चोख प्रत्युत्तर!
September 23, 2016067
Share on Facebook Tweet on Twitter
दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दगाबाज हल्ल्यात, लष्करी तळावर सरहद्दींच्या संरक्षणासाठी तैनातीत असलेले १८ भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया सगळ्या देशभरात उमटली आहे. देशाच्या कानाकोपर्यातून, यावर भारत सरकारने कारवाई करावी, अशी मागणी एकमुखाने होते आहे. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा द्वेष करणारे, या सरकारचे शत्रू आणि मित्र दोघेही. या घटनेचा उपयोग सरकारची बदनामी करणारे राजकारण खेळण्यासाठी करत असले, तरी बहुतांश सर्वसामान्य जनता मात्र पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, या प्रामाणिक मताची आहे. भारतामध्ये उमटत असलेल्या या तीव्र प्रतिक्रिया अजूनही उमटत असतानाच, काही इंग्रजी वेबसाईटवर एक बातमी बुधवारी झळकली आहे. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या अलिकडूनच धडक कारवाई केली आणि तेथे अभयारण्य समजून राहत असलेल्या २० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या लष्करी धडक कारवाईत लष्कराचे दोन हेलिकॉप्टर्स उपयोगात आणले गेले. अचानक झडप घालून २० आणि २१ सप्टेंबरच्या मध्यावर ही कारवाई केली. हा दणका इतका जबरदस्त होता की, पाकिस्तानने घाबरून, पाकिस्तान एअरलाइन्सची काही शहराकडे जाणारी विमाने रद्द केली. भारताच्या मोदी सरकारने दिलेला हा अभूतपूर्व दणका आहे! या बातमीची प्रसिद्धी भारतीय प्रसारमाध्यमांनी फारशी का केली नाही, हे कोडेच आहे. मोदी सरकारची बदनामी एकतर्फी करायची, लोकांच्या नजरेत हे सरकार बदनाम कसे होईल याचा अधिकाधिक प्रयत्न करायचा, अशी सुपारी घेतल्यासारखे काम करणार्या माध्यमांनी, भारतीय जनतेच्या मनातील तीव्र असंतोषावर एक सुखद फुंकर घालणार्या लष्कराच्या या धडक मोहिमेला झाकून ठेवणेच अधिक पसंद केलेले दिसते आहे. भारतीय लष्कराला लक्ष्य करत पाकिस्तानने नेहमीच आपली नीच पातळी जगजाहीर केली आहे. स्वतः उघड हल्ला करण्याची हिंमत न करता भाडोत्री गुंड, दहशतवादी यांच्याकरवी सीमेवरील भारतीय सैन्यावर हल्ले करण्याचे एक भ्याड तंत्र पाकिस्तानने सुरू केले होते. नियंत्रण रेषेची मर्यादा ओलांडून सीमेवर बेछूट गोळीबार करायचा, सीमेवरील भारतीय सैनिकांवर अचानक भ्याड हल्ला करून शिरच्छेद करायचा, झोपलेल्या सैनिकांवर बॉम्ब टाकून त्यांना मारण्याचे अतिशय भ्याड कृत्य करायचे, असल्या गोष्टी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या करवी केल्या आहेत. भारत सरकारने यापूर्वी अशा घटना घडल्या तेव्हा निषेधाचे खलिते पाठविले, इशारे दिले, मात्र प्रत्यक्ष कृती केली नव्हती. डॉ. मनमोहनसिंग यांचे युपीएचे सरकार होते त्या वेळी पाकिस्तानकडून झालेल्या अशा अगळिकीनंतर निषेधापलीकडे काही घडले नव्हते. फारतर द्विपक्षीय चर्चा बंद करण्याचा निर्णय होत असे. अशा सौम्य प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानात बसून भारतविरोधी कारवायांची आखणी करणार्या पाकिस्तानी नापाक मुत्सद्दी लोकांचे धैर्य वाढतच चालले होते. मात्र, आता भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे! नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेताच, पहिल्या क्षणापासून परराष्ट्रधोरण कमालीचे आक्रमक केले आहे. शपथविधीला शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करून जगभर एक सकारात्मक संदेश त्यांनी दिला. जगभर अनेक देशांना भेटी देऊन भारत आणि पाकिस्तानसंबंधातील भारताची सामंजस्याची, शांततेची आणि विकासाची भूमिका मोदी यांनी जगासमोर प्रभावीपणे मांडली आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी उच्चस्तरीय बोलणी, संवाद करून भारताची भूमिका शेजार्यांशी चर्चेची, संवादाची असल्याचे जगजाहीर केले. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून घडणार्या या नापाक हल्ल्यानंतर आता भारताने गुलाम काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याची जी कृती केली आहे ती लाजबाब आहे! भारताची शांततेची आणि संवादाची भूमिका ही शेजार्यांनी भारताची कमजोरी समजू नये, असा एक सज्जड इशाराच या कारवाईने शेजार्यांना दिला आहे. पाकिस्तानी लष्कराला, पाकिस्तानी भूभागाला धक्का न लावता, ज्यांच्या मार्फत पाकिस्तानी सैन्याने रडीचा डाव खेळणे चालविले आहे त्या दहशतवाद्यांना टिपण्यामध्ये एक मुत्सद्देगिरी आहे. गुलाम काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांचे पत्ते, दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांचे पुरावे भारताने अनेकदा अमेरिकेकडे दिले. मात्र, जगातील कानाकोपर्यातील दहशतवाद संपविण्याची भाषा करणार्या अमेरिकेने त्यावर काहीही केलेले नाही. असले पत्ते आणि पुरावे देत बसण्यापेक्षा दुष्ट आणि मानवतेच्या शत्रूंचे थेट निर्दालन केलेले अधिक योग्य, असा विचार करून ही थेट कारवाई केली आहे. भारतीय सैन्यातील अधिकारी आणि भारतीय लष्कराचे विश्लेषण करणारे सुरक्षातज्ज्ञ यांचे मत आहे की, भारतीय लष्कराला जर मोकळीक दिली तर पाकिस्तानला ‘दाती तृण’ धरायला लावण्यासाठी फक्त आठ दिवस पुरेत! भारतीय सैन्याची इतकी मारकक्षमता आहे. इतका अभ्यास आणि अद्ययावत तंत्र अवगत आहे. दुसर्या देशाच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे धाडस भारतीय सैन्याने दुसर्यांदा दाखविले आहे. मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर या सरकारने सैन्याला तत्काळ प्रत्याक्रमणाची जी मुभा दिली आहे, त्यामुळे म्यानमारमध्ये एकदा भारतीय सैन्याने आत घुसून बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आता गुलाम काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय शूर जवानांच्या या कारवाईने भारतातील मोदी सरकारवर ठरावीक टीका करणार्या देशातील नतद्रष्ट विरोधकांची मात्र चांगलीच दातखीळ बसणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांपैकी काहींना मोदी यांच्याबद्दल प्रचंड पोटदुखी आहे. एकीकडे मोदी सरकारने आता केवळ पाकिस्तानचा चहा पिऊ नये असे म्हणायचे आणि दुसरीकडे युद्ध हवे पण देशासाठी, निवडणुकीसाठी नको, असा अजब तर्क लावायचा, असल्या कसरती चालू आहेत. निवडणुकीसाठी युद्ध आणि देशासाठी युद्ध असला विचार या देशातील सवंग राजकारणीच करू शकतात. युद्ध झाले तर भारत जिंकून पाकिस्तानचा पराभव होईल, या चांगल्या परिणामापेक्षा निवडणुका झाल्या तर पुन्हा मोदी लाट आली, तर आपले काय होणार? या भीतीने ही मंडळी भलतीच धास्तावलेली दिसत आहेत. मात्र, असला कसलाही सवंग विचार न करता, भारत सरकारने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि भारतीय लष्कराने गुलाम काश्मीरमध्ये घुसून शत्रूच्या पोटात भीतीचा गोळा येईल अशी जी कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. भारतीय जनतेला अशाच चमकदार, विजयी कामगिरीची अपेक्षा आहे. लढणार्या सैनिकांच्या मागे या देशातील सव्वाशे कोटी जनता एकदिलाने एकच निर्धार घेऊन उभी आहे-
‘‘आक्रमकांशी झुंजत झुंजत
समरी विजयी होऊ चला;
आक्रमणा नच साहील
भारत गर्जूनी सांगू जगताला…
No comments:
Post a Comment