Total Pageviews

Monday, 27 April 2015

नेपाळला आधार द्या!

नेपाळशी हिंदुस्थानचे एक भावनिक नाते आहे. नेपाळच्या मंदिरांशी, धर्मस्थळांशी, तेथील पूर्वसुरीशी आपले नाते श्रद्धेचे आहे. सीतामाई या जनकराजाच्या कन्या. त्यांचे कूळ व मूळ नेपाळमध्येच आहे. त्या जनकपुरीवरही भूकंपाचा प्रकोप झाला आहे. नेपाळ आपलेच आहे. नेपाळला उभे राहण्यासाठी सगळ्यांनीच आधार दिला पाहिजे! नेपाळला आधार द्या! निसर्गाचा प्रकोप पुन्हा झाला असून भूकंपाने नेपाळपासून नागपूरपर्यंत सर्वत्र हाहाकार माजवला आहे. शनिवारी दुपारी नेपाळसह उत्तर हिंदुस्थान प्रलयकारी भूकंपाने हादरला. त्यातून नेपाळी आणि हिंदुस्थानी जनता थोडीफार सावरत नाही तोच रविवारी दुपारी पुन्हा दुसर्‍यांदा भूकंपाच्या हादर्‍यांनी या संपूर्ण परिसरात दहशत पसरली. या दुसर्‍या धक्क्याची तीव्रतादेखील जवळजवळ ६.७ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. शनिवारच्या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल एवढी होती. दोन्ही धक्क्यांचे केंद्रबिंदू नेपाळमध्येच आहेत. दुसर्‍या धक्क्यामुळे किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शनिवारचाच हाहाकार एवढा प्रचंड आहे की, जगाच्या पाठीवरील नेपाळ ही एकमेव हिंदू भूमी या धक्क्याने उन्मळून पडली आहे. जागोजागी इमारतींचे मातीचे ढिगारे व त्या ढिगार्‍याखाली शेकडो जीव अडकून पडले आहेत. धक्के हिंदुस्थानासही बसले आहेत. बिहार, उत्तर हिंदुस्थान, नागपूर, मध्य प्रदेश, झारखंड अशा भागांत धक्के बसून इमारतींना तडे गेले आहेत. नेपाळात आतापर्यंत दोन हजारांहून जास्त बळी गेले तर हिंदुस्थानात ५० च्या आसपास लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. राजधानी दिल्लीदेखील भूकंपाने हलली असून जीव वाचविण्यासाठी लोक रस्त्यावर व मोकळ्या मैदानांत उतरले, पण खर्‍या अर्थाने उद्ध्वस्त झाले आहे नेपाळ. काठमांडूतील ऐतिहासिक धरहरा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. जनकपुरातील प्रसिद्ध जानकी मंदिर होत्याचे नव्हते झाले आहे. एव्हरेस्ट शिखरावर चढाईसाठी गेलेले अनेक गिर्यारोहक व जवान बेपत्ता झाले आहेत. हे सर्व चित्र पाहता या भूकंपाची तीव्रता किती आहे याची कल्पना यावी. शनिवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मेट्रोने प्रवास केल्याचे आम्ही पाहिले. पण भूकंपामुळे मेट्रो काही काळ थांबवावी लागली. नेपाळ हा लहान देश आहे. निसर्गाचे वरदान त्यास लाभले आहे. पर्यटन हाच त्यांचा मुख्य आधार आहे. भूकंपाने हा आधारच नष्ट केला. हिंदुस्थानातून गेलेले शेकडो पर्यटक नेपाळमध्ये ठिकठिकाणी अडकून पडले असून त्यांना सुरक्षित कसे आणता येईल हाच खरा प्रश्‍न आहे. अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांची वाताहत झाल्याने यातून उभे राहायचे कसे? या चिंतेने नेपाळला ग्रासले असेल. नेपाळशी हिंदुस्थानचे एक भावनिक नाते आहे. नेपाळच्या मंदिरांशी, धर्मस्थळांशी, तेथील पूर्वसुरीशी आपले नाते श्रद्धेचे आहे. सीतामाई या जनकराजाच्या कन्या. त्यांचे कूळ व मूळ नेपाळमध्येच आहे. त्या जनकपुरीवरही भूकंपाचा प्रकोप झाला आहे. नेपाळात काही वर्षांपासून लाल कम्युनिस्टांचे वर्चस्व वाढले. तेथील राजा हा विष्णूचा अवतार मानला जातो, पण राजाला पदभ्रष्ट करून कम्युनिस्टांनी हिंदूंविरोधी राज्य निर्माण केेले. नेपाळचा हिंदू राष्ट्र हा दर्जा काढला व धर्मनिरपेक्ष मुखवटा लावला. पण त्यामुळे नेपाळ पुन्हा अस्थिर झाले व त्या असुरांच्या गर्तेत नेपाळचे नुकसान झाले. त्यात हा भूकंप. नेपाळ आपलेच आहे. नेपाळला उभे राहण्यासाठी सगळ्यांनीच आधार दिला पाहिजे!

No comments:

Post a Comment