Total Pageviews

Sunday, 10 July 2011

LOOKING AFTER GIRL CHILD

सन्मान करू या ‘तिचा’‘पोटाची पोर जीवास घोर’ असे म्हणून तिची सतत अवहेलना करणे, वंशाच्या दिव्याला मात्र स्वैराचारास रान मोकळे सोडणे हा दुजाभावच मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍न निर्माण करणारा आहे.
राजकारणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत असताना दुसरीकडे महिलांना दुय्यम वागणूक देऊन त्यांचा अनादर करण्याचा प्रकार देशात घडतो आहे. संतांची शिकवण व सामाजिक उपक्रमाचा पगडा असलेल्या महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. स्त्रीभ्रूण हत्यांचे पातक, शिशुहत्या त्यासोबतच नरबळीच्या घटनांनी महाराष्ट्रातील जनजीवन ढवळून निघाले आहे. ही बाब दुर्दैवी आहे.
पुरोगामी महाराष्ट्रातच शक्तीची साडेतीन पीठे असून, परस्री मातेसमान मानण्याची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेतूनच आदिशक्ती रेणुकामाता, सप्तशृंगी माता, महालक्ष्मी माता आणि तुळजाभवानी मातेसोबत मोहटा येथील रेणुकादेवी तसेच म्हाळसाई, गिरजा, दाक्षायणी, दुर्गा अशा विविध कुलमातांच्या कृपाशीर्वादाने कोटी कोटी कुळे उजळून निघाली. मातृदेवतेचे पूजन म्हणजे अख्ख्या नारीचा आदरच यातूनच होत असतो. परंतु हा आदर आज पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे हिरावला जात आहे. पुरुषी अहंकाराने गर्भातच स्त्रीभ्रूणहत्येचे पातक केले जात आहे. स्वत:चे पाप झाकण्यासाठी दुसर्‍याचा जीव घेण्यातच धन्यता मानली जात आहे. मात्र पुढील परिणामांची पर्वा कोणालाच नाही. सध्या हजार पुरुषांमागे विषम प्रमाणात स्त्रियांचे प्रमाण झाले आहे. याचा आतापासूनच विचार करण्याची भयंकर वेळ आली आहे.
काल परवाच थामसन रायटर्स ट्रस्ट लॉ वुमेन या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यात आले. त्यातील अहवालच धक्कादायक आढळून आला आहे. महिलांवरील अत्याचारामुळे हिंदुस्थान धोकादायक बनला असल्याचा हा अहवाल विचार करणारा आहे. मुस्लिम राष्ट्रासोबत झालेल्या संशोधनावरून हिंदुस्थानचा चौथा क्रम असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात हा अहवाल एकांगी असू शकतो, असे म्हणायला भरपूर वाव आहे, पण वास्तव टाळता येत नाही.
न्यूयॉर्कमध्ये लैंगिक अत्याचार करणार्‍या उच्चपदस्थ 24 जणांच्या टोळीस तेथील पोलिसांनी गजाआड केले. मध्यंतरी 4 ते 5 वर्षांपूर्वी गोव्यात अशाच प्रकारे अत्याचार करणार्‍या परदेशी नागरिकांसह काही भामट्यांना पकडण्यात आले. या प्रकरणाची फाईल निर्णायक क्षणापर्यंत आली असताना एका परदेशी युवतीवर झालेल्या अत्याचाराने गोव्याचे जनजीवन ढवळून निघाले.
शहापूरमधील सावरोली येथील एका शासकीय आश्रमशाळेतील पाचवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीने बाळास नुकताच जन्म दिला. मागच्या दशकात अमेरिकेमध्ये अल्पवयीन मुली ‘बालमाता’ ठरल्या. स्वैराचाराचा हा परिणाम म्हणावा कसा? महाराष्ट्रात 6 ते 7 वर्षांपूर्वी कोठेवाडी येथील अत्याचार व हत्याकांड प्रचंड गाजले. नराधमांना सजा झाली. पण ज्या अबलेवर अत्याचार झाले त्याची जखम आजही त्या बाळगतात... अंगावर शहारे आणणारी ही दुर्घटना आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चिमुरडीचे हत्याकांड नुकतेच झाले. बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील एका विहिरीत अनेक नवजात बालकांचे पार्थिव सापडले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. सोनोग्राफी केंद्रांवर व काही डॉक्टरांवर कारवाई झाली; ही कारवाई बेधडकपणे न होता उशिरा झाली.
‘बेटी गेहूँ की रोटी’ अशी हिंदीत म्हण आहे. पण ती नजरेआड करून आज अत्याचाराची सीमा पार केली जात आहे. वर उल्लेखलेल्या घटना आजपर्यंतच्या आहेत. याच्या जोडीला 1 जून ते 16 जूनदरम्यान मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास केला असता विविध घटनांमध्ये 40 महिलांचा मृत्यू, लैंगिक अत्याचाराच्या 4, शारीरिक व मानसिक छळाच्या 14 घटना निदर्शनास आल्या आहेत. याचा जिल्हानिहाय विचार केला तर असे आढळून येते की, लातूर, धाराशिवमध्ये महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण जे 3 आहे तेच जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांत अनुक्रमे 3 आणि 4 असे आढळले. जालना जिल्ह्यात 5 आणि लातूरमध्ये 3 याप्रमाणे महिलांचा सासरी छळ झाला. हुंडाबंदीचा कायदा धाब्यावर बसवून महिलांचा छळ करणे, प्रसंगी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. याच कालावधीत बीड जिल्ह्यात बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या.
‘पोटाची पोर जीवास घोर’ असे म्हणून तिची सतत अवहेलना करणे, वंशाच्या दिव्याला मात्र स्वैराचारास रान मोकळे सोडणे हा दुजाभावच मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍न निर्माण करणारा आहे. अर्थात कुटुंबपरत्वे विविध प्रश्‍न-समस्या असल्या तरी अत्याचारामुळे घरात लक्ष्मी नाराज राहते... घराचे स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी महिलांच्या संरक्षणाची व तिच्या सन्मानाची गरज निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment