तार्किक विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि स्मृती ही मानवाला लाभलेली सर्वात मोठी देणगी. मानवाने आपल्या या शक्तीच्या जोरावर कल्पना आणि क्षमतांचा विस्तार करू शकणार्या संगणकाचा शोध लावला. पुढे एका संगणकाला अन्य संगणकाशी जोडणार्या इंटरनेटच्या तंत्राचा जन्म झाला. जगभरात इंटरनेटच्या तंत्रज्ञानाने क्रांती केली आणि फक्त एका टिचकीच्या जोरावर जगाच्या कानाकोपर्याला एकमेकांच्या जवळ आणले पण या तंत्रज्ञानाचा उपयोग करून माणसाने जशी चांगले कामे केली तशीच याचा फायदा दुष्प्रवृत्तींनीही उचलायला सुरुवात केली. यातूनच सायबर गुन्हेगारीचा उदय झाला. आज या सायबर गुन्हेगारीची मोठी समस्या भारतासह जगभरातील सर्वच संगणक वापरकर्त्यांपुढे, सॉफ्टवेअर तज्ज्ञांपुढे, तंत्रज्ञांपुढे निर्माण झाली आहे. इंटरनेटचा दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरूपयोग फक्त एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातच नव्हे तर राष्ट्राची सुरक्षा, सुव्यवस्था, अर्थव्यवस्था डळमळीत करण्यापर्यंत वाढला आहे. यावर उपाय शोधण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत असून नुकताच मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या सायबर गुन्हेगारीशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचाच होय. त्यातच बिटकॉईनचे वाढते आकर्षण पाहून रिझर्व्ह बँकेने नुकतेच गुंतवणूकदारांना बिटकॉईनपासून दूर राहण्याचा इशारा देऊ केला आहे.
डिजिटल इंडियाचा बोलबाला वाढत असून इंटरनेटचा वेग, सायबरचे जाळे, इंटरनेटची व्याप्ती वाढत असताना सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. कधी कोणा तरुणीचे फेसबुक खाते हॅक करून अश्लील छायाचित्रे टाकली जातात, तर कधी ट्विटरवर अश्लील टिप्पणी केल्या जातात. कधी कोणाच्या बॅंकेतून तर कधी डेबिट, क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढले जातात. संगणकप्रणाली हॅक करून माहितीची चोरी केली जाते, तर कधी मालवेयर, स्पायवेअर, व्हायरसच्या माध्यमातून संपूर्ण संगणक प्रणालीच ठप्प पाडली जाते. ई-मेल, चॅटिंग, एसएमएसद्वारे फसवणूक केली जाते. फिशिंग, किडनॅपिंग, धमकी देणे, स्पॅम मेल, वेब कॅमेऱ्याचा वापर करून आक्षेपार्ह चित्रण करून त्यातून बदनामी केली जाते. सायबर गुन्हेगारीत वस्तूंची ऑनलाईन खरेदी - विक्री करणार्या वेबसाईटवरूनही फसवणूक केली जाते. बर्याचदा आपण विकत घेतलेली वस्तू न पाठवता त्याऐवजी भलतीच वस्तू आपल्या हातात पडते. या सर्वच प्रकारच्या सायबर गुन्हेगारीवर आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी भारतात कायदाही करण्यात आला आहे, पण केवळ कायदा करून भागणार नाही. कारण जोपर्यंत इंटरनेट वापरकर्ते इंटरनेट साक्षर होणार नाहीत, तोपर्यंत या गुन्हेगारीच्या घटना घडतच राहतील. इंटरनेट वापरताना आपला आयडी, पासवर्ड, खाते क्रमांक, डेबिट-क्रेडिट कार्ड क्रमांक-पासवर्डचा वापर करताना सावधानता बाळगल्यास, इमेल, एसएमएसच्या माध्यमातून दाखवल्या जाणार्या आमिषांना बळी न पडल्यास यावर बर्याच प्रमाणात नियंत्रण आणता येऊ शकते. शिवाय ऑनलाईन खरेदी करताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपली खाजगी माहिती जगाच्या सायबर जाळ्यात समोर न आणता सुरक्षित व्यवहाराची काळजी घेणे हे आजच्या नागरिकाचे कर्तव्य आहे. आपली सुरक्षा आपल्या हाती, असे म्हणत आपल्या संगणकावर ऍण्टी व्हायरस, फायर वॉलप्रणाली इन्स्टॉल करावी. याचबरोबरच फसवे, स्पॅमइमेल उघडू नयेत.
दुसरा मोठा मुद्दा म्हणजे महिला-मुलींचा ऑनलाईन केला जाणारा छळ मानसिक त्रास होय. अश्लील, फोटो, कॉमेंट, मेसेजेसच्या माध्यमातून अनेकदा त्रास दिला जातो. यावर उपाय म्हणजे अशा व्यक्तींना ब्लॉक करणे आणि त्यांची पोलिसांत तक्रार करणे, पण बर्याचदा घाबरून किंवा बदनामीमुळे मुली अशा प्रकारात तक्रार करण्यास पुढेच येत नाहीत. यामुळे टुकारांना अधिकच चेव चढतो आणि ते एक मुलगी झाली की, लगेच दुसरी मुलगी अशा प्रकारे छेडछाडीचे उपद्व्याप करतच राहतात. सायबर गुन्हेगारीत राज्याचा देशात दुसरा क्रमांक असून मेट्रो शहरांत मुंबईचा पहिला क्रमांक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महिलांविषयीच्या गुन्हेगारीतही आघाडीवर आहे, ही दुर्दैवी गोष्ट. यावर जोपर्यंत कडक कायद्याद्वारे आणि शिक्षेद्वारे जरब बसत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत. या दृष्टीने आता मुंबई पोलिसांनी विशेष कक्ष स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय आवश्यक असल्याचेच स्पष्ट होते.
सायबर दहशतवादाचा प्रकारही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दहशतवादी संघटना इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरतावादाचे विष तरुण मुला-मुलींच्या मनात कालवतात. भारतातील अनेक तरुण ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले होते. सायबर दहशतवादी व्यक्तिगत नुकसान करण्यापेक्षा मोठमोठ्या कंपन्या, बँका, सरकारचे विविध विभाग यांच्या वेबसाईटस हॅक करतात. अनेक देशांच्या सरकारी वेबसाईट्सवर अपमानास्पद, आक्षेपार्ह मजकूर टाकला जातो, तिसर्याच कोणत्यातरी देशाचा झेंडा फडकावला जातो. हा प्रकार धोकादायक असून पोलिसांनी अशा दहशतवादी कृत्यांवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा संपूर्ण यंत्रणादेखील कोसळू शकते.
सायबर गुन्हेगारी वाढत असताना आणि त्यातील गुन्ह्यांची उकल होतानाच त्यात पुढे येणार्या आव्हानांकडेही डोळे उघडून पाहिले पाहिजे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरक्षा उपायांबरोबरच एथिकल हॅकिंगलाही उत्तेजन देता येऊ शकते. एथिकल हॅकिंगच्या साह्याने गुन्हे उघडकीस आणून त्यातील दोषींना शिक्षाही देता येईल. यासोबतच चित्रपट, गाणी, बौद्धिक संपत्ती चोरी होण्यापासून, पायरसीपासून कशाप्रकारे वाचवता येईल यावरही विचार व्हायला हवा. इंटरनेटच्या साह्याने आपल्या कार्याचे विकेंद्रीकरण करणे शक्य आहे. देशातील डिजिटल डिव्हाईडदेखील दूर होण्याची गरज आहे, त्यासाठी इंटरनेट साक्षरतेची गरज आहे. आता निरनिराळे सरकारी विभाग ऑनलाईन कामकरतात. शालेय कामापासून महाविद्यालयीन कामे, शिष्यवृत्तीचे अर्जही ऑनलाईनच भरले जातात. पण सरकारी वेबसाईटस आणि खाजगी कंपन्यांच्या वेबसाईटची तुलना करता वेबसाईट हँग होण्याचे प्रमाण सरकारी वेबसाईटचे जास्त असते. यावरही उपाय शोधले पाहिजेत. यामुळे इंटरनेटचे अवकाश अधिक सुरक्षित आणि आनंददायक होईल
No comments:
Post a Comment