Total Pageviews

Friday, 10 April 2015

SNOOPLING ON NETAJI SUBHASH CHANDRA BOSE-संतापजनक अन् लाजिरवाणेही!

संतापजनक अन् लाजिरवाणेही! या देशावर राज्य करण्याच्या इराद्यानेच त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं. इथल्या लोकांच्या मनात ठासून भरलेले प्रेम, आदराची भावना आणि मुख्य म्हणजे गांधी घराण्याविषयीचे आकर्षण याचा पुरेपूर लाभ उचलत या राजकारणाचा प्रवास अविरत सुरू राहिला. तो आजतागायत सुरू आहे. कधीकाळी नेहरूंनी ती परिपाठी चालवली. नंतरच्या काळात स्वत:चे आडनाव बाजूला सारून, लोकांना रुचेल अशा लोकप्रिय आडनावाचे बिरुद नावामागे लावून इंदिरा यांनीही गांधी नावाची जादू कायम ठेवली आणि आता प्रियंकाही लग्नानंतरचे आडनाव मागे टाकून माहेरच्या परिवाराला लाभलेल्या गांधी नावाच्या वलयाची किमया सिद्ध करायला सरसावली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने केलेल्या कथित त्याग, बलिदानाची किंमत नंतरच्या काळात सत्तेच्या रूपाने पुरेपूर वसूल करता आलेल्या, या देशातील मोजक्या लोकांमध्ये नेहरू-गांधी घराण्याची क्रमवारी फार म्हणजे फारच वरची आहे. बहुधा पहिल्या क्रमांकाचीच. या देशाचा इतिहास तपासून बघितला, तर आपल्या लक्षात येईल की, स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या कथित योगदानाच्या परिणामस्वरूप हाती आलेल्या सत्तेचा लाभ मिळवतानाही या सत्तेत आपल्याशिवाय इतर कुणी भागीदार होणार नाही, याची केवळ काळजीच या नेत्यांनी घेतली नाही, तर तशा संभाव्य नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्याची खेळीही बेमालूमपणे खेळली. इंदिरा गांधींनी तर आपल्या राजकीय कारकीर्दीत अशा बाजूला केलेल्या नामावलीची कबुलीच नंतरच्या काळात खाजगीत बोलताना दिली आहे. आता त्यांच्या पिताश्रींचा एक कारनामा उघड झाला आहे. नेहरूंच्या सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवण्याचा हा कारनामा आहे. या कारनाम्याने केवळ नेहरूंचे पितळच नाही, तर सत्ता काबीज करण्याच्या नादात त्यांनी घेतलेल्या इतरांच्या राजकीय बळींचा काळाकुट्ट इतिहासही उघडा पडला आहे. सालस, निरागस चेहर्‍यांच्या आडून त्यांनी केलेले बेरकी आणि घाणेरडे राजकारणही यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. ‘बिना खड्‌ग बिना ढाल’ स्वातंत्र्य कुणाच्या वाट्याला कधी आल्याचा दाखला जागतिक इतिहासात शोधून सापडत नाही. पण भारतात लाखो लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले, तरी गांधीजींच्या बाबतीत या खोट्या दाव्याची टिमकी वाजविणे आजही तेवढ्याच ठामपणे सुरू आहे. या उलट, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असे वास्तवाला धरून आवाहन करणारे नेते मात्र इथे त्या खोट्या दाव्यांपुढे नेहमीच उपरे ठरले. नव्हे, ठरवले गेले. असे खुले आवाहन करीत लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करणारा सुभाषबाबूंसारखा नेता इंग्रजांच्या हिटलिस्टवर असणे स्वाभाविकच. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यातही नवलाई ती नाहीच! पण या नेत्याने नेहरूंचे काय घोडे मारले होते? इंग्रजांनी सुरू केलेली जासुसी स्वातंत्र्यानंतर तब्बल वीस वर्षे सुरू राहते. पंतप्रधान असलेल्या नेहरूंना आपल्या सतरा वर्षांच्या पंतप्रधानकीच्या काळात त्याचा थांगपत्ताही लागत नाही. नेहरूंनंतरही पुढची तीन वर्षे हा क्रम तसाच सुरू राहतो. नशिबाने पंतप्रधानपद वाट्याला आलेले आणि म्हणून आयबीचा कारभार थेट सांभाळणारे पंडित नेहरू एका लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांच्या खर्‍याखुर्‍या त्याग अन् बलिदानाचा अशा पद्धतीने अवमान करतात अन् दुर्दैव असे की तेव्हाच्या पस्तीस-चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात या प्रकरणी साधा निषेधाचा सूर सुद्धा उमटत नाही. तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या जनसमर्थनाच्या रेट्यापुढे सारेच थिटे पडते. अन् इतका मोठा गंभीर प्रकार कुणाच्याही संतापाविनाच घडून विस्मरणातही जातो... सारेच अनाकलनीय आहे! कोलकात्यातील वुडबर्न पार्क आणि एल्गिन रोड वर असलेल्या सुभाषबाबूंच्या घरांवर पाळत ठेवण्याचा प्रघात इंग्रजांच्या काळातच सुरू झाला होता. घरात येणार्‍या माणसांपासून तर पत्रांपर्यंत आणि त्यांच्या देश-विदेशातील दौर्‍यांपर्यंत, सुभाषबाबूंच्या प्रत्येक हालचालीच्या बाबतीत गोर्‍यांची नजर होती. केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांवरही म्हणे इंग्रजांची करडी नजर होती. त्यांनी चालवलेल्या हालचाली, पत्रव्यवहार, भेटीगाठी या सर्वांबाबतच इत्थंभूत माहिती मिळविण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला होता. इंग्रजांच्या असल्या वागणुकीचे अप्रुप असण्याचे कारण नाही. कारण सुभाषचंद्र बोस काही एकटेच त्यांच्या हिटलिस्टवर नव्हते. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरलेला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक योद्धा हा त्यांचा शत्रू होता. शत्रूंच्या हालचालींवर पाळत ठेवणे ही राज्यकर्त्यांच्या कामाचा एक भाग आणि गरज मानली, तर इंग्रजांच्या वागणुकीचे समर्थन करता येत नसले, तरी ती निदान समजून तरी घेता येते. पण नेहरूंचे काय? त्यांनी का म्हणून सुभाषबाबूंवर नजर ठेवली? स्वातंत्र्यानंतर सारे काही बदलले, तर मग ही परिपाठी का ना बदलली? शत्रू म्हणून इंग्रजी शासनाने बोस यांच्यावर करडी नजर ठेवलेली समजता येते, पण नेहरूंनी ठेवलेल्या पाळतीचे समर्थन कसे करायचे? इंग्रज देश सोडून निघून गेल्यावर तब्बल दोन दशकं सुभाषबाबूंचे घर सरकारी ‘नजरकैदेत’ राहते. दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या अखत्यारीतील एका विभागाचे अधिकारी इमानेइतबारे हे कर्तव्य पार पाडतात. याची पंतप्रधानांना कल्पनाच नव्हती, असा दावा जर आता कुणी करणार असेल अन् त्यातून कॉंग्रेसचा, नेहरूंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर त्यावर विश्‍वास ठेवणार कोण? ही तर गुन्हेगारासारखी वागणूक असल्याची, सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने याबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे या देशातील प्रत्येक देशभक्त माणसाच्या मनातली भावना आहे. ही बातमी ऐकून जनामनात ओसंडून वाहू लागलेला धगधगता संताप त्यांच्या या प्रतिक्रियेतून व्यक्त झाला आहे. हा संताप म्हणजे स्वातंत्र्याच्या वेदीवर प्राणांची आहुती देणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या रक्ताचा थेंब न् थेंब प्रत्यक्षात जगण्याच्या इराद्याने झपाटलेल्यांच्या अनावर भावना आहेत. देश स्वतंत्र झाला होता. देशाच्या कानाकोपर्‍यात स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटविणार्‍या प्रत्येकाच्या नावाची नोंद स्वातंत्र्यवीरांच्या यादीत होत असताना सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या एका योद्ध्याच्या वाट्याला मात्र, आपल्याच लोकांनी दिलेल्या यातना आल्या होत्या. ज्यांच्या एका शब्दाखातर लोक इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढण्यासाठी मैदानात उतरले, ज्यांनी स्वातंत्र्य हे विनवण्या करून नव्हे, तर लढून मिळवायचे असते, याची शिकवण मनामनात रुजवली, विदेशी भूमीवर सैनिकांची फौज उभी करण्याची किमया लीलया केली, तो लढवय्या नेता पाळत ठेवण्याच्या लायकीचा ठरला नेहरूंच्या नजरेत? ज्यांच्या मृत्यूचे गूढ सत्ताधार्‍यांना कधी उकलता आले नाही, त्या राज्यकर्त्यांनीच एका लढवय्या नेत्याला मरणयातना दिल्याचे दुर्दैवी वास्तव मन उद्विग्न करून जाते. जे बहुधा सत्तेसाठीच स्वातंत्र्यसमरात उतरले होते, त्यांनी रचलेल्या डावात बोस यांच्यासारख्या एका खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्य सैनिकाला मात्र आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते आणि सारा देश तमाशा बघत राहतो. स्वतंत्र्याच्या सात दशकांनंतर याबाबतचे वास्तव समोर आले, तर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करायचे सोडून काही लोक पक्षाचे समर्थन अन् नेहरूंचा बचाव करीत राहतात. काही अपवाद वगळले तर, स्वतंत्र मार्ग अनुसरणार्‍यांना नेहरू, गांधी घराण्यात थारा मिळाल्याची उदाहरणे तशीही विरळाच. त्यात माणसं सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी ताठ मानेनं जगणारी असली, तर प्रश्‍नच मिटला. पण म्हणून, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान नाकारत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हालचालींवर नजर ठेवण्याची कार्यवाही नेहरूंनी जाणतेपणी करावी, तर ही तर इंग्रजांनाही लाजविणारी बाब ठरावी. लाजिरवाणी अन् संतापजनकही

No comments:

Post a Comment