Total Pageviews

Wednesday, 28 September 2016

लष्कराला त्याच्या निवडीच्या जागी, वेळी आणि त्याच्या स्तरावर पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.


काश्मीारमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया अनेक वेळा केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पठाणकोट इथं झालेला आणि गेल्या आठवड्यातला उरी इथं झालेला हल्ला हा दहशतवादी कारवायांचा ‘परिपाक’ म्हणायला हवा. या पार्श्वलभूमीवर आपल्या देशानं आता काय करायला हवं, कुठले पर्याय आपल्यासमोर आहेत याचा हा वेध... जम्मू-काश्मीठरची राजधानी श्रीनगरच्या पश्चिधमेला बारामुल्ला हे भारतीय सीमेजवळचं शहर. तिथून पश्चिाम दिशेला जाणारा रस्ता उरीमार्गे, वायव्य दिशेला जाणारा रस्ता तंगधारमार्गे आणि उत्तरेला जाणारा रस्ता नौगाममार्गे भारत-पाकिस्तानमधल्या ताबारेषेपर्यंत जातो. त्यापैकी पश्‍चिमेला जाणारा बारामुल्ला ते पाकिस्तानव्याप्त काश्मीशरमधला डोमेल-मुझफ्फराबाद हा मार्ग. त्याच्या पूर्वेला रस्त्याला अगदी लगटून झेलम नदी पूर्व-पश्चिपम दिशेत वाहते. याच मार्गानं २२ ऑक्टोाबर १९४७ च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं वायव्य प्रांतातल्या पाच हजार भाडोत्री टोळीवाल्यांना हाताशी धरून जम्मू-काश्मी्र राज्यावर अचानक धाड घातली होती. डोमेलच्या पूर्वेला काही अंतरावरच असलेल्या उरी नाल्यावरचा पूल जर त्या काळातल्या जम्मू-काश्मी र राज्याच्या सैन्यानं वेळीच उडवला नसता, तर ती टोळधाड पहाटेपर्यंत श्रीनगरला पोचली असती आणि संपूर्ण काश्मीडर पाकिस्तानच्या हाती गेलं असतं. नवीन हंगामी पूल उभा केल्यावरच त्यांची आगेकूच जारी झाली. त्या वेळी छोटं गावच असलेल्या बारामुल्लाला ही टोळधाड पोचल्यावर शहर कधीच न पाहिलेल्या त्या अधमांचे डोळे तिथला झगमगाट पाहून दिपून गेले आणि चेकाळलेल्या त्या टोळीवाल्यांनी बारामुल्लाची अक्षरशः चाळण केली. अनिर्बंध लुटालूट आणि बलात्कारांचं सत्र तब्बल ४८ तास सुरू राहिलं. अशातच तीन दिवस गेले. त्यादरम्यान भारतीय लष्कर विमानानं श्रीनगर विमानतळावर दाखल झालं आणि तोपर्यंत श्रीनगरच्या जवळपास पोचलेल्या शत्रूला मागं रेटत त्यांनी उरी नाल्याच्या पश्चि मेला १३-१४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कमान चौकीपर्यंत नेलं. त्यानंतर मात्र दुर्दैवानं भारतीय लष्कराला त्यापुढं न जाण्याचे आदेश देण्यात आले आणि तेव्हापासून कमान पुलाच्या पश्चिामेला जम्मू-काश्मीभरचा प्रदेश पाकिस्तानच्याच ताब्यात राहिला. याच इतिहासप्रसिद्ध उरी नाल्यावर वसलेलं छोटं गाव उरी. गावाच्या उत्तरेस झेलमच्या खोऱ्यात माहूर इथं एक हायडेल प्रोजेक्टस स्टेशन आहे. काश्मीीरमध्ये इतर काही ठिकाणी अशांतता असली तरी उरी परिसरातले रहिवासी मात्र सदैव गुण्यागोविंदानं नांदत आले आहेत. भारत-पाकिस्तानदरम्यानची ताबारेषा किंवा नियंत्रणरेषा (ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा नव्हे) उरीला दक्षिण, पश्चिसम आणि पूर्व दिशांच्या बाजूंनी वळसा घालते. उरीच्या पश्चिकमेकडच्या डोंगरसरीवर सीमेच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराच्या १२ इन्फंट्री ब्रिगेडचे मोर्चे आहेत. त्यांची ठिकाणं अत्यंत संवेदनशील आहेत हे सांगण्याची आवश्य्कताच नाही. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी अधूनमधून केलेली छोटी-मोठी घुसखोरी ‘१२ ब्रिगेड’नं यापूर्वी हमखास हाणून पडली आहे; परंतु म्हणावा असा एल्गार त्या भागात १९४७ नंतर कधीच घडला नाही. काळवंडलेला रविवार १८ सप्टेंबर २०१६ चा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. तसा ताबारेषेवरच्या दोन्ही बाजूंच्या मोर्चांमध्ये गोळीबार वारंवार सुरूच असतो. उरीचे रहिवासी त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत; परंतु त्या दिवशी पहाटे साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण परिसर दुमदुमून टाकणारे स्फोट काही वेगळेच होते. त्या भल्या पहाटे दहशतवाद्यांनी डाव साधला आणि ब्रिगेडच्या पिछाडीला असलेल्या पथकांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या अधिक्षेत्रात इतक्याा आतल्या गोटात इतक्याक बेडरपणे प्रथमच झालेला गेल्या दीड-दोन दशकातला हा सगळ्यात मोठा प्राणघातक दहशतवादी हल्ला होता. पाकिस्ताननं धाडलेल्या या भाडोत्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची पहिली बातमी क्षोभ उसळवणारी होती. वेगानं पसरणाऱ्या अर्ध्या-कच्च्या बातम्यांनुसार, १७ भारतीय जवान हुतात्मा झाले होते आणि अनेक जखमी झाले होते. या बातमीचे पडसाद देशभर उमटले. संतापाची आणि निषेधाची तीव्र लाट उसळली. ‘हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही’ असं सांगितलं गेलं. ‘एका दाताच्या बदल्यात आम्ही (शत्रूचा) पुरा जबडाच फोडू’ अशी धमकी दिली गेली. विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे आणि लोकशाहीच्या ‘प्रघाता’नुसार जराही वेळ वाया न घालवता या सगळ्याच प्रकाराचा दोष सत्ताधारी पक्षाच्या माथी मारण्यात आला. ‘पाकिस्तानला ताबडतोब इंगा दाखवावा’ अशा धर्तीच्या त्वेषपूर्ण विधानांच्या‘कॉमेंट’ ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर (सोशल मीडिया) उमटल्या. सरकारला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा तर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नुसता पूर आला. ‘या निर्घृण हल्ल्यामागं असलेल्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही,’ अशी सुस्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ‘पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे,’ याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. ज्याला या हल्ल्याची प्रत्यक्ष झळ पोचली होती, त्या भारतीय लष्कराची प्रतिक्रिया अत्यंत धीरगंभीर होती. ती अशी ः ‘आम्ही आमच्या जवानांच्या बलिदानाची निश्चियत परतफेड करू; परंतु स्वस्थचित्तानं केलेल्या व्यावसायिक लष्करी विश्ले षणानंतर आणि आम्हाला अनुरूप असलेल्या वेळेनुसारच. तो निर्णय कोणत्याही भावुकतेवर किंवा ‘प्राइम टाइम’ वाहिन्यांवरच्या चर्वितचर्वणावर आधारित नसेल.’ भारतीय लष्कराच्या परिपक्वतेचं ते उत्तम उदाहरण होतं. पाकिस्तानी आणि भारतीय लष्कराच्या प्रकृतिगुणात जो जमीन-आसमानाचा वेगळेपणा आहे, त्याची ती ठळक खूण होती. दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद बातमीमुळं सारा भारत पेटून उठला होताच; परंतु दिल्ली अक्षरशः खडबडून जागी झाली होती. उरीमध्ये नेमकं काय घडलं? पाकिस्तानचा यामागं खरोखरच हात होता का? हीच वेळ का निवडली गेली? प्रत्युत्तरासाठी भारताकडं कोणते पर्याय आहेत? अलीकडच्या काळात पाकिस्ताननं भारताला असंच डिवचलं होतं; परंतु आपण तेव्हाही काहीच का करू शकलो नाही? मग या वेळी विशेष असं काय बदललं आहे? भारतानं प्रत्युत्तर दिलं तर त्याचे काय परिणाम होतील? या हल्ल्याच्या प्रत्युत्तराचं पर्यवसान भारत-पाकिस्तानमधल्या युद्धात तर नाही होणार? भारतीय लष्कर सुसज्ज आहे का त्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी? आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा लाभेल का? आणि पाकिस्तानसारख्या माथेफिरू देशानं अण्वस्त्रांचा वापर केला तर...? असे एक ना दोन, अनेक प्रश्नि ऐरणीवर आले... नेमकं काय घडलं? उरी आणि आजूबाजूचा परिसर पीरपंजाल पर्वतराजीच्या कुशीत वसलेला आहे. त्या भागातली ताबारेषा उरीच्या पश्चिणमेला तीन-चार किलोमीटरवरच आहे. उत्तरेला उरी आणि दक्षिणेला पूंछ. या दोन भारतीय गावांच्या दरम्यान ताबारेषा उरीनंतर पूर्वेकडं भारतीय प्रदेशाच्या बाजूला वळते आणि कंसाकाराची आकृती बनवत दक्षिणेस पूंछला मिळते. नकाशावरच्या या पाकिस्तानच्या बाजूनं असलेल्या फुगवट्याला ‘उरी-पूंछ बल्ज’ असं नाव आहे. त्यामुळं उरी आणि पूंछ यांच्या दरम्यान असलेला रस्ता पाकिस्तानव्याप्त काश्मी रमध्ये गेला आहे. या रस्त्यावर असलेली हाजीपीर खिंड १९६५ च्या युद्धात भारतानं जिंकली होती; परंतु युद्धबंदीच्या करारानुसार ती खिंड आणि या फुगवट्याचा भाग भारतानं पाकिस्तानला परत केला होता. हा फुगवटा (बल्ज) आता पाकिस्तानच्या ताब्यात आहे. याच भागातून उरी आणि पूंछच्या दिशेनं घुसखोरी करणं पाकिस्तानला शक्यग होतं. उरीनंतर चढण सुरू होते. उरी-कमान रस्त्याच्या पश्चि्मेच्या डोंगरसरीवर ‘१२ ब्रिगेड’नं संरक्षणफळी उभारली आहे. त्यांचे मोर्चे ताबारेषेच्या मागं आहेत. संपूर्ण ताबारेषेवर भारतानं काटेरी कुंपण उभारलेलं आहे. त्यामुळं जरी घुसखोरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला असला, तरी डोंगरामध्ये वाहणाऱ्या नाल्यांच्या जागी कुंपणाखालून निसटता येतं. त्या भागात पाच-सहा माणसांच्या टोळीला एकेक करून ताबारेषा पार करता येते. कदाचित ताबारेषेच्या पार असलेल्या सुमारे ५०० लोकसंख्येच्या सुखदार या खेड्यामार्गे १५-१६ सप्टेंबरदरम्यान चार दहशतवादी उरीमध्ये पोचले असावेत. एक-दोन दिवस त्यांनी टेहळणी केली असावी. त्यांना उरीमधल्या भारतीय पलटणीच्या हालचालीची सविस्तर माहिती ‘१२ ब्रिगेड’च्या छावणीत काम करणाऱ्या एखाद्या स्थानिक हमालाकडून वा तिथं रोजंदारीवर काम करणाऱ्या एखाद्या कामगाराकडून मिळाली असावी. ज्या सहजतेनं त्यांनी आपली लक्ष्ये निवडली आणि ते छावणीत फिरू शकले, त्यावरून हा स्थानिक वाटाड्या त्यांच्याबरोबर हल्ला सुरू होईपर्यंत राहिला असावा यात शंका नाही. अर्थात सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक जीपीएस उपकरणांच्या साह्यानं तसंही अचूक मार्गदर्शन साधता येतंच. ‘१२ इन्फंट्री ब्रिगेड’च्या हाताखालच्या ‘१० डोग्रा’ या बटालियनचा तिथला कार्यकाल संपला असल्यामुळं (साधारण अडीच ते तीन वर्षं) तिच्या जागी ‘६ बिहार’ ही पलटण तिची जागा घेण्यासाठी दाखल झाली होती. या दोन्ही तुकड्यांचे जवान एकमेकांच्या कामाची अदलाबदल पूर्ण होईपर्यंत एकत्र राहणं आवश्य क असल्यामुळं तिथं जागेची काहीशी चणचण होणं साहजिकच होतं. त्यामुळं ‘६ बिहार’चे काही जवान भोजनगृहात राहत होते. ते प्रामुख्यानं कारागीरवर्गातले (ट्रेड्‌समेन) होते. लढण्याच्या बाबतीत ते विशेष पारंगत नसतात. या सर्व बाबींची अचूक माहिती हल्लेखोरांना होती. अर्थातच ती त्या वाटाड्याकडूनच मिळाली असणार. त्यामुळं ‘प्रथम यांच्यावर हल्ला चढवायचा आणि नंतर अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर जाऊन तिथं घाला घालायचा’ अशी दहशतवाद्यांची योजना होती. चार दहशतवादी भोजनगृहापर्यंत दबक्या् पावलांनी पोचू शकले. वाटेत त्यांनी एका सुरक्षारक्षकाची हत्या केली. भोजनगृहाला त्यांनी बाहेरून कडी लावली. त्यात केरोसिन ठेवलेलं होतं. दहशतवाद्यांनी मग त्या शेल्टरवर एकामागून एक ग्रेनेडचा मारा केला. त्या माऱ्यामुळं शेल्टरला आग लागली आणि आतल्या जवानांना मोठी इजा पोचली. हल्ल्यात मृत पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले जवान प्रामुख्यानं यापैकीच होते, याची दखल घेणं आवश्यगक आहे. स्फोटांचा आवाज ऐकून मग संपूर्ण परिसराला वेगानं वेढा टाकण्यात आला. त्यानंतर ‘४ प्यारा कमांडो’च्या (स्पेशल फोर्सेस) जवानांना तिथं उतरवण्यात आलं आणि ‘१० डोग्रा’च्या जवानांच्या मदतीनं त्यांनी चारही दहशतवाद्यांना तातडीनं कंठस्नान घातलं. ते चार आत्मघाती दहशतवादी छावणीभोवतालचं सुरक्षाकडं तोडून पोचले, यात त्या तुकडीचा कमालीचा हलगर्जीपणा झाला, यात शंका नाही. विशेष करून जबाबदारी एकमेकांकडं सोपवली जाण्याच्या अशा अदलाबदलीच्या वेळी सुरक्षिततेत ढिलाई होऊ शकते आणि त्यामुळं अधिक दक्षता घेणं आवश्यमक असतं, हे प्रशिक्षणादरम्यान बिंबवलं जातं. यात गाफीलपणा होणं ही बाब कदापि स्वीकारार्ह नाही. या सगळ्याच प्रकाराची चौकशी सुरू आहे. यातून शिकले जाणारे धडे वाया जाणार नाहीत. मात्र, बळी पडलेले जवान हे दहशतवाद्यांच्या भ्याड डावपेचांमुळं जिवाला मुकले आहेत, याची दखल घेतली गेली पाहिजे. उरीवरच्या हल्ल्यातले हे चार दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे सदस्य होते. त्यांच्याकडं सापडलेल्या सामग्रीवर पाकिस्तानच्या खुणा होत्या. मिळालेल्या दोन जीपीएसपैकी एक पिचून गेली आहे; परंतु दुसऱ्या जीपीएसची छाननी झाल्यावर हे दहशतवादी नेमके कुठून आणि कोणत्या मार्गानं आले होते, याची शहानिशा होईल. पाकिस्तानचं पितळ मग उघडं पाडता येईल. मात्र, यामागं पाकिस्तानच्या सैन्याचा हात आहे आणि हा पाकिस्तानच्या दहशतवादी राजकारणाचा एक भाग आहे, यात भारतालाच नव्हे; तर जगातल्या अनेक देशांना तसूभरही शंका नाही आणि त्याबद्दल त्यांनी एव्हाना स्पष्ट पुरावा दिलेला आहे. किंबहुना पाकिस्तानच्या आयएसआय या हेरसंस्थेनं ही एकच तुकडी नव्हे; तर पूंछच्या बाजूला दोन तुकड्या, उरीच्या बाजूनं दोन तुकड्या आणि नौगामच्या बाजूनं एक तुकडी अशा पाच तुकड्या एकाच वेळी रवाना केल्या असाव्यात, असंही निदर्शनाला आलं आहे. १९/२० सप्टेंबरला उरीमध्ये पोचलेल्या दुसऱ्या तुकडीतल्या दहाही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची बातमी आहे. त्यामुळं या पाच तुकड्यांपैकी १८ सप्टेंबर रोजीच्या तुकडीला उरीमध्ये प्राणघातक हल्ल्याचा डाव साधता आला, हे ‘१२ ब्रिगेड’चं दुर्दैवच म्हणावं लागेल. आणखी काय ! हीच वेळ का निवडली? पाकिस्ताननं या कुटिल कारस्थानासाठी सप्टेंबरची निवड करण्यामागं अनेक कारणं आहेत. त्याची सुरवात झाली ती आठ जुलैला बुऱ्हाण वाणी हा आयएसआयनिर्मित हिजबुल मुजाहिदीनचा कडवा सदस्य काश्मी रमध्ये सुरक्षा दलांकडून मारला गेल्यानंतर. काश्मीतर खोऱ्यात सरकारविरुद्ध आगीचा डोंब उसळवण्यासाठी पाकिस्तानला आयतीच मोठी संधी मिळाली आणि तिचा पाकिस्ताननं पुरेपूर फायदा करून घेतला. १९८९ आणि २०१० पेक्षाही खोऱ्यातली अंतर्गत सुरक्षास्थिती रसातळाला गेली. ७० हून अधिक नागरिक मारले गेले. फुटीरतावाद्यांच्या कारवायांना चालना मिळाली. काश्मीिरमधलं जनजीवन ‘न भूतो’ असं ठप्प झालं. प्रजाहितविरोधी असलेले पाच टक्के गट उरलेल्या जनतेवर दबाव टाकू शकले. हे सगळं पाकिस्तानच्या योजनेनुसार अनपेक्षितपणे साध्य होऊ लागलं. पाकिस्ताननं काश्मीकरमधल्या मानवी हक्कभंगाबद्दल आरोळी ठोकली आणि काश्मीषरमधल्या ‘पीडित’ जनतेच्या स्वातंत्र्यासाठी जगातल्या सगळ्या लोकशाहीप्रिय देशांना आवाहन केलं. विरोधाभासाचा तो हास्यास्पद आविष्कारच म्हटला पाहिजे! २१ सप्टेंबरला तर राष्ट्रसंघाच्या परिषदेत पाकिस्तानप्रमुखांच्या भाषणानं यावर कडी केली. भारताला चव्हाट्यावर आणण्याची स्वप्नं नवाझ शरीफ आणि राहिल शरीफ हे शरीफद्वय पाहत होते; पण १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे बलुचिस्तानचं ब्रह्मास्त्र अचानक बाहेर काढलं. मग भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाच-सहा दहशतवादी हल्ल्यांचा हा डाव आयएसआयनं आखला. त्यातला एक डाव साधला गेला असला, तरी त्यामुळं आपण स्वतःवर कोणतं अरिष्ट ओढवून घेतलं आहे, याचं जेव्हा पाकिस्तानला प्रत्यंतर येईल, तेव्हा तो देश ‘कारगिल’च्या वेळेप्रमाणेच आश्रयासाठी दारोदार भटकू लागेल. मात्र, या वेळी तरी भारत पाकिस्तानला खरोखरच धडा शिकवू शकेल काय? भारतासमोरचे पर्याय कारगिलमधल्या घोडचुकीला भारतानं तडाखेबाज प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या प्रत्येक खोडसाळपणाला भारत सडेतोड उत्तर देऊ शकलेला नाही, हे कबूल करावं लागेल; मग त्याची कारणं काही का असेनात. त्यानंतर लगोलग २४ डिसेंबर १९९९ ला आयएसआयपुरस्कृत पाच दहशतवाद्यांनी काठमांडूतून इंडियन एअर लाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचं अपहरण केलं व ते कंदाहारला नेलं. त्यातल्या १७८ प्रवाशांची आणि ११ चालकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं नमतं घेतलं आणि भारताच्या ताब्यात असलेले मौलाना मसूद अझर, मुश्ताचक अहमद झरगर आणि उमर सईद शेख या तीन कट्टर दहशतवाद्यांची सुटका केली. त्यातल्याच अझर मसूद यानं परत गेल्यावर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना निर्माण केली. १८ सप्टेंबरच्या हल्ल्यामागं याच अघोरी संघटनेचा हात आहे. त्यानंतर १३ डिसेंबर २००१ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी चक्क भारतीय संसदेवरच हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी संपूर्ण भारतीय लष्कर सीमेवर तैनात करण्यात आलं; परंतु युद्ध छेडल्यास पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्यास उद्युक्त होऊ शकेल, या कुशंकेमुळं आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबावामुळं नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हे ‘ऑपरेशन पराक्रम’ रद्द करावं लागलं. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या ११ दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईमधलं रेल्वे टर्मिनस, ताजमहाल हॉटेल, छबाड हाऊस आदी ठिकाणांवर हल्ला चढवला. त्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिक मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांपैकी एक असलेला दहशतवादी अजमल कसाब जिवंत हाती सापडला; परंतु अनेक पुरावे सादर करूनही पाकिस्ताननं काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या वर्षी दोन जानेवारीला पठाणकोट विमानतळावर हल्ला चढवला. पाकिस्तानच्या चौकशी मंडळाला या सुरक्षित जागेला भेट देण्याची मुभा देऊनही पाकिस्ताननं अजूनही कोणतीही सकारात्मक तयारी दाखवली नाही. याशिवाय गुरदासपूर, छांब वगैरे ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. एवढ्या हल्ल्यांनंतरही भारतानं यावेळीही या पाताळयंत्री आणि दगाबाज शेजाऱ्याला सौजन्य दाखवावं का? आपणच आपल्या सहनशक्तीची आणखी किती काळ कसोटी पाहणार? एका बाजूला राजकीय नेत्यांची तीव्र विधानं आणि दुसऱ्या बाजूला भारतीयांचा शिगेला पोचलेला त्वेष या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पाकिस्तानला काही ना काही प्रत्युत्तर हे भारत सरकारला द्यावंच लागेल. भारतासमोर असलेल्या पर्यायांचं गेले काही दिवस प्रचंड चर्वितचर्वण प्रसारमाध्यमांमध्ये झालं आहे. यासंदर्भात शेजाऱ्याशी होणाऱ्या संभाव्य संघर्षाच्या व्यवस्थापनाबाबत ‘संघर्षवर्धनाची शिडी’ (एस्कलेशन लॅडर) ही संकल्पना समजणं आवश्यहक आहे. कोणताही बखेडा टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात सुज्ञपणा असतो. पर्यायाच्या निवडीत तारतम्यबुद्धी आणि दूरदर्शित्व असलं पाहिजे. त्याचबरोबर पर्यायाचे परिणाम, त्यामुळं राष्ट्रहिताला पोचू शकणारी बाधा आणि ती आटोक्याूत आणण्याचे उपाय यांचं सखोल विश्ले्षण झालं पाहिजे. पाकिस्तानची दगाबाजी कितीही संतापजनक असली, तरीही प्रत्युत्तर कसं द्यायचं याविषयीचे डावपेच हे सर्व साधकबाधक घटकांच्या विचारान्ती आखले गेले पाहिजेत. केवळ फर्ड्या आणि भावुक वक्तव्याद्वारे लोकांच्या भावना भडकावणं टाळलं गेलं पाहिजे. ज्या जवानांनी देशासाठी प्राणार्पण केलं आहे, त्यांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या यातनांचा सूड घेणं हे एवढं एकच उद्दिष्ट न ठेवता या जवानांच्या बलिदानाची कित्येक पटींनी जास्त किंमत शत्रूला चुकवायला लावण्याची क्षमता आणि परत असं दुःसाहस करण्याची शत्रूला हिंमतही होणार नाही, अशी जरब त्या पर्यायात असली पाहिजे; त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घटकांचाही सखोल विचार झाला पाहिजे. भारत एक लोकशाहीभिमुख, परिपक्व आणि जबाबदार राष्ट्र आहे याचा, तसंच त्याच्या उच्चनैतिक मूल्यांचा कदापि विसर पडता कामा नये. त्याचबरोबर पाकिस्तानचं लोकशाही सरकार हे तिथल्या सैन्यप्रमुखांच्या हातातलं केवळ एक बाहुलं आहे, या वस्तुस्थितीचीही जाणीव ठेवली पाहिजे. भारतापुढं प्रामुख्यानं तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय ः परराष्ट्रसंबंधविषयक मुत्सद्देगिरीद्वारे पाकिस्तानची नाचक्की करायची आणि त्याला एकटं पाडायचं. दुसरा पर्याय ः पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आणवून त्याची कोंडी करायची आणि तिसरा पर्याय ः सामरिक किंवा लष्करी उपायांद्वारे पाकिस्तानला त्याच्या दगाबाजीची किंमत चुकती करायला भाग पाडायचं. भारत सरकारनं पहिल्या पर्यायासंदर्भात एव्हाना उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतानं अत्यंत परिणामकारकरीत्या आणि नैतिक मूल्यांवर आधारित सडेतोड परराष्ट्र धोरणाच्या जोरावर पाकिस्तानला बिनशर्त माघार घेण्यास भाग पाडलं होतं. गेल्या दोन दिवसांत भारताच्या वेगवान मुत्सद्दी मोहिमेला समाधानकारक यश लाभलं आहे. चीन वगळता सर्व मोठ्या राष्ट्रांनी आणि मुस्लिम गटाच्या प्रमुख राष्ट्रांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर टीका केलेली आहे; त्यामुळं पाकिस्तान एकटा पडला आहे. मात्र, केवळ त्यामुळं पाकिस्तान गुडघे टेकेल, असं मुळीच नाही; परंतु या राजनैतिक दबावाची अंतिम उद्दिष्टं पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध घातले जावेत आणि तो एक दहशतवादी देश घोषित केला जावा ही आहेत. मात्र, असं घडण्याची सध्यातरी शक्य ता दिसत नाही, तरीही भारत यापुढं जो पर्याय निवडेल, त्याला या प्रयत्नांमुळं आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आणि पाकिस्तानवर दबाव आला तरी खूप झालं. श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन महत्त्वाच्या शेजाऱ्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी राजकीय धोरणावर उघड टीका केलेली आहे. ही एक अत्यंत इष्ट आणि चांगली घडामोड आहे. या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात होऊ घातलेल्या सार्क परिषदेवर - भारताची इच्छा असेल तर - बहिष्कार टाकण्याची तयारीसुद्धा त्यांनी दाखवली आहे. सार्कमध्ये भारताला मुख्य स्थान आहे आणि भारत त्या परिषदेचा अलिखित नेता आहे, हे लक्षात घेता भारत असं पाऊल सखोल विचारान्तीच उचलेल. भारताचा तिसरा पर्याय सामरिक किंवा लष्करी उपाययोजनेशी संबंधित आहे. ‘‘या अघोरी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शिक्षा भोगावी लागेल,’’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर विधान अत्यंत सूचक, अर्थपूर्ण आणि हमी देणारं आहे. अशा फुशारक्यांऊचा वेळ टळल्यानंतर सोईस्कर विसर पडल्याची नजीकच्या भूतकाळातली उदाहरणं आहेत. त्याच्यामागं सयुक्तिक कारणमीमांसा होती, हे नाकारता येणार नाही. हीच आव्हानं मोदींच्या वचनपूर्तीला आडवी येणार आहेत. या पर्यायांतर्गत काश्मीोरमधल्या ताबारेषेवरच्या शस्त्रबंदीला पूर्णविराम देऊन ती जागती करणं, सैन्याच्या कमांडोंद्वारे दहशतवादी तळांवर हल्ले, सीमेवर किंवा पाकिस्तानव्याप्त काश्मीिरमधल्या लक्ष्यांवर तीव्र स्वरूपाचा तोफमारा, सीमेवरच्या पाकिस्तानी तुकड्यांवर हल्ले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भारताला सोईस्कर अशा ठिकाणी आणि वेळीच पाकिस्तानव्याप्त काश्मीारमध्ये मोठा आघात हे वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत. यापैकी खुल्या युद्धाचा पर्याय अवलंबण्याआधी भारताला सैन्यदलांच्या युद्धसज्जतेच्या पातळीत लक्षणीय वाढ करणं आवश्यलक आहे. त्यासाठी प्रचंड आर्थिक सज्जतेची आणि पुरेशा वेळेची आवश्यसकता आहे. आपली सैन्यदलं तातडीनं युद्धात उतरण्यास सक्षम नाहीत हे कटू सत्य आहे. त्यासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागेल. इतर उपायांपैकी एक-दोन कारवाया नजीकच्या भविष्यात हाती घेतल्या जातील, असं भाष्य करणं चुकीचं ठरणार नाही. लष्कराला त्याच्या निवडीच्या जागी, वेळी आणि त्याच्या स्तरावर पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यासंबंधात चर्चा करणे अप्रशस्त आहे. मात्र, पाकिस्तानला त्याच्या खोडसाळपणाची किंमत चुकवायला लावून त्याला धडा शिकवला जाईल, असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. या घटनेनंतर पाकिस्तानच्या अण्वस्त्रक्षमतेचा मुद्दा वारंवार चर्चेत आला आहे. ‘भारतानं जर पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई केली तर आम्ही आमच्याजवळच्या किमान डावपेचात्मक अण्वस्त्राचा तरी (टॅक्टिंकल न्यूक्ली्अर वेपन) वापर करू,’ अशी हास्यास्पद धमकी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी दिली. अण्वस्त्रं ही एक प्रतिरोधक शक्ती (डिटरन्स) आहे. कोणतंही जबाबदार अण्वस्त्रसज्ज राष्ट्र त्या शक्तीच्या वापराचा असा गवगवा कधीही करत नाही, यावरूनच पाकिस्तानच्या ‘परिपक्वते’ची कल्पना येते! भारताच्या तुकडीवर पाकिस्तानात वापरलेल्या अशा अस्त्रामुळं पाकिस्तानातल्या लोकांना अधिक इजा पोचेल. कितीही छोटं अण्वस्त्र असलं तरी एकदा का त्याचा वापर झाला, की अनर्थ माजेल आणि त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. ‘गरजेल तो बरसेल काय?’ ही उक्ती यासंदर्भात अत्यंत समर्पक आहे. खरंतर हा विषय अत्यंत गहन असून, त्याच्या विश्लेेषणासाठी कदाचित एवढ्याच लांबीचा लेख लिहावा लागेल. पाकिस्तानी अण्वस्त्राच्या भयगंडाचा हा भ्रामक भोपळा (न्यूक्लीलअर ब्लॅकमेल) एकदाचा फोडणं आवश्य क आहे. जोपर्यंत पाकिस्तानच्या अस्तित्वालाच आव्हान मिळणार नाही आणि ती लक्ष्मणरेषा दृष्टिपथात येणार नाही, तोपर्यंत असं कोणतंही अण्वस्त्र वापरण्यास पाकिस्तान धजणार नाही, याची हमी देता येईल. १८ सप्टेंबर रोजी उरी इथं झालेला हल्ला ही एक मोठी घटना आहे. इतर दहशतवादी हल्ल्यांसारखी ती आसमंतात विरून जाणार नाही. नजीकचा भविष्यकाळ हा यासंदर्भात घटना-घडामोडींनी भरलेला असणार आहे. त्याची वाट आतुरतेनं पाहत असताना मात्र त्या १८ जवानांच्या हौतात्म्याचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांचा आपण विसर पडू देता कामा नये!

No comments:

Post a Comment