Total Pageviews

Sunday, 12 April 2015

OP RAHAT-जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्री लष्करप्रमुख असल्यामुळे त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कोणते निर्णय वेळेत आणि अचूक घ्यावेत याचा दांडगा अनुभव होताच

धडाडीचे ‘ऑपरेशन राहत’ भारतीय सैन्यदल आपल्या समर्पण भावनेसाठी आणि शांततेसाठी जगात ख्यात आहे. प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासही ते मागेपुढे पाहत नाही, याची असंख्य उदाहरणे देता येतील. भारताच्या सैन्यदलाची ताकद आणि शौर्याची अनेक देशांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली, यातच भारतीय सैन्याची महती अधोरेखित होते. भारत १९६२ च्या युद्धात पराभूत झाला खरा. पण त्यावेळी अगदी १८ हजार फूट उंचीवरही अंगात गरम कपडे, पायात बर्फातून चालण्यासाठी लागणारे बूट आणि मजबूत हेल्मेट नसतानाही उपाशी-तापाशी राहून चिन्यांशी झुंज देणार्‍या हिंदुस्थानी सैन्याची त्यावेळी चीननेही प्रशंसा केली होती. मेजर शैतानसिंग यांच्यासारख्या अनेकांनी ऐकेकट्याने शंभरांवर चिन्यांना यमसदनी पाठविल्याचा इतिहास आमच्या डोळ्यासमोरून जातो, तेव्हा निश्तितच डोळ्यात अश्रू तरळतात. ‘ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भरलो पानी’ हे राष्ट्रकवि प्रदीप यांच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत लेखणीतून साकारलेले गीत जेव्हा गानकोकिळा लतादीदींनी दिल्लीत पंतप्रधान नेहरूंसमोर गायिले, तेव्हा नेहरूंनाही अश्रू आवरले नव्हते. आमच्या सैनिकांच्या मागे भारतातील संपूर्ण जनता त्यावेळी त्याच समर्पण भावनेने उभी राहिली होती. सैन्यदलासाठी लागणार्‍या सामुग्रीसाठी पैशाची जमवाजमव करण्याच्या आवाहनाला त्यावेळी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अजूनही कंठ दाटून येतो. त्यावेळी अगदी चार दिवसांआधी लग्न झालेल्या वधूंनीही आपले संपूर्ण दागिने आणि महिलांनी आपली सर्व आभूषणे सैन्यदलाच्या झोळीत टाकली होती. संपूर्ण देशाने त्यावेळी सैन्यदल निधीत सढळ हस्ते मदत केली होती. भारतीय लष्कर आणि जनतेचे हे दृढसंबंध तेव्हापासून आजतागायत कायम आहेत. आमच्या जवानांनीही वेळोवेळी जेव्हा देशावर संकट आले, तेव्हा याच सर्व आठवणींचा जागर मनात साठवून आपल्या परीने, प्रसंगी प्राणाची बाजी लावून, या ऋणाची थोडी का होईना, परतफेडही केली आहे. त्यामुळेच आज देशाच्या कोणत्याही भागात अतिवृष्टी, महापूर, भूकंप, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीत सर्वप्रथम आठवण होते ती आमच्या सैन्यदलाची. मग तो उत्तराखंडमधील प्रलय असो की भुजमधला भूकंप. बिहारमध्ये येणारा महापूर असो की नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये झेलमला आलेला महापूर असो. इराकवर अमेरिकेने केलेले आक्रमण, लेबनॉनमधील युद्ध, लिबियातील युद्ध अशा अनेक प्रसंगी आमच्या शूरवीर जवानांनी सतत समर्पणाच्या भावनेतूनच लक्षावधी भारतीयांना सुखरूप भारतात आणले आहे. भारतीय सैन्याच्या पायदळ, वायुदल आणि नाविक दलाने आजपर्यंत केवळ देशातच आपल्या कामगिरीचे दर्शन घडविले नाही, तर जगाच्या अनेक देशात आपल्या कर्तृत्वाचा आविष्कार दाखवत अनन्यसाधारण शौर्याची पताका उंचच उंच फडकावली आहे. अगदी नुकतेच उदाहरण द्यायचे झाल्यास येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप भारतात आणण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आखलेली ‘ऑपरेशन राहत’ मोहीम. चहूबाजूंनी आकाशात बॉम्ब्‌सचा सर्वत्र वर्षाव होत असताना, केवळ दोन-तीन तासाच्या एका मोकळ्या वेळेत भारतीयांना येमेनमधून विमाने व युद्धनौकांमधून बाहेर काढणे हे सोपे काम नव्हते. कारण, या अल्पकाळात विमानांना त्यांचा मार्ग आखून देण्यात आला होता व त्याच मार्गाने त्यांना जिबुटीत प्रवेश करावा लागत होता. भारत अशा बिकट परिस्थितीत आपल्या लोकांना बाहेरच कसा काढणारा, याविषयी अनेक देशांनी शंका उपस्थित केली होती. कारण, येमेनमध्ये केवळ भारतीयच नव्हते, तर अनेक देशांचे लोक अडकले होते. पण, जिबुटी विमानतळावर विमाने उतरविण्याची त्यांची हिंमत झाली नाही. एकीकडे हौती बंडखोरांनी मांडलेला उच्छाद, त्यांना मिळालेली इसिसची साथ, जागोजागी अतिरेक्यांकडून होणारे बॉम्बस्फोट आणि दुसरीकडे सौदी अरेबियाकडून देण्यात येणारे तेवढेच जोमदार प्रत्युत्तर. अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येमेनमधील भारतीयांनी जगण्याची आसच सोडली होती. आपल्या मायभूमीत परतण्यासाठी ते अक्षरश: तळमळत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीयांना परत आखण्यासाठी सैन्यदलाच्या तिन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली. योजना तयार करण्यात आली आणि त्यानुसार ती तडीस नेण्याचे ठरले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण मोहिमेवर जातीने लक्ष देण्यासाठी माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना येमेनेमध्ये पाठविण्यात आले. सिंह हे माजी लष्करप्रमुख असल्यामुळे त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कोणते निर्णय वेळेत आणि अचूक घ्यावेत याचा दांडगा अनुभव होताच. तो यावेळी कामी आला. येमेन हा देश सोमालिया, इथियोपिया यांना जवळ असलेला प्रदेश. सोमालियाच्या समुद्री चाच्यांचाही तेथे उपद्रव मोठा. येमेनला लागूनच सौदी अरेबिया आहे. या सर्व देशांसोबत भारताचे राजनयिक संबंध चांगले असल्यामुळे त्याचा लाभ यावेळी खूपच झाला. महत्त्वाची बाब म्हणजे जिबुटीसारख्या अतिशय लहान देशाने भारताला याकामी भरभरून मदत केली. दस्तुरखुद्द जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्री असल्याने दिल्लीच्या पातळीवरून तातडीने निर्णय घेण्यात मोलाची मदत झाली. सिंह हे जिबुटीला तत्काळ रवाना झाले आणि मग सुरू झाले ऑपरेशन राहत. त्यासाठी भारतीय वायुदलाच्या महाकाय हर्क्युलस, एअर इंडियाची बोईंग व अधिक प्रवाशांची क्षमता असलेली ७७७ जातीची विमाने आणि तीन युद्धनौका येमेनकडे पाठविण्यात आल्या. हळूहळू या मोहिमेला यश येत गेले. येमेनपासून जिबुटी विमानतळ हे सर्वात जवळ होते. पण, विमाने समुद्रावरून न्यायची होती. त्यात जोखीम होती. तरीही ती भारताने स्वीकारली. आधी येमेनची राजधानी साना येथे सर्वांना आणण्यात आले आणि तेथून त्यांना विमानाने आधी जिबुटी व नंतर कोची, मुंबई येथे नेण्यात आले. यात वायुदल, एअर इंडिया आणि नाविक दलाने मोलाची कामगिरी बजावली. प्रत्यक्षात एक एप्रिलला सुरू झालेली ही बिकट मोहीम अवघ्या दहा दिवसात संपली. पहिले विमान जिबुटीहून उडाले तेव्हा विमानातील लोकांनी टाळ्यांचा कितीतरी वेळ कडकडाट केला. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सुमारे साडेचार हजार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले. सोबतच इतर अनेक देशांच्या नागरिकांनाही भारतीय सैन्यदलाने भारतात आणले. नंतर ते आपापल्या मायदेशी रवाना झाले. ही मोहीम फत्ते झाल्याचे पाहून जगाने आश्‍चर्याने तोंडात बोटं घातली. जे लोक येमेनमधून भारतात परतले, त्यांची मनोगतं आता कळू लागली आहेत. ‘आम्ही तर जगण्याची आसच सोडली होती. आम्ही किती वेळ जिवंत राहू असाच प्रश्‍न वारंवार आम्हाला भेडसावत होता. लहान मुलं तर सततच्या बॉम्बस्फोटांच्या आवाजाने भेदरून गेली होती. पण, भारत जणू देवदूताच्या रूपाने आला आणि आमची सोडवणूक केली. आम्ही भारताचे आणि लष्कराचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही’, ही त्या साडेचार हजार लोकांमधील एकाची बोलकी प्रतिक्रिया. मानवधर्म हे सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. तेथे फक्त मानवधर्माचे पालन करण्याची शिकवण दिली जाते. ही शिकवण उराशी बाळगून आमच्या शूरवीर जवानांनी सर्वांना मायदेशी परत आणले व पुन्हा आपल्या अनन्यसाधारण कामगिरीच्या मानाचा आणखी एक तुरा आपल्या शिरपेचात खोवला. भारतात सर्वजण सुखरूप पोहोचल्यानंतरही भारताने सर्वांना आपापल्या गावी जाण्यासाठी मोफत रेल्वे प्रवास आणि खर्चासाठी सोबत तीन हजार रुपये दिले. भारताच्या या मानवतेचे दर्शन संपूर्ण जगाने पाहिले. असे का घडले? यासाठी सरकारची दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रभाव, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आपल्या सैन्यदलावर असलेला उदंड विश्‍वास. या मोहिमेत वायुदल व नौदलाचे जवान, तसेच एअर इंडियाच्या अधिकारी-चालकवर्गाने जी मोलाची साथ दिली, त्या सर्वांनाच मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment