गुजरात निवडणुकीच्या धामधुमीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस कलवरी या पाणबुडीला नौदलात सामील
करून घेण्यात आले. ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने ही एक झेप आहे असेही यावेळी पंतप्रधान म्हणाले. खरोखरच
भारतीय नौदलाच्या . या
पाणबुडीचे आरेखन जरी डीसीएनएस या फ्रेंच कंपनीचे असले तरी तंत्रज्ञान हस्तांतरण
कराराद्वारे मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये ही डिझेल – इलेक्ट्रीक पाणबुडी बांधली गेली आहे, त्यामुळे
संरक्षणक्षेत्राशी संबंधित उत्पादनांमध्ये भारताने स्वयंपूर्णतेचा जो ध्यास
घेतलेला आहे, त्याला नवी ऊर्जा यामुळे मिळेल यात शंका नाही. मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ला जरी ‘कलवरी’ मुळे ऊर्जा
मिळालेली असली तरी या पाणबुडीच्या निर्मितीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतला
गेलेला नव्हता. तो घेतला गेला तेव्हा संरक्षणमंत्रीपदी प्रणव मुखर्जी होते.
तत्पूर्वी २००५ साली भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यातील ‘किलो क्लास’ पाणबुड्या निकाली
काढून त्या जागी नव्या अत्याधुनिक पाणबुड्या सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पीन क्लास आणि जर्मन बनावटीच्या टाइप २१४ या दोन
विकल्पांमधून नौदलाला निवड करायची होती. तेव्हा फ्रेंच स्कॉर्पीन क्लास प्रकारच्या
पाणबुडीची निवड भारताने केली आणि संबंधित फ्रेंच कंपनीकडून अशा प्रकारच्या सहा
पाणबुड्या भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांच्या विलंबानंतर का होईना, परंतु अखेरीस ‘कलवरी’ या नावाने या ‘स्कॉर्पीन क्लास’ ची पहिली पाणबुडी
भारतीय नौदलात सामील झाली आहे. मोदी सरकार सत्तेवर येताच भारतीय नौदलाची
पाणबुड्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी या व्यवहाराला गती दिली खरी, परंतु मध्यंतरी जे
कुप्रसिद्ध नेव्ही वॉर रूम लीक प्रकरण उजेडात आले, त्यात याच ‘स्कॉर्पीन’ पाणबुड्यांसंबंधीची
अत्यंत गोपनीय माहिती उघड झाली हे वाचकांना आठवत असेल. या पाणबुड्यांवरील संवेदक, संपर्क यंत्रणा, क्षेपणास्त्र
यंत्रणा यासंबंधीची ही अत्यंत गोपनीय माहिती बाहेर फुटली. आमची जबाबदारी
तंत्रज्ञान पुरवण्याची होती,
ती गोपनीय राखण्याची नव्हे असे सांगत
फ्रेंच कंपनीनेही त्याबाबत हात झटकले. ही माहिती भारतातून बाहेर गेलेली नाही वा
शंभर टक्के माहिती बाहेर गेलेली नाही अशी सारवासारव जरी भारत सरकारने त्यावर
केलेली असली, तरीही बाहेर फुटलेली माहिती एव्हाना शत्रूराष्ट्रांपर्यंत
पोहोचलेली असल्याने भविष्यात ते धोकादायक ठरू शकते हेही तेवढेच खरे आहे. ६७ साली
नौदलात दाखल झालेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या पाणबुडीचेही ‘कलवरी’ हेच नाव होते, परंतु त्या तुलनेत
ही नवी ‘कलवरी’ अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘अकॉस्टिक सायलन्स’ तंत्रज्ञानामुळे
पाण्यात आवाज न करता वावरण्यापासून शत्रूला संशय येऊ न देता क्षेपणास्त्र हल्ले
चढवण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्ये तिच्यात अंतर्भूत आहेत. पाण्यात तब्बल २१ दिवस शांत
उभी राहण्याची तिची क्षमता आहे. विशेष म्हणजे वातावरणातील प्राणवायूची मदत न घेता
तिची प्रॉपल्शन यंत्रणा काम करू शकते. तिला एअर इंडपेंडंट प्रॉपल्शन सिस्टम असे
म्हटले जाते. त्यामुळे ती अधिक काळ पाण्याखाली राहू शकते. आपल्या डीआरडीओनेही अशा
प्रकारच्या एआयपी सिस्टमच्या निर्मितीचे काम हाती घेतलेले आहे. या पाणबुडीवरील
ब्लॅक शार्क टॉर्पेडोंची निर्मिती बोफोर्स प्रकरणात बदनाम झालेल्या
फिनमेक्कानिकाची उपकंपनी असलेल्या एका कंपनीने बनवलेली असून मध्यंतरी त्या
भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात आले होते. आता भारताची डीआरडीओ वरुणास्त्र हे भारतीय
बनावटीचे टॉर्पेडो विकसित करीत आहेच. शत्रूच्या युद्धनौकांना पूर्ण गाफील ठेवून
पाण्यातल्या पाण्यात क्षेपणास्त्र हल्ला चढवण्याची ‘कलवरी’ची क्षमता आहे. आजकालच्या
पाणबुड्यांमध्ये तिचा वेगही अधिक आहे. २००० साली भारतीय नौदलात सामील झालेल्या
सिंधुशस्त्र पाणबुडीनंतर तब्बल सतरा वर्षांनी ही ‘कलवरी’ नौदलात दाखल झाली आहे. तिच्या पाठोपाठ
लवकरच ‘खांदेरी’ येणार आहे. त्यानंतर ‘कारंज’ येईल. अशा सहा स्कॉर्पीन क्लास
पाणबुड्या जेव्हा नौदलात सामील होतील तेव्हा दक्षिण आशियातील भारताची सागरी शक्ती
किती वाढलेली असेल आपण कल्पना करू शकतो. दक्षिण आशियामधील अशांतता लक्षात घेता अशा
प्रकारच्या सागरी सामर्थ्याची भारताला नितांत आवश्यकता आहे. ७१ च्या भारत – पाक युद्धात आपल्या
पाणबुड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. पाकिस्तानच्या ‘गाझी’ पाणबुडीला बुडवून
शिकवलेला धडा पाकिस्तान अद्याप विसरलेला नसेल. नौदल काय, हवाई दल काय किंवा
लष्कर काय, भारताने अधिकाधिक सामर्थ्यशाली आणि त्यातही स्वयंपूर्ण होणे ही
आजच्या काळाची गरज आहे
No comments:
Post a Comment