Total Pageviews

Wednesday, 15 April 2015

NAXAL ATTACKS IN CHATTISGARH-जनतेचा उठाव हेच खरे उत्तर

अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने शेजारच्याच छत्तीसगड राज्यात नक्षल्यांकरवी सुरक्षा दलाच्या जवानांवर चार भीषण हल्ले चढविले जावेत आणि त्यात डझनभर जवान शहीद व्हावेत आणि हतबल होऊन या नरसंहाराकडे बघत बसण्यापेक्षा प्रशासनाला काहीही करता येऊ नये, यात केवळ प्रशासनाचाच नव्हे, तर माणुसकीचाही पराभव आहे. नक्षल्यांची दहशतच इतकी घोर की धारातिर्थी पडलेल्या जवानांचे मृतदेह जागेवरून हलविण्याचे धाडसही करविले जाऊ नये. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ज्या सातशे गावांनी नक्षलवाद्यांना प्रवेशबंदी केली त्या गावातील सारे गावकरी निश्चितच अभिनंदनास पात्र ठरतात. प्रत्यक्ष बंदुका रोखून चालून येणाऱ्या सशस्त्र बंडखोरांच्या टोळ्यांना असे नि:शस्त्र व निर्भय आव्हान जे देतात त्यांच्या धाडसाला व शौर्य वृत्तीला आपणही सलामच केला पाहिजे. देशातील दीडशेवर जिल्ह्यांत पोहोचलेली ही बंडखोरी तिच्या ३७ वर्षांच्या इतिहासात असे आव्हान प्रथमच अनुभवत असेल. नक्षल्यांचा पुंडावा मोडून काढण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीला सीमा सुरक्षा दलाच्या पलटणी उभ्या केल्या. काही राज्यांनी त्यासाठी स्वतंत्र पथकांची उभारणी केली. नक्षलग्रस्त राज्यांचे सहा मुख्यमंत्री त्यांच्या बंदोबस्तासाठी एकत्र आले. त्यांनी या बंडाचा बीमोड करण्यासाठी संयुक्त मोहिमांची आखणी केली. छत्तीसगडच्याच ‘शहाण्या’ राज्यकर्त्यांनी त्यासाठी नागरिकांच्या व आदिवासींच्या हातात बंदुका देऊन त्यांनाच शस्त्रधारी बनविण्याचा उद्योग करून पाहिला. एकट्या महाराष्ट्राच्या तुरुंगात चार हजारांवर संशयित नक्षली गेल्या काही काळापासून खितपत आहेत. मात्र एवढे सारे होऊनही नक्षल्यांचे बंड शमले नाही. सरकारांच्या या अपयशाचे महत्त्वाचे कारण आपल्या मोहिमेत त्यांनी जनतेला विश्वासात सोबत घेणे टाळले हे आहे. नक्षल्यांचे ऐकले तर सरकार मारणार आणि सरकारचे ऐकले तर नक्षली मारणार या शृंगापत्तीत आधीच दारिद्र्याने गांजलेला आदिवासींचा मोठा वर्ग सापडला होता. नक्षली बंडखोर सरकारला भीत नाहीत. त्यांना खरी भीती वाटत आली ती जनतेची व तिच्या नेतृत्वाची. पण आपले राजकीय नेतृत्व स्वत:ची सुरक्षितता सांभाळत शहर विभागातच नक्षल्यांवर आजवर टीका करताना दिसले. त्यांच्या प्रदेशात जाऊन त्यांना आव्हान देण्याचे धाडस त्यातल्या कोणी केले नाही. ज्या स्थानिक पुढाऱ्यांनी तसा प्रयत्न केला त्यांना नक्षल्यांनी थेट कापूनच काढले. नक्षल्यांना दुसरे भय आहे ते आदिवासींमधील नव्याने शिकलेल्या प्रामाणिक तरुणांचे. उद्या हे तरुण आदिवासींचे नेतृत्व करतील आणि त्या स्थितीत त्यांच्यावरील आपली पकड सैल होईल ही त्यांना भेडसावणारी खरी चिंता आहे. तसा अनुभव गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी अनुभवलाही आहे. मात्र या तरुणांची संख्या मर्यादित आहे आणि त्यांनाही शासनाचे म्हणावे तसे पाठबळ मिळाल्याचे कधी दिसले नाही. अशावेळी स्वत:चा बचाव करण्याचा एकच मार्ग त्या परिसरातील लोकांपुढे शिल्लक राहिला. तो म्हणजे आपल्या रक्षणासाठी स्वत:च पुढे होणे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी गावांनी आता तोच मार्ग स्वीकारला आहे. यातील सहाशेवर गावांना सरकारने प्रत्येकी तीन लक्ष रुपयांचे विकासानुदान देण्याचे आता जाहीर केले आहे. नक्षली अत्याचाराच्या खऱ्या व क्रूर स्वरूपाची जाणीव शहरी भागांना नाही. परिणामी त्या भागांना नक्षल्यांचे खरे स्वरूपही कधी कळले नाही. आदिवासींच्या मुलांनी शिकायचे नाही असे बजावणाऱ्या नक्षल्यांनी नववी पास झालेल्या मुलांना धाक घालण्यासाठी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या घरातली माणसे मारली आहेत. त्यांनी सरकारी नोकरी पत्करायची नाही असे बजावून त्या मुलाखतींसाठी गेलेल्या तरुणांना त्यांनी भर चौकात आणि भरदिवसा कापून काढले आहे. आदिवासी स्त्रियांनी वनविभागाची वा सरकारची कोणतीही कामे करायची नाहीत अशी बंदी त्यांच्यावर नक्षल्यांनी घातली आहे. याहून भीषण प्रकार हा की आपल्या दलातील पुरुषांची ‘भूक’ भागवण्यासाठी त्यांनी वयात आलेल्या आदिवासी मुलींचे मोठ्या प्रमाणावर अपहरणही केले आहे. या मुलींपैकी ज्या त्या जाचातून मोकळ्या झाल्या त्यांचे अनुभव कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे उभे करणारे आहे. आपल्या मुलींचा अशा अपहरणापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात लग्नाआधीच खोटी मंगळसूत्रे घालण्यापर्यंत व वयात आलेल्या मुलींना घरात डांबून ठेवण्यापर्यंतचे उपाय अनेक आदिवासी पालकांनी अवलंबिलेले दिसले आहेत. पण नक्षली अत्याचारांची जाणीव झालेला नव्या तरुणांचा एक वर्गही आता उदयाला आला आहे. जनतेचा व या तरुणांचा आताचा नक्षलविरोधाचा पुढाकार हेच नक्षली बंडखोरीला खरे व परिणामकारक ठरणारे उत्तर आहे. जनतेचा असा उठाव सर्वत्र उभा राहिला तर त्यामुळे आदिवासींचे जनजीवन सुरक्षित होतानाच देशातील लोकशाहीदेखील स्थिर व मजबूत होईल. गडचिरोलीतील शूर आदिवासींच्या या पुढाकाराकडे आशेने पाहून त्यांना साथ देणे यासाठीच आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment