Total Pageviews

Monday, 6 April 2015

अरबी देशांत हिंदुस्थानींची घुसमट-PROBLEMS INDIANS FACE IN ARAB COUNTRIES

अरबी देशांत हिंदुस्थानींची घुसमट चार वर्षांत केवळ सौदी अरबमधील हिंदुस्थानी नागरिकांच्या तब्बल १ लाख २४ हजार ९५१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कुवेतमधून १२ हजार ११०, कतारमध्ये ९ हजार ८७६, अमानमध्ये १ हजार ८७७, अरब अमिरातीतून ६ हजार २१२, बहरीनमधून ३ हजार ५७७, जॉर्डनमध्ये २६, येमेनमध्ये २३ आणि इराणमधून १६२ हिंदुस्थानी नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. ही केवळ सरकारी आकडेवारी आहे, पण खर्‍या पिळवणूक होणार्‍यांची संख्या याहून दुप्पट असणार यात शंका नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारात परराष्ट्रमंत्री असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी नागरिकांना पासपोर्ट मिळवण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी अनेक साध्या साध्या उपाययोजना केल्या. त्या काळी अशी स्थिती होती की, पासपोर्ट मिळवायचा असेल तर सामान्य नागरिकांना आपापल्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी खेटे घालावे लागत. वाजपेयी यांनी ही सुविधा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आकडेवारी पाहता या सुविधेचा सर्वाधिक लाभ मुसलमानांना झाला. एक म्हणजे हजयात्रा करणार्‍यांची संख्या धडाक्याने वाढली आणि दुसरे म्हणजे अशिक्षित मुसलमानांना अरबस्तानचे दरवाजे उघडले. ते आखाती देशांत नोकरी मिळवण्यासाठी जाऊ लागले. अशिक्षित असल्यामुळे त्यांना फार चांगली कामे मिळाली नसली तरी हलकी हलकी कामे करून ते दोन पैसे मिळवू लागले. आता या अरबी देशांचे दौरे करणार्‍यांत सुशिक्षित मुसलमान आघाडीवर आहेत. अरबी देशांकडे पाहता असे दिसते की, हिंदुस्थानी नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी या देशाकडे आकर्षित होतो. त्या ठिकाणी जाऊन पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते; पण अरबी देशांत जाऊन आलेल्या कोणाही मुसलमानाला विचारा, तो ‘हाय तोबा’ करत तुमच्यापुढे आपल्या तक्रारींचा पाढा वाचेल. इकडे दिवसरात्र इस्लामी भाईचार्‍याच्या गोष्टी करणार्‍या पक्षसंघटनांवर तो सर्वाधिक नाराजी व्यक्त करील. मौलाना, मशीद कमिटी सदस्य आणि राजकीय मंचावर बसलेले लोक येथील सरकार आणि सामाजिक संस्थांविरुद्ध अंतर्गत प्रचार करताना कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीत. हजयात्रेबरोबर जाणार्‍या मुस्लिम नेत्यांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी मंडळ काय करते? हिंदुस्थानात राहून येथील सरकारच्या विरोधात टीका करणे, हा त्यांना जन्मसिद्ध अधिकार वाटतो. इस्लामी संमेलनांमधून तर यांच्या जोशील्या भाषणांना बहर येतो; मात्र हेच लोक मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानी मुसलमानांवर होणार्‍या अत्याचाराबाबत का तोंड उघडत नाहीत? मुस्लिम बंधुत्व आणि भाईचार्‍याचे डोस या अरबी मुस्लिम देशांना का पाजले जात नाहीत? हिंदुस्थानी मुस्लिम पक्ष आणि राजकारण्यांना या परदेशी जाणार्‍या आणि तेथे छळल्या जाणार्‍या मुसलमान बांधवांच्या समस्या आपल्या वाटत नाहीत काय? ज्या कुवेतची स्तुती करता करता हे मुस्लिम बांधव थकत नाहीत तोच कुवेत हिंदुस्थानी नागरिक मुसलमानांवर सार्वजनिक स्वरूपात अन्याय करतो. खासगी तक्रारी तर फार दूर; हिंदुस्थान सरकारपर्यंत आलेल्या तक्रारींचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. अगदीच जुुलमी अत्याचाराच्या अशा कित्येक कहाण्या आपण पुष्कळदा ऐकल्या असतील कुवेतमधील कंपनीमालक आपल्या कामगारांशी ज्या प्रकारे व्यवहार करतात, ती कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यांच्या तक्रारींचा पाढा वाचणे, हा या लेखाचा उद्देश नाही; पण ज्या इस्लामला आपण सलामती आणि समानतेच्या धर्माचा दर्जा देतो, त्या धर्माचे लोक आपल्याच धर्मबांधवांशी कशा प्रकारे वागतात हे स्पष्ट दाखवणे हा आहे. अशा छळल्या गेलेल्यांची संख्या शेकडो-हजारो नव्हे तर लाखांत आहे. दु:ख हे की, याप्रश्‍नी मुसलमानांचा कैवार घेणारे नेते, पक्ष व संघटनांनी सडकेपासून संसदेपर्यंत कधीही यावर आवाज उठवला नाही. या आखाती देशांकडून भरपूर देणग्या मिळाल्यावर हे लोक कशाला तथ्ये समोर आणतील? काही राजकारणी आणि मौलाना तर एका हजयात्रेच्या बदल्यातही विकले जातात. आपल्या सरकार आणि सामाजिक पुढार्‍यांना तेथील लोकांच्या शेकडो तक्रारी दररोज मिळतात आखाती मुस्लिम राष्ट्रांत नोकर्‍या करायला जाणार्‍या नागरिकांचे पासपोर्ट जप्त करून घेतले जातात. वेठबिगारी, पगार न देणे, मारहाण करून कामे करून घेणे किंवा चुका झाल्यास शिक्षा करणे, अशा शारीरिक आणि मानसिक छळाच्या कहाण्या ऐकल्या की, डोळ्यांत आसवे उभी राहतात. नोकरीवर ठेवून घेताना त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र वेळेवर औषधी सोडा, दोन वेळचे अन्नही नीट मिळत नाही. अवैध नोकर्‍या करणार्‍या हिंदुस्थानींना तर डांबून ठेवले जाते. महिनोन्महिने ते लोक सूर्यप्रकाशाचे दर्शन होण्यासही मोताद होतात, अशा सर्वांच्या समस्येला वाचा फोडत त्यांच्या प्रमाणाचे गांभीर्य वाचकांच्या लक्षात आणून देणे हा या लेखाचा हेतू आहे. अशा तक्रार करणार्‍या नागरिकांना परतीचा व्हिसा मिळवायलाही मोठे कष्ट पडतात. केवळ या मुस्लिम राष्ट्रांतच नव्हे तर जगातील प्रत्येक देशात हिंदुस्थानी नागरिक नोकरीधंद्याच्या निमित्ताने पसरले आहेत. १२२ देशात आपले लोक जाऊन आपले पोटपाणी पिकवतात. मात्र मुस्लिम राष्ट्रांत त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची संख्या मोठी आहे. हजारो, लाखोंच्या संख्येने या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होतात. त्यावर काय कारवाई होते ते कळत नाही, हिंदुस्थान सरकार निश्चितच या तक्रारींची चौकशी करीत असेल, पण आपल्या अहवालात किंवा सरकारी दस्तऐवजांत त्या तक्रारींच्या निकालाची माहिती समोर आलेली दिसत नाही. - मुजफ्फर हुसेन

No comments:

Post a Comment