Total Pageviews

Monday, 20 April 2015

VIP CULTURE BEING CURBED IN MAHARASHTRA

आयपी’ संस्कृतीचा लाभ मिळावा व त्यात पावन व्हावे म्हणूनच अनेकजण राजकारणात येतात. ही जनतेशी प्रतारणा आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व ‘व्हीआयपी’ लोकांचे विमान जमिनीवर आणले. मानवंदनेचा तमाशा बंद करून त्यांनी जनतेची वाहवा मिळवली आहे. मान जनतेला द्या, वंदन जनतेला करा. खुर्ची म्हणजे अळवावरचे पाणी हे सदैव ध्यानात ठेवा. हाच मंत्र आम्ही या निमित्ताने देत आहोत. मानवंदनेचा तमाशा बंद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले काम केले आहे. मंत्री आणि अधिकार्‍यांना ऊठसूट देण्यात येणारी मानवंदना बंद करून टाकली आहे. राज्य साधेपणाने चालावे, राज्य जनतेचे आहे व जनतेतून निवडून आलेले लोकच मंत्री वगैरे होतात. मग फक्त मंत्री झाले म्हणून तो थाटमाट आणि खास मानवंदना, सलामी कशासाठी? आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही ‘व्हीआयपी’ संस्कृती राजकारणात वाढीस लागली आहे व त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडत असतो. मुख्यमंत्र्यांनी हा भार कमी करून जनतेच्या पैशांची काटकसर केली आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी वगैरे लोक महागाई, भ्रष्टाचार, प्रशासकीय मनमानीशी झगडत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीने त्यांची दैना उडाली आहे. त्यांच्या जगण्यातला सन्मान हरवून गेला आहे. मात्र राज्यकर्त्या जमातीने मानवंदना व सलाम्या घेत फिरायचे ही इंग्रजी परंपरा कॉंग्रेजी मंडळींनी पुढे नेली. ती कुणीतरी रोखायला हवी होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी ते केले. मुळात हा सर्वच प्रकार हास्यास्पद ठरत होता. मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले की त्यांना पोलिसांनी मानवंदना देण्याचा शिरस्ता होता. हे सर्व लोक जिल्ह्यात अवतरले की विमानतळावर आणि शासकीय विश्रामगृहावर ‘कडक’ मानवंदना पोलिसी बॅण्ड पथकाच्या गाजावाजासह दिली जात होती. या फौजफाट्यात ५०-६० पोलिसांचा वेळ खर्च होत असे. खर्चही वाढत असे. पुन्हा मानपानात म्हणजे मानवंदनेत काही कमतरता वाटल्यास मंत्री व अधिकार्‍यांची बोलणी ‘सलामी’ पथकास खावी लागत होती ते वेगळेच. पुन्हा हा सर्व तमाशा अनेकदा गोरगरीब जनतेसमोर होत असतो. या बड्या लोकांकडे आपली कैफियत मांडण्यासाठी गरीब लोक मोठ्या प्रमाणावर सरकारी विश्रामगृहावर जमतात, पण ‘मानवंदना’ घेऊन आपल्या ‘शयनकक्षा’त जाणारे किती मंत्री या लोकांना भेटतात व त्यांचे प्रश्‍न मार्गी लावतात हा प्रश्‍नच आहे. बरं, मंत्र्यांचा व अधिकार्‍यांचा हा थाटमाट फक्त आपल्याच देशात आहे. हे मानवंदना व सलामीचे तमाशेही आपल्याच लोकशाहीत चालत असतात. शपथेपासून अंत्ययात्रेपर्यंत सर्व काही सरकारी इतमामात व्हावे हीच या मंडळींची इच्छा असते, पण हा इतमाम मिळविण्यासाठी आपण किती झीज सोसली, लोकांसाठी काय कष्ट घेतले याचा विचार कोणी करताना दिसत नाही. साधेपणावर प्रवचने दिली जातात पण अशी प्रवचने झोडणारे ‘लोकनेते’च साधेपणाची ऐशी की तैशी करीत असतात. मंत्री व अधिकारी सरकारी बंगल्यांच्या रंगरंगोटीसाठी लाखोची उधळण करतात. ही सर्व थेरं युरोप-अमेरिका-चीनसारख्या राष्ट्रांत चालत नाहीत. युरोपातील अनेक देशांचे पंतप्रधान व मंत्री सायकलने किंवा बसने आपापल्या कार्यालयात जातात. आपल्या देशात हे शक्य नाही. आपल्या राज्यकर्त्यांना बंगला ऐसपैस आणि समुद्रकिनारी लागतो. शिवाय सरकारी गाड्यांचा ताफाही हवा असतो. गाडीवरील लाल दिवा दिवसाही पेटता पाहिजे. सभोवती सुरक्षारक्षकांचा व अधिकार्‍यांचा गराडा लागतो. असा सगळा जामानिमा असेल तरच तो ‘व्हीआयपी’ ठरतो. अशा ‘व्हीआयपी’ संस्कृतीचा लाभ मिळावा व त्यात पावन व्हावे म्हणूनच अनेकजण राजकारणात येतात. ही जनतेशी प्रतारणा आहे. या ‘व्हीआयपी’ संस्कृतीचा फटका अनेकदा सामान्य जनतेला बसतो, पण करायचे काय? मुख्यमंत्र्यांनी या सर्व ‘व्हीआयपी’ लोकांचे विमान जमिनीवर आणले. मानवंदनेचा तमाशा बंद करून त्यांनी जनतेची वाहवा मिळवली आहे. मान जनतेला द्या, वंदन जनतेला करा. खुर्ची म्हणजे अळवावरचे पाणी हे सदैव ध्यानात ठेवा. हाच मंत्र आम्ही या निमित्ताने देत आहोत.

No comments:

Post a Comment