१. अपहरणकर्ते कॉकपिटमध्ये गेले कसे ?
९/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले होते. यातील दोन विमानांनी ट्विन टॉवर उध्वस्त केले. या चारही विमानांच्या कॉकपिटमध्ये दहशतवादी शिरले कसे हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. बहुधा दहशतवाद्यांनी विमानातील कॅबिन क्रूला चाकूचा धाक दाखवून कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात भाग पाडले असावे असे ९-११ च्या हल्ल्यावर तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. विमानाचा ताबा मिळताच दहशतवाद्यांनी त्यांनी त्यांचा कट पूर्णत्वास नेला.
२. विमानातल्या प्रवाशांनीची दिली महत्त्वाची माहिती
दहशतवाद्यांनी अमेरिकन ११, युनायटेड ७५, अमेरिकन ७७ आणि युनायटेड ९३ या चार विमानांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी नॅव्हिगेशन सिस्टम बंद केल्याने विमानाचा थांगपत्ता लागत नव्हता. अशा स्थितीत अमेरिकेतल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासमोर विमान नेमके कुठे आहेत हा प्रश्न होता. पण विमानातील प्रवाशांनी संकटाच्या काळी आपल्या आप्तेष्टांना फोन करुन आणि विमानातील एअरक्राफ्ट रेडिओ कम्यूनिकेशन प्रणालीचा वापर करत अधिका-यांना विमान अपहरण झाल्याची माहिती दिली. या संभाषणांवरुन तपास यंत्रणांना विमानात नेमके काय घडले असावे याचा अंदाज बांधणे सोपे झाले.
३. कमी प्रवासी असलेल्या विमानांचा वापर
दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या चारही विमानांमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असल्याचे समोर आले होते. अमेरिकन ११ या विमानात १५८ पैकी ८१ प्रवाशीच होते. तर युनायटेड १७५ मध्येदेखील १६८ पैकी ५६ प्रवासी होती. अमेरिकन ७७ मध्ये १७६ पैकी ५८ आणि युनायटेड ९३ मध्ये ३७ प्रवाशीच होते. कमी प्रवाशांमुळे अपहरणकर्त्यांना त्यांना नियंत्रणात ठेवणे सोपे झाले. त्यासोबतच विमानांमध्ये जास्त इंधन असेल याकडेही दहशतवाद्यांचा कल होता. जास्त इंधन असल्याने स्फोटही मोठा होईल असे त्यांचे गणित होते.
४. पाचव्या दहशतवाद्याचा प्रवेश फसला आणि अनर्थ टळला
एका विमानाच्या अपहरणासाठी पाच दहशतवाद्यांची नेमणूक केली होती. मात्र युनायटेड ९३ मध्ये पाच पैकी चारच दहशतवाद्यांना प्रवेश करण्यात यश आले. मोहम्मद काहतनी या पाचव्या दहशतवाद्याला फ्लोरिडा विमानतळावर प्रवेश दिला गेला नाही आणि त्यामुळे युनायटेड ९३ मध्ये चारच दहशतवादी शिरु शकले. हे विमान यूएस केपिटॉल म्हणजेच अमेरिकेची संसद असलेल्या भागात पाडण्याचे त्यांचे इरादे होते. मात्र विमानातील प्रवाशांनी दहशतवाद्यांना प्रतिकार केला आणि शेवटी हे विमान शँक्सविलेजवळ पडले.
५. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दुस-यांदा हल्ला
९/११ च्या हल्ल्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन मनोरे उध्वस्त झाले. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वी २६ फेब्रुवारी १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पार्किंगमध्ये एका गाडीत स्फोटक भरुन बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यात सहा जण ठार झाले होते. तर एक हजार जण जखमी झाले होते. हा हल्ला घडवणारा रमझी युसूफ या तरुणाने २५ हजार जणांची हत्या करण्याचा कट होता अशी कबुली दिली होती.
६. युनायटेड ९३ चे विमान पाडण्याचे आदेश देण्यात आले होते
युनायटेड ९३ या विमानाला पाडण्याचे आदेश तत्कालीन उप राष्ट्रपती डिक चेनी यांनी दिले होते. अमेरिकन हवाई दलाचे फायटर विमान युनायटेड ९३ हे विमान पाडण्यासाठी निघालेही होते. मात्र फायटर विमान युनायटेड ९३ पर्यंत पोहोचण्यापूर्वीच प्रवाशांनी प्रतिकार केला आणि ते विमान पडले. हे विमान संसदेच्या दिशेने निघाल्याने उप राष्ट्रपतींनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. सुरुवातीला फायटर विमानानेच युनायटेड ९३ पाडल्याचा दावा केला गेला. मात्र चौकशीअंती यात तथ्य नसल्याचे आढळून आले.
७. ओसामाला ९/११ पूर्वीच मारले असते तर…
९/११ च्या हल्ल्यापूर्वी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केनिया आणि टांझानियातील अमेरिकन दुतावासावरील हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी बिन लादेनला ठार मारण्यासाठी हवाई हल्ले करण्यास परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमध्ये हल्ले देखील केले गेले. पण ओसामा या हल्ल्यातून सुखरुप बचावला आणि त्याने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी ९/११ चा हल्ला केला. या हल्ल्याच्या अकरा वर्षानंतर अमेरिकन सैन्याच्या विशेष पथकाने लादेनला कंठस्नान घातले होते.
८. सीआयएने १९९८ मध्येच दिला होता इशारा
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने १९९८ मध्येच ओसामा बिन लादेन विमान अपहरण करुन अमेरिकेत हल्ला घडवण्याचा कट करत आहे असा इशारा दिला होता. युसूफ आणि अन्य दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी ओसामा हल्ला करेल अशी माहिती सीआयएच्या हाती लागली होती. पण याला दुजोरा मिळत नव्हता आणि १९९८ मध्ये एकदाही अमेरिकेत विमान अपहरणाचा प्रयत्न झाला नाही. यादरम्यान अमेरिकेने डिसेंबर १९९८ मध्ये ओसामाचा कसून शोध घेत हवाई हल्लेदेखील केले. पण त्यांचे हे हल्ले अपयशी ठरले.
९. अपहरणकर्त्यांचे सौदी कनेक्शन
९/११ च्या हल्ल्यावर २००४ मध्ये एक अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालातीन २८ पानं जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र ही पान जाहीर करण्यात आली असता या हल्ल्यात सौदी अरेबियातील शाही कुटुंबाचे या हल्ल्यातील कनेक्शनही समोर आले. सौदीच्या शाही कुटुंबाने अमेरिकेत राहणा-या सौदींना मदत केली. याच मंडळींनी दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप आहे. १९ हल्लेखोरांपैकी १५ जण हे मूळचे सौदी अरेबियातील आहेत.
No comments:
Post a Comment