी तयार केली होती आणि तीच त्यांचे ट्विटर अकाउंट व फेसबुक पेज हाताळत होती. राजस्थानमधील भिलवाडा शहरातील कॉम्प्युटर सायन्सचे व्याख्याते हिरेन जोशी मोदींच्या टीमचे नेतृत्व करत होते. किमान सहा प्रादेशिक भाषांत मोदींच्या ट्विटर अकाउंटचा अनुवाद करण्यासाठीही जोशी मदत करत असत.
आजच्या घडीला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समाजमाध्यमांवर चांगलेच सक्रिय आहेत; परंतु 2014 साली ते समाजमाध्यमांवर बिलकुल सक्रिय नव्हते. भाजपने आपला समाजमाध्यमांवरचा प्रचार मोदींच्या व्यक्‍तिमत्त्वाशी जोडला. तर कॉंग्रेसने आपली प्रचारनीती संघटनेपुरतीच ठेवली. पण समाजमाध्यमांवर संघटनेपेक्षा व्यक्‍तीच अधिक लक्ष वेधून घेतात, हे कॉंग्रेसला उशिरा कळाले. या उलट भाजपचा समाजमाध्यमांचा गट प्रयोगशील होता व आहे. मतदानाच्या प्रत्येक दिवशी ते मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणारा मोदींचा व्यक्‍तिगत संदेश ट्विटरवर पाठवत. 2019च्या निवडणुकीत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव आणि मायावती प्रभृती राजकारणीही समाजमाध्यमे परिणामकारकपणे हाताळू लागले आहेत.
यावेळी तर बूथ कार्यकर्ते व नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत सर्वजण ट्विटर, फेसबुक व व्हॉट्‌सऍपवर क्रियाशील झाले आहेत. अर्थात काहीजणांना वाटते की बॅनर्स, पॅम्पलेट्‌स, पोस्टर यांचा नेहमीसारखा सुळसुळाट नसल्यामुळे, यावेळची निवडणूक बोअरिंग झाली आहे. समाजमाध्यमे व टीव्ही स्टुडिओंमध्येच निवडणुकांचे वातावरण आहे. मोठमोठ्या सभा होत आहेत. पण त्या मुख्यतः टीव्हीवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आणि मथळे घडवून आणण्यासाठी. भारतातील स्मार्ट फोन्सच्या वापरात जबरदस्त गतीने वाढ झाल्यामुळे, छापील साहित्यापेक्षा मोबाइल व टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचार केंद्रित करण्यावर भर रहिला आहे. स्मार्ट फोनवरून कॅमेऱ्यांद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रीकरण करता येते. त्यामुळे आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकारण्यांना मुख्य धारेतील माध्यमांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. 2014 साली फेसबुक लाईव्ह हा प्रकारच नव्हता. 2016च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुक लाईव्हचा प्रथम वापर झाला आणि त्यानंतर ते लोण भारतातही येऊन पोहोचले. आज देशातील प्रत्येक पक्षाची प्रचारसभा फेसबुकवरून लाइव्ह प्रक्षेपित केली जाते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर या माध्यमाचा पुरेपूर वापर करून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांच्या सभा विविध भाषांत डब करून देशभर दाखवण्यात आल्या. एका हिंदी चॅनेलच्या संपादकाने त्यांची मुलाखत घेतली. या संपादकानेच मला सांगितले की, इतकी हिट मुलाखत गेल्या काही वर्षांत त्यांच्याकडे झालीच नव्हती. राज यांनी समाजमाध्यमांमार्फत ही मुलाखत सर्वदूर पोहोचवली. भारतात शेअर चॅट, एमएक्‍स प्लेअर, शेअरइट, डेली हंट यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. फेसबुक वा गुगलपेक्षा त्यावर जाहिरात करण्याचा खर्च कमी आहे.
2020 मध्ये अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक होईल, तेव्हा प्रचाराची आणखी नवी तंत्रे उदयास येतील आणि 2014च्या भारतातील निवडणुकांत तंत्रज्ञानाचे नवे चमत्कार बघायला मिळतील. देशातील इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. तसेच इथल्या इंटरनेटचा वेग चांगला नाही आणि रेंजही बरेचदा जात असल्याचा अनुभव येतो. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे मतदारांच्या आवडीनिवडी, प्राधान्ये, त्यांचे प्रश्‍न याबद्दलची नेमकी माहिती मिळू शकते. मतदारसंघनिहाय आकडेवारी सहजपणे उपलब्ध होते आणि त्यानुसार व्यूहरचना आखणे शक्‍य होते. अर्थात समाजमाध्यमांच्या वापरासाठीही तंत्रज्ञांच्या टीमवर खर्च करावा लागतो. मात्र, पूर्वीच्या कंठाळी प्रचारापेक्षा आणि गोंगाटापेक्षा समाजमाध्यमावरील प्रचार हा कमी त्रासदायक असतो. मात्र, लोकांशी व्यक्‍तिगत संपर्क आणि त्यांच्या व्यथावेदना जाणून घेणे याचेही वेगळे महत्त्व आहेच. व्यावसायिकता व तंत्रज्ञानाचा वापर यातून राजकीय पक्ष व मतदार यांच्यातील नाते घट्ट होण्याऐवजी त्यात तुटकपणा आला, तर ते दुर्दैव ठरेल

No comments:

Post a Comment