भारताचे चंद्रावरचे लांबणीवर पडलेले दुसरे प्रक्षेपण (चांद्रयान-२) बहुधा ९ जुलै ते १६ जुलैच्या दरम्यान केले जाणार आहे व चंद्रावरचा भूमीप्रवेश ४५ ते ५० दिवसांनी, ६ सप्टेंबरला होईल. या श्रीहरीकोटा येथून सोडल्या जाणाऱ्या एसएलव्ही एमके-३ अंतराळ यानयुक्त चांद्रमोहिमेच्या प्रवासाबरोबर 'विक्रम' नावाचा भूमीनिवेशक (lander), 'ग्रहपथी' (orbiter) व 'प्रज्ञान' नावाचा सहा चाकांचा परिभ्रमक (rover) अशी साधने बरोबर असतील. या सगळ्या साधनांचा उपयोग चांद्रभूमीच्या पृष्ठावर अनेक शास्त्रीय प्रयोग करण्याकरिता व विविध माहिती मिळविण्याकरिता होईल. ही चांद्रमोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होईल, जेथे जगामधील चीन सोडून आजपर्यंत कोणी शोध घेतलेला नाही व नेहमी पृथ्वीवरून दृष्टीस न पडणारा असा तो चंद्रावरचा ध्रुवप्रदेश आहे. चांद्रभूमीचा शोध घेणाऱ्या 'विक्रम' भूमीनिवेशकामध्ये फेब्रुवारी २०१९ मधील काही चाचण्या घेत असताना, त्याच्या चारपैकी दोन पायांना थोडे नुकसान झाले असल्याने 'चांद्रयान-२' मोहीम या वर्षाच्या पुढील अर्ध्या भागापर्यंत लांबणीवर पडली. पण, आता ती मोहीम जुलैमधील प्रक्षेपणाने साध्य होईल. ही चांद्रमोहीम राबविणाऱ्या 'इस्रो'च्या योजनेप्रमाणे 'विक्रम' भूमीनिवेशक चंद्राच्या पृष्ठभागावर ६ सप्टेंबरला 'ग्रहपथी'मधून अलगदपणे उतरविला जाईल. त्यानंतर लगेच 'प्रज्ञान' परिभ्रमकाचे पदार्पण होऊन तो ३०० ते ४०० मी. अंतर चंद्रावर फिरत असताना शास्त्रीय चाचण्या घेईल व त्यासंबंधीची चित्रे टिपून ती पृथ्वीवर पाठविण्याच्या तयारीत राहील.
'इस्रो'चे मुख्य डॉ. के. शिवन म्हणतात की, “अंतराळ क्षेत्रात भारत चीनपेक्षा तसूभरही कमी नाही. 'इस्रो' चंद्रावरचे, मंगळाचे, सूर्याचे संशोधन तसेच गगनयानाच्या निर्मितीत आता वाकबगार ठरत आहे.” दृष्टीपलीकडच्या चांद्रभूमीवर प्रथमच चीनचे अंतराळ यान पोहोचले. चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून कधी दिसत नाही, त्या भागावर चीनने प्रथमच अंतराळयान उतरवून सगळ्या जगात आघाडी घेतली आहे. 'चांग-ई ४' असे चंद्रदेवतेचे नाव असलेल्या यानाने ३ मे रोजी चीनमध्ये सकाळच्या १० वाजून २६ मिनिटाला चंद्राच्या पृष्ठभागाला भूमीनिवेशक उतरवून स्पर्श केला. हे यान पूर्व रेखांश १७७.६ अंश व दक्षिण अक्षांश ४५.५ अंश या भौगोलिक रेषांच्या छेदन-बिंदूवर होते. चीनच्या मकाऊ विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक झू मेंघूआ यांनी सांगितले की,“चीन अंतराळ संशोधन करण्याच्या क्षेत्रात उच्च पातळीवर पोहोचला आहे. २०२२ सालापर्यंत चीन त्यांचे तिसरे अंतराळ केंद्र पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे. पहिला फोटो २७ हजार किमी. वरून चिनी वेळेनुसार ३ तारखेला सकाळी ११.४० ला पृथ्वीवर आला. चीनचा पुढील चांद्रप्रकल्प 'चांग-ई ५' २०२० मध्ये होईल.” चीनने चांद्रभूमीवर पहिले हिरवे अंकुर कापसाच्या बी मधून उगवून दाखविले. पण, इतर बियांना अंकुर आले नाहीत. चिनी भूमीनिवेशकासह पाठविलेली ३ किलोग्रॅम वजनाची व १८ सेंमी. व्यासाची बादली व त्यात हवा, पाणी व माती आणि कापूस, बटाटा, अंडी व मोहरीसारख्या धान्याच्या बिया होत्या. कापसाच्या बीला आलेला अंकुर मात्र जगला नाही. भूमीनिवेशकाबरोबरच्या गेलेल्या परिभ्रमकाला 'युतू २' (दमलेला ससा) असे नाव दिले आहे. हा परिभ्रमक चंद्रावरील सुमारे २५०० किमी व्यासाचे व १३ किमी खोल अशा खडकांवर शास्त्रीय प्रयोग करून व आणखी चार चांद्रमोहिमा करून तेथील मातीचे नमुने आणेल. चीनने त्रिमिती तंत्रज्ञानाचे चांद्रभूमीवर संशोधन करावयाचे ठरविले आहे.
'चांद्रयान - २' मोहिमेची पूर्वतयारी
या मोहिमेकरिता 'जीएसएलव्ही-एमके ३' या स्वदेशातच बनलेल्या वजनदार अंतराळ यानाबरोबर अनेक साधने पाठविली जाणार आहेत. 'ग्रहपथी' चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर चंद्रावरच्या १०० किमी उंचीवर फिरत राहणार आहे. 'ग्रहपथी' एक्सरे स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने चंद्रावरील अमाप खनिजांचा शोध घेईल. सौर एक्सरे मॉनिटरच्या साहाय्याने सौर उत्सर्जनाचा धोका टाळेल व मास स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने वातावरणातील विविध द्रव्यांचा शोध घेईल, सिंथेटिक अॅपर्चर रडारच्या साहाय्याने वातावरणातील रेडिओ लाटांचा शोध घेईल, इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने पृष्ठभागावरील मोठ्या प्रमाणातल्या पाण्याचे मापन करेल आणि मोठ्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे तिन्ही दिशांनी व दोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने चंद्राचा नकाशा तयार करेल. 'विक्रम' भूमीनिवेशक चंद्रभूमीवर उतरल्यानंतर चंद्राच्या दक्षिण धु्रवापासून ६०० किमी. अंतराचे स्थान शोधेल, चांद्रभूमीवरील कंपनांचा शोध घेईल आणि पृष्ठभागावरच्या उष्णतेच्या गुणधर्माचे निरीक्षण करेल. विक्रम भूमीनिवेशकाकडून विविध उपकरणांद्वारे चंद्रावरील भूकंपांचे संशोधन, उष्णतेची नोंदणी, रेडिओ अॅनॉटॉमी, वातावरणातील प्लास्माच्या घनतेची नोंदणी इत्यादी करेल. प्रज्ञान परिभ्रमक कामाला लागल्यावर चंद्राच्या जमिनीची पाहणी करेल. परिभ्रमकात लेसरप्रभावित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोमीटर आणि अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर अशी दोन मुख्य उपकरणे असतील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या खोल बर्फाचे व पाण्याचे संशोधन करेल; २०१८ मधील सात यशस्वी विविध शोधमोहिमांनंतर 'इस्रो' आता २०१९ मध्ये ३२ शोधमोहिमा हाताळणार आहे. परंतु, प्राधान्य मात्र 'चांद्रयान-२' या मोहिमेला असेल. मानवासह गगनयान सोडण्याची योजना त्यानंतर हाताळली जाईल. 'चांद्रयान-२' मोहिमेतून विज्ञानाला नवी दिशा मिळेल, असा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल भारद्वाज यांना विश्वास वाटतो. 'चांद्रयान-२' मध्ये अद्यावत तंत्रज्ञान व उपकरणे असल्यामुळे पाणी, क्षार इतकी सूक्ष्म माहितीही आपल्याला मिळू शकणार आहे.
'इस्रो'ची 'गगनयान योजना' २०२१-२२ मध्ये
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून भारताच्या जड अशा 'जीएसएटी २९' यानाने नोव्हेंबर २०१८ मध्ये यशस्वीपणे अंतराळात केलेल्या उड्डाणामुळे जड यान सोडण्याच्या प्रगतीला हातभार लागला. 'जीएसएलव्ही मार्क ३' या अंतराळयानाची 'जीएसएलव्ही मार्क २' पेक्षा दुप्पट वजन पेलण्याची कार्यक्षमता आहे. पायरी पायरीने 'इस्रोे'ने अंतराळयानांची प्रगती करून त्यांची पे लोड वजन पेलण्याची क्षमता खालीलप्रमाणे आहे- एसएलव्ही ३ (४० किग्रॅ), एएसएलव्ही (१५० किग्रॅ), पीएसएलव्ही ४० (१८६० किग्रॅ), जीएसएलव्ही मार्क २ (२२०० किग्रॅ) व जीएसएलव्ही मार्क ३ (४००० किग्रॅ). त्यामुळे 'जीएसएलव्ही मार्क ३' ला इस्रोमध्ये 'बाहुबली' म्हणतात. या गगनयान योजनेकरिता तीन वेगळ्या समुदायातील अंतराळयाने प्रमाण परीक्षेत पसंत केली जातील. प्रत्येक समुदाय तीन-तीन अंतराळ मोहिमा पार पाडेल. यातील दोन समुदाय विनामानव असतील, ज्यात प्रायोगिकतेकरिता मानवी आकाराचा रोबो ठेवला जाईल. ज्या अंतराळयानात मानव असतील, त्याला यापुढे 'गगनयान' म्हटले जाईल. गगनयानात तीन भारतीयांना बसविले जाईल व ते यान कमी उंचीचा ग्रहपथीचा प्रवास पाच ते सात दिवस करेल. 'गगनयान' केबिनमधील तपमान २३ + वा - २ अंश व त्यातील सापेक्ष आर्द्रता ४० ते ६५ अंश ठेवलेली असेल. या सगळ्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' प्रकल्पाला केंद्र सरकारने संमती देऊन सुमारे रु. दहा हजार कोटींचा निधीदेखील मंजूर केला. 'गगनयान' भरारी डिसेंबर २०२१ वा २०२२ या वर्षात केली जाईल. अंतराळात झेप घेण्यासाठी भारत सज्ज असून तीन भारतीय अंतराळवीर सात दिवस अवकाशात वास्तव्य करणार आहेत. ही 'इस्रोे'ची गगनयान मोहीम यशस्वी झाली, तर अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याची क्षमता बाळगणारा भारत हा चौथा देश ठरेल. या मोहिमेकरिता भारताला फ्रान्स व रशियाचे साहाय्य होणार आहे. या प्रांतात भारताने २००८ पासून पूर्वतयारी सुरू केली असून त्यासाठी आजपर्यंत १७३ कोटी खर्च केला आहे. या अंतराळवीरांना भारत 'व्योमनॉट्स' म्हणणार आहे. 'व्योमनॉट्स'करिता खास पोशाख बनविण्याची कलाही आत्मसात केली आहे.
या 'गगनयान' प्रकल्पाकरिता बंगळुरूला एक केंद्र स्थापले आहे. या २०१९ सालात अंतराळयानाच्या ३२ मोहिमा पार पाडल्या जातील. या 'गगनयाना'च्या 'व्योमनॉट्स'मध्ये स्त्रियांचा समावेशही असणार आहे. परंतु, हे सर्व 'व्योमनॉट्स' पायलट शिक्षण घेतलेले व अनुभवी असतील. सबंध विश्वात सात वेळेला अंतराळात जाऊन कमाल उच्चांक नोंदणी करणारे 'नासा'मधील 'व्योमनॉट्स' जेरी रॉस यांनी भारतीय व्योमनॉट्सना पूर्ण मदत व पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारतीयांनी स्टेममध्ये (सायन्स, तंत्रज्ञान, आभियांत्रिकी व गणित विषयात) पारंगत होणे जरूरी आहे. इंडियन एअर फोर्सचे इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्कोप मेडिसीनतर्फे अंतराळवीरांना वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्था केली जाईल. अंतराळात जीवनावश्यक मदत वेगळ्या तंत्राने करावी लागते व या 'आयएएम' संस्थेकडे सिम्युलेटरसारखी साधने असल्यामुळे 'इस्रो'ने या संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. अशा तर्हेने आपण आता 'चांद्रयान -२' व 'गगनयान' प्रकल्पाची वाट बघूया
No comments:
Post a Comment