Total Pageviews

Saturday, 16 December 2017

पुन्हा दाऊद- कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीच्या दूरध्वनीवरील संभाषणांच्या ध्वनिफिती एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याने तो पुन्हा एकवार चर्चेत आला आहे.



या ध्वनिफिती अलीकडच्या काळातील असल्याने त्यातील दाऊदचा आवाजही एका प्रौढाचा आहे. दाऊदची हिरो स्टाइलची छायाचित्रे जरी आजवर प्रसारमाध्यमांमधून वारंवार दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात ती पंचवीस तीस वर्षांपूर्वीची आहेत. शारजातील एका क्रिकेट सामन्याला दाऊद हजर राहिला होता, तेव्हाची त्याची छायाचित्रे किंवा नातलगांच्या लग्नातील छायाचित्रे आजही त्याच्यासंदर्भात जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा माध्यमांकडून दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात वाढत्या वयाला दाऊद देखील अपवाद ठरू शकत नाही. त्यामुळे यदाकदाचित उद्या दाऊद जर पकडला गेला वा जाहीरपणे समोर आला, तर त्याची आजवर उपलब्ध असलेली छायाचित्रे आणि तो यात प्रचंड फरक दिसून येईल. छोटा राजनच्या बाबतीत हेच घडले होते. एकेकाळी दाऊदचा उजवा हात असलेला छोटा राजन पुढे त्याचा प्रतिस्पर्धी बनला आणि स्वतःची देशभक्त डॉन अशी प्रतिमा निर्माण करू लागला, तरी त्याचे उपलब्ध छायाचित्र हे त्याच्या पहिल्या अवतारातले होते. त्यामुळे जेव्हा दाऊदच्या माणसांनी त्याच्यावर विदेशात प्राणघातक हल्ला केला, तेव्हा त्यातून जीव बचावल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या आसर्‍याला आलेला प्रत्यक्षातील छोटा राजन हा दिसायला फार वेगळाच माणूस होता. दाऊद हा तर आजवर दंतकथा बनून राहिलेला आहे. त्याला जागतिक दहशतवादी घोषित करून महिने उलटले तरी अद्याप त्याचा केसही कोणी वाकडा करू शकलेले नाही. पाकिस्तानच्या आश्रयाने कराचीमध्ये ऐषारामात राहणार्‍या दाऊदची बायको या ध्वनिफितीत त्याच्या एका हस्तकाला एका बड्या ब्रँडची हँडबॅग आणायला सांगते याचाच अर्थ हा ऐषाराम अजूनही सरलेला नाही. दाऊद सुखाने जगतो आहे. मध्यंतरी तो खूप आजारी असून भारतात परतू पाहात असल्याचे दावे करण्यात आलेले होते. दाऊदला भारतात आणू म्हणून वल्गना करणार्‍यांना अद्याप ते का शक्य होऊ शकले नाही हे खरे तर एक आश्चर्यच आहे. जागतिक दहशतवादी म्हणून त्याला घोषित केलेले असतानाही तो पाकिस्तान किंवा अलीकडे तत्सम देशाच्या आश्रयाने सुखाने राहतो आहे याचा अर्थ त्याचे सुरक्षा जाळे आजही मजबूत आहे. त्यामुळे आपला ठावठिकाणा कोणालाही लागू नये याबाबतीत तो विलक्षण दक्षता बाळगत आला आहे. त्याच्याभोवतीचे हे सुरक्षा कवच भेदून त्याच्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत भारतीय गुप्तचर यंत्रणा जोवर दाखवणार नाहीत आणि त्यांना तसे राजकीय पाठबळ जोवर मिळणार नाही, तोवर दाऊद आरामात राहील. त्याच्या संभाषणांना इंटरसेप्ट करण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले याचाच अर्थ तो कुठे आहे यासंदर्भात त्यांना पक्की माहिती आहे, परंतु तरीही त्याच्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे. दाऊदच्या भारतातील मालमत्तांचा नुकताच लीलाव करण्यात आला. दाऊदच्या या मालमत्ता म्हणजे मोफतच्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची बाब बनून राहिल्या होत्या. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात काही वल्ली आजवर उतरल्या. कोणी त्याची कार खरेदी करून जाळून टाकली, कोणी त्याची मालमत्ता खरेदी करून तेथे सार्वजनिक शौचालय उभारण्याची घोषणा करून टाकली, परंतु अखेरीस त्याच्या या मालमत्ता सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट म्हणजे एसबीयूटीने अकरा कोटी रुपयांना खरेदी करण्यात यश मिळवले आहे. अर्थात, या ट्रस्टला या व्यवहारात रस का हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यापूर्वी भले भले या व्यवहाराशी दाऊदचा संबंध असल्याने त्यात उतरायला घाबरत होते. लिलावाचे यापूर्वीचे प्रयत्न त्यामुळे असफल ठरले होते. आता दाऊदच्या मालमत्ता लिलावात विकल्या गेल्याने त्याची भारतीय समाजजीवनावरील दहशत संपुष्टात आल्याचे समजायचे की या व्यवहारावर त्याचा वरदहस्त होता असे मानायचे हे जनतेवर आहे. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद भारत सोडून पळून गेला, त्यानंतर अनेक बडे गुंडपुंड प्रकाशात आले, परंतु एवढी वर्षे उलटली तरी त्याची गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली प्रतिमा अजूनही पुसली गेलेली नाही. निवडणूक जवळ येऊन ठेपली की, दाऊदच्या मुसक्या आवळण्याची भाषा करणारी राजकारणी मंडळी नंतर सोईस्कर मौन पत्करतात. हे चित्र आता तरी बदलायला हरकत नसावी. त्याच्या वैध अवैध व्यवसायांच्या आर्थिक नाड्या आवळून त्याची आर्थिक कोंडी जोवर होणार नाही, तोवर दाऊद इब्राहिमचा बोलबाला कायम असेल. अधूनमधून त्याच्या हस्तकांच्या दूरध्वनी संभाषणाच्या ध्वनिफिती बाहेर येतात. तो पुन्हा चर्चेत येतो, परंतु यावेळी प्रथमच प्रत्यक्ष दाऊदच्या आवाजाची ध्वनिफीत जगासमोर आलेली आहे. आता प्रत्यक्ष दाऊदला जगासमोर आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करील काय.


No comments:

Post a Comment