Total Pageviews

Friday, 8 December 2017

नागालॅँडमध्ये सध्या हॉर्नबिल फेस्टिवलची धूमसुरू आहे-

नागालॅँडमध्ये सध्या हॉर्नबिल फेस्टिवलची धूमसुरू आहे. देश-विदेशातले लोक हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागालँडमध्ये गर्दी करतात, परंतु हा केवळ पर्यटनाला चालना देणारा इव्हेंट नाही. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे उर्वरित भारताबाबत मनात अतोनात संशय आणि खूप मोठे प्रश्नचिन्ह बाळगून असलेल्या देशाच्या एका अंगाला जोडणारा हा मजबूत धागा आहे.
 
नागालँड हे ख्रिस्तीबहुल राज्य आहे. राज्यात बाप्टिस्ट चर्चचा प्रचंड प्रभाव आहे. राज्याच्या राजकारणात, समाजकारणात त्यांचा उघड हस्तक्षेप असतो. त्यामुळे स्वाभाविकच नागांच्या मूळ संस्कृतीशी नाते सांगणार्‍या हॉर्नबिल फेस्टिवलला चर्चचा पाठिंबा असण्याचे काही कारणच नव्हते. हा फेस्टिवल नागा समाजातील स्वैराचाराला खतपाणी घालणारा आहे, पॅगन संस्कृतीला बळ देणारा आहे, असा अपप्रचार करून फेस्टिवलला खो घालण्याचा प्रयत्न झाला. परंतु धर्मांतर होऊनसुद्धा मूळ संस्कृतीशी नाळ कायम असलेल्या ख्रिस्ती बांधवांनी या प्रचाराला भीक घातली नाही. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे या उत्सवाची जादू चढत्या क्रमाने वाढत राहिली.
 
नागालँड दिवसाचे (१ डिसेंबर या दिवशी नागालँडला राज्याचा दर्जा मिळाला) औचित्य साधून हा सोहळा १ डिसेंबर ते १० डिसेंबर या काळात साजरा केला जातो. त्यामुळे नागालँडमध्ये आधी फेस्टिवल आणि नंतर नाताळ असा डबल धमाका डिसेंबर महिन्यात असतो. राज्यात जल्लोषाचे वातावरण महिनाभर कायम असते. 

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने राजधानी कोहीमापासून काही कि.मी. अंतरावर हॉर्नबिल फेस्टिवल साजरा करण्यासाठी किसमा हे गाव वसवले आहे. नागालँडच्या १७ प्रमुख जनजातींची घरे या गावात उभारण्यात आली आहेत. अंगामी, सेमा, जेलियांग अशा १७ जनजातींचे एक घर. इथे प्रत्येक जनजातीच्या घराची रचना वेगळी असते. कुणाच्या स्वयंपाकघराची खास ठेवण तर कुणाच्या छपराची खास तर्‍हा. जसे वेशभूषेवरून कोणती व्यक्ती कोणत्या जनताजीची हे ओळखता येते, तसेच जाणकार केवळ वास्तूरचना पाहून हे कोणत्या जनजातीचे घर आहे, हे सांगू शकतो. दरवर्षी प्रत्येक जनजातीच्या एकेका गावाला या घराचा ताबा दिला जातो. पारंपरिक वेशभूषेतील नृत्य आणि संगीत आणि खास नागा पद्धतीची झणझणीत पक्वान्ने ही या फेस्टिवलची वैशिष्ट्ये. खान-पान आणि नृत्य-संगीताशिवाय कोणत्याच संस्कृतीचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. शेकडो वर्षांपासून वाहात आलेला संस्कृतीचा हा अखंड झरा हाच जगभरातून येणार्‍या पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य बिंदू असतो. मांसाहाराशिवाय नागा जेवण पूर्ण होऊ शकत नाही. पोर्क, बीफ या नियमित मांसाशिवाय तिथे मिथुन या प्राण्याच्या मांसाचेही सेवन केले जाते. कुत्र्याचे मांस नागालँडमध्ये चवीने खाल्ले जाते. या मांसापासून बनलेले विविध पदार्थ या फेस्टिवलमध्ये चाखता येतात. मिथुन हा जंगली प्राणी आहे. एकेकाळी भाल्याने त्यांची शिकार केली जायची. आता मात्र शिकारीसाठी छर्‍यांच्या बंदुकीचा वापर केला जातो. चुलीच्या धुरावर सुकविलेल्या पोर्कपासून तयार केलेले पदार्थ विदेशी पर्यटक अतिशय आवडीने खातात. महाराष्ट्रात समुद्र किनार्‍यावर वसलेल्या लोकांच्या जेवणात मासे हा अविभाज्य घटक असतो. तसा नागालँडमध्येही अनेक जनजातींच्या जेवणात माशांवर भर असतो. रेंगमा, लोथा जनजातीचे लोक मत्स्यप्रेमी असून त्यांच्या ताटात तळलेले, सुकट आणि ग्रेव्हीतल्या माशांची रेलचेल असते. हॉर्नबिल फेस्टिवलच्या निमित्ताने त्यांच्या स्वयंपाकघरात रांधले जाणारे मासे चाखण्याची संधी पर्यटकांनाही मिळते. जगभरात जिथे-तिथे पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा मागोवा घेण्याचे आणि त्यातून मानवतेच्या इतिहासाचा स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न कायम सुरू असतात. ज्या मूळ धर्मातून नागा संस्कृतीचा उगम झाला तो धर्म बाप्टिस्ट चर्चच्या कृपेने नागालँडमध्ये केवळ नावापुरता उरला आहे. मूठभर संख्येने शिल्लक असलेले हे लोक अनेक अडचणींचा मुकाबला करत पूर्वापार चालत आलेली संस्कृती जपण्याचा आटापिटा करीत आहेत. हॉर्नबिल फेस्टिवल त्यांच्या दृष्टीने इष्टापत्ती म्हणावी लागेल. 
 
भारतातल्या प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या फेस्टिवलचे आयोजन केले जाते. परंतु तरीही हॉर्नबिल फेस्टिवल अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ख्रिस्ती धर्मातील बाप्टिस्ट पंथांची बहुसंख्या असलेले नागालँड हे जगातले सर्वात मोठे राज्य आहे. ख्रिस्ती धर्मातील हा अत्यंत कडवा पंथ मानला जातो. नागालँडमध्ये या पंथाला मानणार्‍या लोकांची संख्या खूप मोठी आहे. चंद्राची पूजा करणारे, अग्नीची पूजा करणारे, निसर्गाची पूजा करणारे, सैतान पूजक असल्याचा प्रचार करून चर्चने जगभरात त्यांना चेपण्याचा प्रयत्न केला. नागालँड त्याला अपवाद कसा असेल? एकेकाळी बाप्टिस्ट चर्चने नागांच्या पवित्र धार्मिक प्रतिमांची सार्वजनिक होळीही केली होती. एकेकाळी इथे धर्मांतर करण्यासाठी मिशनरी आले होते. आज जगभरात इथून मिशनरी जात आहेत. नागा दहशतवादी संघटना एनएससीएन (आयएम) चा एक म्होरक्या आयझॅक चिशी स्वू याने २००३ मध्ये एक खळबळजनक माहिती उघड केली होती. नागालँडसह अन्य राज्यांत राहणार्‍या नागांची संख्या आता सुमारे ४० लाख असून त्यापैकी ९५ टक्के लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. नेपाळ, चीन, म्यानमार, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम आदी देशांत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी १० हजार नागा मिशनर्‍यांची फौज तयार आहे. ज्या नागालँडमध्ये बाप्टिस्ट मिशनर्‍यांनी धर्मांतराचा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे राबवला त्याच नागालँडमध्ये पुन्हा संस्कृतीचा धागा मजबूत करणारा हॉर्नबिल फेस्टिवल रूजला आहे. हा वेल चांगला फोफावतो आहे. धर्मांतरित झालेला नागा त्याच्या पारंपरिक वेशभूषा आणि धार्मिक चिन्हांसह या फेस्टिवलमध्ये प्रकट होतो. हेच संस्कृतीरंग पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती असे दिग्गज या फेस्टिवलमध्ये सामील होतात. यंदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन झाले. हॉर्नबिलला अशा प्रकारची झगमगती आभा प्राप्त झाल्यामुळे राज्य सरकारही फेस्टिवलच्या यशासाठी मेहनत घेते आहे. नागांनी धर्म बदलला परंतु संस्कृतीशी त्यांची नाळ अद्याप तुटलेली नाही. पश्चिमेची संस्कृती झुगारून देण्याचा बंडखोर विचार आता इथल्या ख्रिस्ती बांधवांच्या मनातही बळावत चालला आहे.

No comments:

Post a Comment