देवाच्या संपत्तीवर राजकारणी व सत्ताधार्यांनी वाईट नजर ठेवू नये. बुरी नजरवाले तेरा मुंह काला! असेच म्हणावे लागेल.
हेच खरे श्रीमंत!केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिराच्या तळघरात सापडलेल्या संपत्तीने अनेकांची बुब्बुळे बाहेर आली. आतापर्यंत एक लाख कोटी इतक्या संपत्तीची मोजदाद झाली आहे व ही संपत्ती किमान पाच लाख कोटींच्या घरात जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे केरळचे पद्मनाभ स्वामींचे मंदिर हे दोन्ही अंबानी बंधूंपेक्षा श्रीमंत आहे. टाटा-बिर्ला यांचीही संपत्ती स्वामींच्या श्रीमंतीपुढे तोकडीच पडली आहे. आपल्या देशात सध्या बुवा-महाराजांची चलती आहे. महाराज प्रवचने झोडत असतात व त्या शब्दसंपत्तीच्या जोरावर लाखो, करोडोंची संपत्ती जोडत असतात. रामदेवबाबांची संपत्तीही पाचेक हजार कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. बाकी मग हे बाबा, ते स्वामी यांच्याही आश्रमात पैशांचे पीकच येत असते. त्यांच्या भक्तांची गरिबी किती हटते ते ज्यांचे त्यांनाच माहीत, पण केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरातील ही धनदौलत पाहून त्या धनाढ्य बाबा महाराजांनाही आपल्या व्यवसायात बदल करून पाहावा असे वाटत असावे किंवा स्वत:च्या नावाचे एक मंदिर उभारून त्यात भक्तजनांची वाट पाहत एखाद्या दिलदार त्रावणकोर महाराजांची प्रतीक्षा करीत बसावे असे त्यांना वाटले तर नवल ते काय! पद्मनाभ स्वामींचा वैभवी थाटच डोळे दिपवणारा आहे, थक्क करणारा आहे. सध्या ‘एसएमएस’द्वारे चांगले विनोद पसरत असतात. त्या विनोदातून पद्मनाभ स्वामींचा खजिना व आमचे राजकारणीही सुटलेले नाहीत. स्वामींच्या संपत्तीचा आकडा जाहीर होताच, राजकारणातील श्रीमंतांत खळबळ माजली. विलासराव देशमुखांनी म्हणे जाहीर केले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक मी लढणार नाही. त्यापेक्षा मला केरळच्या पद्मनाभ स्वामींच्या मंदिराचा विश्वस्त करा. आमचे शरदबाबूही म्हणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पद्मनाभ स्वामी मंदिराचे पुजारी म्हणून काम करायला तयार आहेत. शेवटी काय तर पैसा बोलतो आहे! के. पद्मनाभ स्वामी राजकारणात नाहीत, उद्योगात नाहीत, क्रिकेटच्या सट्टेबाजीत नाहीत तरी त्यांच्यापाशी इतकी धनदौलत कशी? कॉमनवेल्थ घोटाळ्यात हातचलाखी न करता आणि स्पेक्ट्रम घोटाळ्यात बुडवाबुडवी न करता स्वामींच्या चरणाशी इतकी प्रचंड दौलत कशी? असा प्रश्न राजकारणी आणि उद्योगपतींना पडलाच असेल. या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ही धनदौलत भक्ती, श्रद्धा आणि त्यागातून निर्माण झाली. राजा हरिश्चंद्राने स्वप्नात आपले राज्य दान केले तसे त्रावणकोरच्या महाराजांनी ही प्रचंड संपत्ती एका श्रद्धेतून के. पद्मनाभ स्वामींच्या चरणाशी अर्पण केली. मंदिराच्या खजिन्यावर कोणाचा अधिकार? त्यावर आता खल सुरू झाला आहे, पण देवाच्या संपत्तीवर राजकारणी व सत्ताधार्यांनी वाईट नजर ठेवू नये. बुरी नजरवाले तेरा मुंह काला! असेच म्हणावे लागेल. ही सर्व संपत्ती फक्त के. पद्मनाभ स्वामी मंदिराचीच आहे व ती त्रावणकोरच्या राजांनी दान केली आहे. त्रावणकोरचे महाराज हे प्रखर हिंदुत्ववादी आणि धार्मिक होते. महाराजांच्या दिवसाची सुरुवात याच मंदिरातील पूजा-आरतीने होत असे. जर कधी त्यांच्याकडून ‘पूजा’ चुकली तर त्यांना दंड भरावा लागत असे व महाराजांनी चूक झाल्याबद्दल के. पद्मनाभ स्वामींच्या चरणी दंडाची रक्कम अदा केली आहे. अनेक भक्तांनी मंदिरास दान, भेटी दिल्या व महाराजांनी त्यास हात न लावता मंदिराच्या तळघरात जतन केल्या. त्यामुळेच हा ‘खजिना’ नसून देवाची संपत्ती आहे असे आता त्रावणकोर महाराजांच्या सध्याच्या वंशजांनी जाहीर केले. इतकेच नव्हे तर या संपत्तीवर कोणीही दावा सांगणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण देवाच्या तिजोरीतले ‘वाटे’ उचलणारे व मंदिराच्या पैशात घपले करणारे कमी नाहीत. किंबहुना, अनेकांचा तो गोरखधंदाच झाला आहे. इस्टेटीच्या वाटण्या व हपापाचा माल गपापा हा तर छंदच बनला आहे. अशावेळी पाच लाख कोटींच्या संपत्तीवर पाणी सोडणे व हे सर्व देवाचेच आहे, देवापाशीच राहील असे सांगणारे त्रावणकोर महाराजांचे वंशज हीच खरी हिंदूंची संस्कृती आहे. इस्टेटीसाठी भावाभावांत, उद्योगपतींच्या घरात कलह झालेत. घरे फुटली व राजघराणी नष्ट झाली. त्रावणकोरचा राजवंश हा सगळ्यात वेगळा निघाला. आम्हीही त्यांच्या त्याग व भक्तिभावापुढे नतमस्तक झालो आहोत. त्रावणकोरचे राजे हेच खरे श्रीमंत. त्यांच्या श्रीमंतीपुढे सगळेच फिके-फाके आहेत
No comments:
Post a Comment