Total Pageviews

Wednesday 27 July 2011

MUMBAI BLASTS EDITORIAL SAMANA

मुंबईत १३ जुलै रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस व दादर या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून अतिरेक्यांनी सार्‍या मुंबईकरांमध्ये असुरक्षितता निर्माण केली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांत १७ जण ठार तर १३३ गंभीर जखमी झाले होते, परंतु आता जखमींची संख्या कमी होऊन मृतांची संख्या वाढत आहे. कालच्या सोमवारपर्यंत मृतांची संख्या २४ झाली होती. दादरमध्ये जखमी झालेल्या १० जणांपैकी आता मानकेश्वर विश्वकर्मा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दादरमधला हा पहिला बळी होय. १३ जुलैच्या बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना १५ दिवस लोटले तरी तपासाबाबत मात्र प्रगती शून्य आहे. एटीएस व मुंबई क्राइम ब्रँचची पथके अजूनही चाचपडत आहेत. पूर्वी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चाळी होत्या, बैठी घरे होती. बाजूच्या घरात कुणी पाहुणा आला तर ते शेजार्‍यांना पटकन कळायचे. त्याच्या हालचालीची, त्याच्या राहण्याच्या हेतूची सर्वांना माहिती मिळायची, परंतु आता चाळी जमीनदोस्त झाल्या आणि त्या जागी गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्या. आता बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो हे शेजार्‍याला माहीत नसते. शेजार्‍याच्या मयताला चार माणसं गोळा होत नाहीत इतके आपण एकलकोंडे झालो आहोत. असे जर बदल घडत असतील तर पोलिसांना तरी कोण माहिती देणार? त्यांच्या कानाला कोण लागणार? भाड्याची घरं ही आता गुन्हेगार व अतिरेक्यांची आश्रयस्थानं ठरत आहेत. भरमसाट भाडं मिळते म्हटल्यावर कुणालाही आपला निवासी किंवा व्यापारी गाळा भाड्याने दिला जात आहे. त्यामुळे हा देश व हे शहर आता ज्वालामुखीवर उभे आहे. कधी कुठे स्फोट होतील याची आता गॅरंटीच राहिलेली नाही. लोक भयभीत झाले आहेत. त्यांना आता पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे रोज हतबल होऊन त्यांना घराबाहेर पडावे लागत आहे आणि अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत मृत्युमुखी पडावे लागत आहे. दहशतवाद हा न संपणारा आहे. सार्‍या जगाला दहशतवाद्यांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका व लंडनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केली गेली. अमेरिकेवरील हल्ल्याला आज एक दशक लोटले आहे, परंतु तिथे २००१नंतर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडविण्याचे धाडस केलेले नाही. याउलट आपल्याकडे परिस्थिती आहे. १९८९ पासून आपल्याकडे बॉम्बस्फोट सुरू आहेत. नागपाड्याच्या डॉ. जलीस अन्सारीने गिरगाव चौपाटीवर आपला पहिला इस्लामी बॉम्ब फोडून मुंबईत बॉम्बस्फोट मालिका सुरू केल्या तो जे. अन्सारी आज तुरुंगात आहे, परंतु बॉम्बस्फोट काही कमी झालेले अथवा थंडावलेले नाहीत.
डॉ. जलीस अन्सारी यास १३ जानेवारी १९९४ रोजी मदनपुर्‍यातून मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी अटक केली तेव्हा त्याने मुंबईसह देशभरात ५१ बॉम्बस्फोट घडविल्याची कबुली दिली. कुठेही जातीय दंगल घडली, कुणी मुस्लिम मारला गेला की जलीसचे पित्त खवळायचे आणि तो बॉम्बस्फोट घडवून आणायचा. त्याने शीव रुग्णालयातून १९८१ साली एमबीबीएसची पदवी मिळविली होती, परंतु त्याचा त्याने गैरफायदा उठविला. सल्फरेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड व एक्स्प्लोझिव्ह पावडर या गंधकाच्या सहाय्याने त्याने क्रूड बॉम्ब बनविले आणि त्याचे सर्वत्र स्फोट घडवून मुंबईसह देशभरात हाहाकार माजविला. अखेर पाच वर्षांनंतर तो पकडला गेला असता तो व त्याचे एक डझन साथीदार सुन्नीमधील अहले हदीस विचाराचे, पंथाचे असल्याचे आढळून आले. गेल्या दीड दशकात मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेले बहुसंख्य आरोपी हे सुन्नी समाजातील अहले हदीस गटाचे असल्याचे उघड झाले असून अहले हदीस गटाचे आरोपी सर्वात कट्टरपंथी समजले जातात.
शिया-सुन्नी मुस्लिमांमध्ये नमाज व अनुकरणावरून बरेच वाद आहेत. त्यांच्यात प्रचंड गटबाजी आहे, परंतु दुर्दैवाने आज सार्‍याच भल्याबुर्‍या मुसलमानांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळेच आज पोलिसांकडून मुस्लिम खबरे दुरावले आहेत. पोलिसांना उर्दू, अरबी भाषा येत नाहीत. त्यामुळे तळागाळात काय चालले आहे हे त्यांना कळत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट होऊन आज दोन आठवडे लोटले आहेत. तरीही एटीएसच्या हाती काहीच लागलेले नाही. जोपर्यंत तुम्ही खोलात जाणार नाहीत, मुस्लिमांना जवळ करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला अतिरेक्यांपर्यंत पोहोचता येणार नाही, मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडविणारे मूठभर लोक आहेत. त्यांचा शोध घेणे काही कठीण नाही, परंतु त्यांच्यापर्यंत पोचण्याइतकी प्रशिक्षित यंत्रणाच आपल्याकडे नाही. मुस्लिमांमध्ये जिहाद पुकारणारे जसे आहेत तसे झोकून तपास करणारे अधिकारी पोलीस दलात नाहीत आणि आहेत त्यांच्यावर बंधने आहेत, राजकीय हस्तक्षेप आहे. त्यामुळे १३ जुलैच्या तपासाचे तीनतेरा वाजले आहेत. एसआयडी, विशेष शाखा व हत्यारी विभागात काम करायचे म्हणजे पोलिसांना शिक्षा समजली जाते. पाकिस्तानने छुपे युद्ध पुकारले असताना तुमचे ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ असेल तर या विशेष शाखा हव्यात कशाला? बॉम्बस्फोट घडविणारे उच्चशिक्षित व टेक्नोसॅव्ही आहेत, तर आपले तपास अधिकारी अंधारात चाचपडत आहेत. कालबाह्य यंत्रणा असल्यावर ते तरी काय करणार? परंतु अहले हदीसचे हे आव्हान देशाची दुसरी फाळणी करणारे आहे एवढे नक्की

No comments:

Post a Comment