Total Pageviews

Friday 22 July 2011

GOOD POLICE OFFICER CATCHES CORRUPT POLICE

पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांचाच हिसका
ऐक्य समूह
Saturday, July 23, 2011 AT 12:06 AM (IST)
Tags: lolak
तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे काय?
मोटारीत परवानगीपेक्षा अधिक लोक आहेत.
गाडीचे कागदपत्र दाखवा.
ट्रकमध्ये नियमापेक्षा जास्त माल भरला आहे.
ड्रायव्हिंग साईडचा आरसा तुटला आहे.
ट्रकमधून जनावरे कशी नेता?
गाडीची नंबर प्लेट पुसट आहे.
अशा विविध प्रश्नांची विचारणा रस्त्यावरच्या वाहतूक आणि बंदोबस्तासाठी चौकात उभ्या असलेल्या पोलिसांच्याकडून वाहनचालकांना होते. महामार्गावरही पोलीस ट्रक आणि अन्य वाहने अडवून तपासणी करतात. त्यांनी मागितल्यावर ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे कागदपत्र नसल्यास दंड भरावा लागतो. बहुतांश वेळा त्या संबंधित पोलिसाशी मांडवली करावी लागते, हा सर्वसामान्य अनुभव वाहनचालकांना नवा नाही. देशाच्या सर्व राज्यात पोलिसांच्याकडून अशी चिरीमिरी वाहनचालकांकडून उकळली जाते. प्रामाणिक पोलीस आणि पोलीस अधिकारी मात्र नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून कायदेशीर दंडाची वसुली करून रितसर पावती देतात. पण पोलीस खात्यातल्या लाचखोरीच्या हिसक्याला कधी ना कधी सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागतेच!
हरियाणा हे राजधानी दिल्लीजवळचे राज्य! रस्त्यांवर वाहतूक प्रचंड असल्याने, लाचखोर पोलीस आणि अधिकाऱ्यांना, वाहनचालकांना अडवून आपले खिसे भरायची संधी रोजच मिळते. गाडीचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन वाहन चालकाने दाखवल्यास, मग वाहतूक कायद्याच्या अन्य नियमांचा भंग कसा झाला, हे लाचखोर पोलीस लगेचच सांगत असल्याने, वाहनचालकाला घासाघीस करुन त्या पोलिसाशी तडजोड करण्याशिवाय पर्याय राहत नाही. या राज्यातल्या रोहटक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बी. सतीश बालन यांनी, आपल्या खात्यातल्या लाचखोरीला सोकावलेल्या अधिकारी आणि पोलिसांना वठणीला आणायसाठी कडक उपाययोजना सुरु केल्याने, शहरवासियांसह सामान्य जनता खुष झाली. पण काही लाचखोर अधिकारी आणि पोलिसांची रोज लाच खायची सवय काही सुटेनासी झाली, तेव्हा बालन यांनी लाचखोरांची नावे कळवायच्या जनतेला केलेल्या आवाहनाला प्रतिसादही मिळाला. जनतेेकडून मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांनी लाचखोर पोलिसांना पकडायची जोरदार मोहिमही
सुरू केली.
रोहटक शहराबाहेरच्या काही चौकात बंदोबस्त करणारे काही अधिकारी आणि पोलीस वाहनचालकांना अडवून लाच खातात, अशी तक्रार त्यांच्याकडे आली. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांच्यावर, त्या लाचखोरांना पकडायची जबाबदारी सोपवली. तीन दिवसांपूर्वी शर्मा यांनी या तक्रारींची शहानिशा करायसाठी आपल्या अंगावरची खाकी वर्दी उतरली. डोक्याला पंचा गुंडाळून शेतकऱ्याच्या वेषात ते शहराबाहेरच्या नाक्यावर उभे राहिले. हौद्यातून म्हैस नेणारा छोटा ट्रक त्यांनी अडवला. त्या ड्रायव्हरला आपली ओळख देऊन सूचनाही दिल्या. शहराच्या एका नाक्यावर तपासणीसाठी हा ट्रक अडवला गेला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने आणि पोलिसांनी तपासणी करून ट्रक सोडला. पुढे शिला नाक्यावर पुन्हा हा ट्रक अडवला गेला. पोलीस उपनिरीक्षक संजीव आणि पोलीस तेजेंद्र या दोघांनी ट्रकची तपासणी केली. तेव्हा हौद्यात म्हैस असल्याचे आढळताच त्यांनी ट्रक ड्रायव्हरला झापडले. वाहनातून जनावर नेणे हा वाहतुकीच्या नियमांचा भंग असल्याने, त्याच्याकडे लाचेची मागणी केली. जनावर वाहून नेणारा ट्रक सोडायसाठी शंभर रुपये "एंट्री' द्यावीच लागते, ती दे, अशी जरबेची भाषा वापरली. लाचखोर पोलीस अधिकारी आणि पोलिसाची ही मग्रूरी शर्मा थक्क होऊन पाहत होते. त्यांनी सही केलेली शंभर रुपयांची नोट ड्रायव्हरने त्या लाचखोरांना दिली आणि ती त्यांनी स्वीकारताच ट्रकमधून खाली उतरुन शर्मा यांनी, या दोन्ही लाचखोरांची बखोटी पकडली. शहर पोलीस ठाण्यातून पोलिसांचे पथक मागवून त्या दोघांची वरात पोलीस ठाण्यात नेली. न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही लाचखोरांना तुरुंगात डांबले गेले. खेडुत शेतकऱ्याचे सोंग घेतल्यानेच, शर्मा यांना लाचखोरांना पकडता आले. पोलीस लोकांशी कसे वागतात आणि लाच कशी उकळतात, याचा अनुभव महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेत मिसळून घेतल्यास, त्यांनाही अशा पोलिसी हिसक्यांना नक्कीच सामोरे जावे लागेल! असे अनुभव येतील तेव्हाच, "जनतेशी सौजन्याने वागा', असे आदेश देणाऱ्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जनतेची व्यथा समजेल!
- वासुदेव कुलकर्णी

No comments:

Post a Comment