Total Pageviews

Wednesday, 7 September 2016

शिष्टाई निष्फळ


शिष्टाई निष्फळ vasudeo kulkarni Wednesday, September 07, गेले पन्नास दिवस हिंसाचाराने होरपळत असलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करायच्या हेतूने, श्रीनगरला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची शिष्टाई, फुटीरतावाद्यांच्या चिथावणीने अपेक्षेप्रमाणेच निष्फळ ठरली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी काश्मीर खोर्‍याला दोन दिवसांची भेट देऊन, जनतेच्या भावना समजून घ्यायच्या आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित व्हावी, या दिशेने उपाययोजना अंमलात आणायचा निर्धार केला होता. काश्मीर खोर्‍यातल्या सामाजिक संस्था आणि संघटना, राजकीय पक्ष, औद्योगिक-व्यापारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन खुलेपणाने चर्चाही केली. राजधानी श्रीनगरसह संपूर्ण खोर्‍यात दररोज सुरू असलेली हिंसक निदर्शने, सुरक्षा दलावर होणारे हल्ले, दगडफेक आणि त्यामुळे लादाव्या लागणार्‍या संचारबंदीमुळे, पर्याटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे गार्‍हाणे पर्यटन व्यावसायिकांनी मांडले. संचारबंदी आणि हिंसाचारामुळे आतापर्यंत काश्मीर खोर्‍यातल्या व्यापार आणि पर्यटन व्यावसायिकांचे साडे सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही, प्रतिनिधींनी सांगितले. काश्मीर खोर्‍यात ज्यांना शांतता हवी आहे, त्यांच्याशी चर्चेला सरकार तयार असल्याचे, राजनाथ सिंग यांनी या भेटीपूर्वीच सांगितले होते. चर्चा केवळ घटनेच्या चौकटीतच होईल आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने, सरकारसह सर्वच पक्षांचे वेगळे मत कधीच नव्हते आणि नाही, असे सांगत त्यांनी जनतेला आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांनाही दिलासा दिला होता. पण फुटीरतावाद्यांच्या चिथावणीने संचारबंदी झुगारत वारंवार रस्त्यावर उतरायचा सपाटा लावलेल्या, काश्मीर खोर्‍यातल्या जनतेने या शिष्टमंडळाला विरोध दर्शवायसाठी श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शनेही केली. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना, सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी चर्चा करायचे निमंत्रण दिले होते. पण ते धुडकावून या नेत्यांनी चर्चेवर बहिष्कार घातला. तरीही जनता दलाचे नेते शरद यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी हुर्रियत परिषदेचे नेते अलिशाह गिलानी, धर्मगुरू मिरवाईझ उमर फारुख, हुर्रियतचे नेते शब्बीर अहमद शाह यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या, चर्चाही केली. पण या नेत्यांनी शांतता प्रस्थापनेसाठी कसलाही प्रतिसाद दिला नाही. नंतर या शिष्टमंडळाने जम्मूतल्या सामान्य जनता आणि विविध संघटनांच्या नेत्यांशीही राज्यात शांतता प्रस्थापनेसाठी चर्चा केली. जम्मूतल्या जनतेने केंद्र सरकारच्या शांतता प्रस्थापनेच्या मोहिमेला संपूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. दहशतवादी बुर्‍हान वणीला सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत ठार मारल्यावर, उसळलेल्या हिंसाचारात गेल्या 59 दिवसात 73 जणांचा मृत्यू झाला, तर साडे आठ हजार लोक जखमी झाले आहेत. हिंसाचाराचा हा आगडोंब थांबावा आणि राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांत फुटीरतावाद्यांनी कोलदांडा घातला असला, तरी सामान्य जनतेला मात्र शांतता हवी असल्याचे निदर्शनात आल्याने, ही भेट सफल झाल्याचा दावा या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला असला, तरी त्यात फारसे तथ्य नाही. माणुसकीचाही मुडदा काश्मीर खोर्‍यात हिंसाचाराचा आगडोंब सतत पेटता ठेवायचा आणि सामान्य जनतेची होरपळ करायची, हीच फुटीरतावाद्यांची कट कारस्थाने असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. काश्मीर खोर्‍यातल्या जनतेच्या सुख-दु:खाशी फुटीरतावाद्यांचे काहीही देणे-घेणे नाही. धर्मांध नेते, फुटीरतावादी आणि पाकिस्तानच्या सक्रिय मदतीने हिंसाचार, रक्तपात घडवणार्‍या टोळक्यांनी माणुसकीचाही मुडदा पाडल्याची राजनाथ सिंग यांनी केलेली टीका अवास्तव नाही. आपण काश्मिरी जनतेचे तारणहार आणि संरक्षक आहोत, असा डांगोरा पिटणार्‍या फुटीरतावाद्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर जनतेच्या कथित भावना व्यक्त करायला हव्या होत्या. पण ‘काश्मिरियत’ आणि ‘इन्सानियत’ झुगारून देत, जनतेला दावणीला बांधणार्‍या या नेत्यांना सामान्य जनतेची किती काळजी आहे, हेच स्पष्ट झाल्याचे सिंग यांनी सांगितले आहे. काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी हुर्रियतचे फुटीरतावादी नेते सर्वपक्षीय शिष्ट मंडळाला भेटत नाहीत, पण दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासातल्या उच्चायुक्तांशी मात्र चर्चा करतात. त्यांचे बोलविते धनी हे सीमेपार-पाकिस्तानातच असल्यानेच, काश्मीर खोरे पुन्हा एकदा हिंसाचाराच्या वणव्याने धगधगते आहे. जम्मू-काश्मीरमधल्या सत्ताधारी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस या प्रमुख पक्षांचा काश्मीर खोर्‍यातल्या जनतेशी संवादही तुटल्याचेही, या शिष्टमंडळाच्या भेटीवर जनतेनेही बहिष्कार टाकला गेल्याने उघड झाले आणि ही अत्यंत चिंतेची बाब होय! सध्या काश्मीर खोर्‍यात सफरचंदांचा हंगाम सुरू झाला असला, तरी बंद आणि संचारबंदी-हिंसाचारामुळे हजारो मेट्रिक टन सफरचंदांची काढणी आणि वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने सफरचंदाच्या खरेदी-विक्रीची सुविधा देऊ केली असली, तरी सततच्या हिंसाचारामुळे ही योजना अंमलात आलेली नाही. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने, शालीसह विविध वस्तूंची निर्मिती करणार्‍या हजारो कारागिरांची रोजीरोटी हिसकावली गेली. हॉटेल व्यवसायाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. काश्मीर खोर्‍यात प्रदीर्घ काळ सुरू असलेला हिंसाचार आणि जाळपोळ शेवटी तिथल्या सामान्य जनतेलाच भिकेला लावणारी आणि पर्यटन व्यवसायाचे दिवाळे काढणारा असल्यानेच, आणखी काही दिवसांनी सामान्य जनता भानावर येईल आणि फुटीरतावाद्यांचे जोखड झुगारून, केंद्र आणि राज्य सरकारच्या शांतता प्रस्थापनेच्या प्रयत्नांना साथ नक्कीच देईल. या आधीही प्रदीर्घ काळ बंद आणि हिंसाचाराच्या घटना घडलेल्या होत्याच, तेव्हाही फुटीरतावाद्यांनी अशीच जनताद्रोही कारस्थाने करून, सामान्य जनतेला दावणीला बांधले होते. काही झाले, तरी काश्मीर खोरे भारतापासून अलग करता येणार नाही, याची खात्री होईल, तेव्हा धर्मांध आणि फुटीरतावाद्यांच्या कारवायांना बळी पडलेली काश्मिरी जनता शांततेच्या मार्गावर येईल, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment