पोलिसांना चिलखते पुरवा!
Saturday, September 03rd, 2016
रस्त्यावरचा पोलीस हाच राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा कणा आहे. हा कणाच मोडून पडला तर राज्य मोडून पडायला वेळ लागणार नाही. एक विलास शिंदे जात्यात भरडला गेला, पण असंख्य विलास शिंदे सुपात आहेत. गृहखात्याला त्यांच्या अंगावरील वर्दीला बळकटी तसेच प्रतिष्ठा द्यावीच लागेल. पोलिसांवरील असे हल्ले ‘हेल्मेट’सारख्या प्रकरणांवरून सुरूच राहिले तर पोलिसांना ‘वर्दी’ऐवजी चिलखते पुरवावी लागतील. विलास शिंदे प्रकरणाचा हाच धडा आहे.
हेल्मेटसाठी हौतात्म्य
पोलिसांना चिलखते पुरवा!
हवालदार विलास शिंदे अनंतात विलीन झाले आहेत. कर्तव्य बजावताना मुंबईच्या रस्त्यावर त्यांच्यावर समाजकंटकांनी हल्ला केला. आठवडाभर मृत्यूशी झुंज देऊन शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिंदे यांना सरकारी इतमामात अखेरचा निरोप दिला. शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त मुंबईतील शिंदे यांच्या घरी गेले. शिंदे यांना ‘शहीदा’चा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी हे खरोखरच शक्य आहे काय? मुख्यमंत्री घोषणा करून बसले व मंत्रालयातील कर्मचारी वर्ग समाजकंटकांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा देणारा नियम व कायदा आहे काय, ते शोधण्याच्या कामास लागले आहेत. पोलीस शिपायांना शहीद घोषित करण्याचा कोणताही ‘सरकारी अध्यादेश’ म्हणजे ‘जीआर’ अस्तित्वात नसेल तर मुख्यमंत्र्यांना तो काढावा लागेल व त्यासाठी दुसर्या विलास शिंदेंच्या हौतात्म्याची वाट पाहण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ले करून त्यांना मारले जात असेल तर राज्याला हा प्रकार शोभणारा नाही. मारलेल्यांना फक्त ‘शहीद’ घोषित करून जबाबदारी झटकता येणार नाही.
तिकडे कश्मीरात
अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले जाणारे ‘जवान’ शहीद होत आहेत तर महाराष्ट्रात टिनपाट गुंडा-पुंडांच्या हल्ल्यात आमच्या पोलिसांची जीवनयात्रा संपत आहे. ‘हेल्मेट का घातले नाही?’ असे विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मोटरसायकलस्वारास विचारले व त्यातून झालेल्या हल्ल्यात शिंदे यांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणजे पोलिसांना काम करू द्यायचे नाही. पोलिसांच्या सूचना व कायद्याची बूज राखायची नाही असे ठरवणारी ‘जमात’ येथे माजली आहे. पोलिसांच्या अंगावर मोटरसायकली घालून त्यांना जखमी केले जाते. रात्रीच्या वेळी हे ‘बाईकर्स’ पोलीस व कायद्याची पर्वा न करता मुंबईतील विशिष्ट भागात सुसाट वागतात. त्यांना अडवले तर दंगली भडकतील म्हणून प्रकरणे दाबली जात असल्याची आमची माहिती आहे. हा सर्व हिरव्यांचा हैदोस असून पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याचे प्रकार ठरवून सुरू आहेत, असे म्हटले तर कुणाची धर्मनिरपेक्षता उगाच फसफसू नये! शिंदे यांना अखेरची मानवंदना दिली जात असताना मुंबईत आणखी दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. नवी मुंबईतदेखील असा प्रकार घडला. राज्यात खाकी वर्दीचे असे धिंडवडे निघत असतील तर
जनतेच्या आयुष्याचे व सुरक्षेचे तीनतेरा
वाजायला किती वेळ लागणार? मृत पोलिसांना फक्त शहीदाचा दर्जा देऊन हे धिंडवडे थांबणार नाहीत. पोलिसांचे मनोबल खच्ची झाले आहे व राजकीय हस्तक्षेत वाढला आहे. हे सर्व पाहिल्यावर गृहमंत्री म्हणून पोलिसांचे नेतृत्व केलेल्या बाळासाहेब देसाईंची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. मात्र गेल्या काही वर्षांत आपापल्या माणसांची भरती व बढती हेच गृहखात्याचे काम झाले आहे. राजकीय विरोधकांवर पाळत व स्वकीयांवर नजर ठेवणे या पलीकडेही पोलीस खात्यांचे काम आहे. रस्त्यावरचा पोलीस हाच राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा कणा आहे. हा कणाच मोडून पडला तर राज्य मोडून पडायला वेळ लागणार नाही. एक विलास शिंदे जात्यात भरडला गेला, पण असंख्य विलास शिंदे सुपात आहेत. गृहखात्याला त्यांच्या अंगावरील वर्दीला बळकटी तसेच प्रतिष्ठा द्यावीच लागेल. पोलिसांवरील असे हल्ले ‘हेल्मेट’सारख्या प्रकरणांवरून सुरूच राहिले तर पोलिसांना ‘वर्दी’ऐवजी चिलखते पुरवावी लागतील. विलास शिंदे प्रकरणाचा हाच धडा आहे. एका ‘हेल्मेट’वरून मुंबईचा पोलीस शहीद झाला. तुकाराम ओंबळे कसाबसारख्या अतिरेक्यांना पकडताना शहीद झाले. पोलिसांना क्षुल्लक कारणासाठी ‘शहीद’ व्हायला भाग पाडू नका. त्यांनाही आई-वडील, पत्नी, मुले आहेत, एवढे भान गृहखात्याने ठेवावे.
- See more at: http://www.saamana.com/sampadkiya/polisana-chilkhate-purva#sthash.3c93AM9u.dpuf
No comments:
Post a Comment