अर्थसंकल्पापेक्षा आमदारांना कौतुक क्रिकेटचे! देशात आणि मुंबईतही क्रिकेटचा माहोल होता. मोहालीत पार पडलेला उपांत्य सामना आणि शनिवारचा अंतिम सामना याचेच सावट सभागृहातील कामकाजावर पडले .अर्थमंत्र्यांचे भाषण संपता संपता, ‘आमदार निधीत वाढ करणे’ आणि ‘अंतिम सामन्याची तिकिटे मिळवणे’ अशा विषयावर सदस्य भर देऊ लागले.चाळीस हजार प्रेक्षकांच्या गर्दीत श्रीलंका-भारत सामना पाहणे हा अत्यंत थरारक अनुभव आहे यात शंकाच नाही, सरकारच्या सहकार्याची व मदतीची गरज क्रिकेट सामने नियंत्रित करणार्या बीसीसीआयला तसेच वानखेडे स्टेडियमची मालकी मिरवणार्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला नक्कीच आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला तब्बल २५० तिकिटे देऊ केली. हे मोफत व्हीव्हीआयपी पास आहेत. पण त्यातही, या जागा चांगल्या नाहीत. जिथून सामना उत्कृष्ट दिसेल अशाच सीट दिल्या पाहिजेत, असे सरकारने बजावले. या जागा बदलून घेण्यात यश मिळवले. जी तिकिटे क्रिकेट संघटनेकडून मिळाली ती वाटताना अर्थातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना प्राधान्य मिळाले. या दोघांना प्रत्येकी दहा तर मुख्य सचिव, क्रीडामंत्री यांना चार-चार तिकिटे देण्यात आली. अन्य सर्व मंत्र्यांना प्रत्येकी २/२ निमंत्रणे, व्हीआयपी पास देण्यात आले. विधिमंडळ पदाधिकारी, विभागीय प्रधान सचिव, अशांचे नंबर त्यानंतर लागले. तरीही अनेक इच्छुक तिकिटांविना तळमळतच राहिले. हजारो लोकांनी दुपार, सायंकाळ व रात्र क्रिकेट करता राखीव ठेवली . अनेक क्लब, पब्ज आणि हॉटेलांनी खास ‘ पॅकेज’ देऊ केले होते. ‘खावो पिओ और क्रिकेट देखो!’ मोठ-मोठे पडदे लावून त्यावर टीव्ही प्रोजेक्टरचे तंत्र वापरून गर्दीच्या ठिकाणी एकाचवेळी शेकडोंना मॅच पाहण्याची संधी होती. राजकीय पक्षांनीही मतदारांना खूश करण्याची संधी घेतली. अक्षरशः गल्ली-गल्ली, आडबाजूच्या रस्त्यांवर, छोट्या मैदानावर चाळींच्या मधल्या चौकांत, जागा मिळेल तिथे मोठे पडदे व क्रिकेटदर्शन सुरू होते. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्याने लोक थिरकले आणि मग सुरू झाला तो जल्लोष. तो उत्साही माहोल रात्री उशिरापर्यंत रंगत (काही ठिकाणी ‘झिंगत’!) गेला!
No comments:
Post a Comment