Total Pageviews

Friday 18 October 2013

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान -ब्रिगेडियर हेमंत महाजन

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान -ब्रिगेडियर हेमंत महाजन लेखकाचे मनोगत प्रकरण १-1962 चे चीनी आक्रमण :अपयश आपल्या सेनेचे नाही तर नेत्यांचे? प्रकरण २-१९६२ च्या घोडचुकांपासून आपण काही शिकलो का? प्रकरण ३सध्याची परीस्थीती- चीनच्या पुढे नेहमिच गुडघे टेकले प्रकरण ४-चीन व पाकिस्तान यांच्याशी एकाचवेळी लढण्याची तयारी बाळगणे आवश्यक प्रकरण ५-भारत, पाकिस्तान चीन आण्विक प्रक्षेपणास्त्र ,अणु युद्ध, आणि देशाची सुरक्षा प्रकरण ६चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी पळवतोय प्रकरण ७-चीनची आर्थिक घुसखोरी प्रकरण ८-चिनी ससा आणि भारतीय कासव यांच्यातील विकासासाठी शर्यत प्रकरण ९-तिबेट, सिकयांग,तैवान येथील "स्वातंत्र्य चळवळी चीनचेमर्मस्थान प्रकरण१० -चीनमधील अंतर्गत कलह प्रकरण११- पाकिस्तान, चीनचे भारताशी छुपे युध्द प्रकरण १२-काही क्षेत्रात चीनचे नेत्रदिपक यश प्रकरण 1३ चीनचा विश्वसन्चार भारताची सगळीकडेच माघार अमेरिका भारत आणि चीन सम्बध दक्षिण अमेरिकेच्या उपखंडात चीनचा प्रवेश रशिया भारत आणि चीन आफ्रिक खंडात चीनचा प्रवेश चिनी विस्तार मध्य आशियात आणि भारत प्रकरण १४-भारताच्या शेजाऱ्यांशी मैत्री दृढ करण्यावर चीनचा भर मालदीव भारत आणि चीन भूतान भारत आणि चीन पाकिस्तान भारत आणि चीन नेपाळ भारत आणि चीन म्यानमार ,भारत आणि चीन बांगलादेश भारत आणि चीन प्रकरण 1५चीनच्या 'स्ट्रिंग ऑफ र्पल्स' या धोरणाला वेळीच प्रत्युत्तर द्यायची गरज जपान व्हिएतनाम भारत आणि चीन चीनला रोखण्याचा एक मार्ग : व्हिएतनाम साउथ चायना सी आणि भारत प्रकरण १६-चीनशी कसे वागावे प्रकरण १७माझ्या प्रिय,मित्रानो चीनच्या पुढे नेहमीच गुडघे टेकले चीनचे हे खरे रुप ओळखून या देशापासून सावध राहण्याचा इशारा एका सन्यास्याने दीडशे वर्षापूर्वी दिला होता. त्या सन्याशाचे नाव होते "स्वामी विवेकानंद".चिनी घुसखोरी थाबांयचे काही लक्षण दिसत नाही.भारतीय सैन्याने या वर्षी जुलै २०१३पर्यंत 270 वेळा चिनी सीमोल्लंघन आणि गेल्या तीन वर्षात 2300 वेळा चिनी आक्रमक सीमा गस्तींच्या हालचाली ( भारतीय सैन्याबरोबर आमने-सामने धक्का बुक्कीचा समावेश) नोंदविल्या आहेत. चीनचे १९ शेजारी राष्ट्रांबरोबर गंभीर सीमाविवाद होते. भारत व भूतान ही एकमेव अशी राष्ट्रे आहेत, ज्यांच्याबरोबर चीनचे सीमाप्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून येत्या काळात भारत-चीन सीमा ही तणावाची, घुसखोरीची, सैन्यातील चकमकींची आणि अंतहीन सीमा चर्चांची असेल. आतापर्यंतच्या 19 चर्चांमधून काही निष्पन्न झाले नाही,१९०० चर्चांमधून सुधा काही निष्पन्न होणार नाही . जेव्हा चीनला वाटेल की, की भारताने चीनचे प्रभुत्व मान्य केले आहे, तेव्हाच चीन हे प्रश्न सोडवेल. चीन सीमेवरुन जुन २०१३ मध्ये असलेला तणाव दूर करण्यासाठी केंद्र सरकारने चीनच्या पुढे गुडघे टेकले. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडण्याचा निर्णय घेतला. भारत ही उद्याची महासत्ता होणार असून जगाला आमच्या दारात यावे लागणार आहे अशी खात्री पटल्याने काहीही न करता आम्ही ढिम्म पडून आहोत. ज्या चिन्यांनी घुसखोरी केली, त्यांना मागे ढकलायचे सोडून, आपले सैन्यच आपल्याच प्रदेशात मागे घेणे ही कोठली राजनीती? राजकीय पक्ष काहीच का बोलत नाही ? तीन आठवडे 19 किमीपर्यंत घुसखोरी करून उभारलेल्या छावण्या चीनने अखेर मागे घेतल्या. काही वर्तमानपत्रांनीही "चीनची गुर्मी जिरली‘, "यशस्वी डावपेच‘ (आपल्याच भूमीत लष्कर मागे घेतले ), "देशाला युद्ध परवडणारे नाही‘ (पूर्णपणे चूक, आजच्या घडीला देशाचे रक्षण करण्यात लष्कर समर्थ), "भारताच्या चाणाक्ष आणि आक्रमक मुत्सद्देगिरीची परिणती" (????), "आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक होत आहे‘ (सगळे जग आपल्याला हसते आहे) "निवृत्त लष्कर अधिकारी सरकारच्या या भूमिकेचे कौतुक करत आहेत‘(त्यांची नावे सांगा) वगैरे "हेडलाईन‘ छापल्या. पण त्या किती पोकळ होत्या, हे लगेच सिद्ध झाले. चीनमध्ये नवे नेतृत्व आल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे नवे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी भारताशी मैत्री करण्याची भाषा केली.चीनला भारताची बाजारपेठ हवी आहे, मात्र मैत्री नको.व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहीशी होईल का? जगात अमेरिका आणि आशियात जपान व भारत हे चीनला आपले प्रतिस्पर्धी वाटतात. जपानशी कुरापत काढली आणि जपाननी आपले एयरफ़ोर्स अलर्ट केले.चीनने व्हिएतनामवर दबाव टाकला, व्हिएतनामने आपला शत्रू असलेल्या अमेरिकेशी मैत्री प्रस्थापित केली.मात्र परिस्थिती गंभीर असतानाही भारतीय नेते मात्र बेभान वक्तव्ये करत आहेत. `लहानसा फोड आला तर संपूर्ण शरीराचे सौंदर्य नष्ट होत नाही’ असे सलमान खुर्शिद म्हणाले. लडाखमधील चिनी लष्करी अतिक्रमणाला, छोटे समजणे धोकादायक ठरणार आहे. असे प्रोत्साहन मिळत राहिले, तर घुसखोरीबाबत चीनला काळजी करण्याचे कारणच उरणार नाही. तिन्हीं देशापैकी भारताची कुरापत काढणे सोपे, असे चीनला वाटते. हा समज भ्रामक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी तरी भारताने धैर्य दाखविले पाहिजे. जेव्हा द्विपक्षीय चर्चा होणार असते त्यावेळी कुरापती चीन काढत असतो. एकीकडे भारतासोबत व्यापार वाढवायचा, आणि दुसरीकडे वादग्रस्त सीमाभागात लष्करी वा हवाईतळ निर्माण करायचा, क्षेपणास्त्रे तैनात करायची, लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग सीमेपर्यंत आणून भिडवायचे, भारताच्या अवतीभवती नवे नाविक तळ निर्माण करायचे, अशी चीनची रणनीती राहिली आहे. भारताभोवती 'ड्रॅगन'चा विळखा आणखी आवळत चालला आहे. सेशेल्समध्ये नाविक तळ,पाकिस्तानातील बलुचिस्तानात ग्वादर बंदर, म्यानमारमध्ये कोको आयलंड, श्रीलंकेत हंबनटोटा बंदर, बांगलादेशात चितगाव ही बंदरे चीनने विकसित केली आहेत. नकाशात पाहिल्यास, भारतीय द्वीपकल्पाभोवती ही 'मोत्याची माळ' (की गळ्या भोवती फ़ांस ?) चीन ओवतोय. चीनच्या 'एन्सर्कलमेंट'ला भारताने वेळीच प्रत्युत्तर दिले पाहिजे. मालदीव, मादागास्कर, तसेच सेशेल्सबरोबर असलेल्या संबंधात वाढ करणे, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्याशी विशेष संबंध प्रस्थापित करणे यांसारख्या उपाययोजना भारत करू शकतो. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. अनेक क्षेत्रांमध्ये चीनची पाऊले भारतीय हिताच्या विरोधी पडताना दिसत आहेत. काश्मीरमधील भारतीयांना वेगळा व्हिसा देणे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरणे बांधणे, ब्रह्मपुत्रा सारख्या नदावर धरण बांधणे वगैरे.ब्रह्मापुत्रेची 'सरस्वती' होऊ नये म्हणजे मिळवले. कुठल्याही क्षेत्रात इतरांवर कुरघोडी करू पाहणारा सामर्थ्यशाली चीन एकीकडे आणि कुठल्याही धोरणामध्ये कमालीचा गोंधळ असणारा भारत दुसरीकडे, अशी विषम स्थिती बदलण्याची नितांत गरज आज येऊन ठेपली आहे. ईन्दीरा गांधी,सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे एखादे खंबीर भूमिका घेणारे आणि कोणत्या परिणामाला सामोरे जाण्याची ताकद असणारे नेते असावेत . आपल्या हद्दीत घुसखोरी होऊनही भारतानेही आपला जगविख्यात संयम सोडलेला नाही! सैन्यक्षमता केवळ शस्त्रांनी येत नसते.शौर्य, हिंमत ,सैन्याचे नेत्रुत्व, आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यश मिळवु शकतो. हृदयात आग असेल, बाहूत ताकद असेल आणि देशभक्तीचा ज्वर असेल, तर सैनिक देशासाठी लढू शकतात, रक्त सांडू शकतात. आता आम्ही १९६२ मधील भारतवासी राहिलेलो नाही. सीमेवरील आमची सैन्यक्षमता आणि तयारी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने चांगली झालेली आहे. चीनचे आव्हान परतविणे कठीण नाही. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. अशी इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी जनतेनेच सरकारवर दबाव टाकायला हवा. चीनच्या घुसखोरीच्या विरोधात जनतेनेही उत्स्फूर्तपणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करायला हव्यात. संपूर्ण देशात चीनच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला हवे. चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. अशा वस्तू विकणार्यांना देशद्रोही मानायला हवे. व्यापार ही चीनची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे . त्यामुळे या देशात चिनी वस्तुंच्या व्यापारावर निर्बंध आले तर ते चीनला परवडण्यासारखे नाही.त्यादृष्टीने जनता विचार करेल ही आशा आहे. सीमेवर लष्करी हालचाली वाढविणे, चीनचा विरोध डावलून दलाई लामांची अरुणाचल भेट होऊ देणे, चिनी कामगारांना व्हिसा नाकारणे करायला हवे. चिनी मालावर अँटिडम्पिंग नियम लावणे किंवा आरोग्याच्या कारणावरून चिनी बनावटीच्या खेळण्यांवर बंदी घा्लावी. येत्या पाच वर्षात सीमा प्रश्नवर राजकीय तोडगा काढण्यास चीनला भाग पाडणे हाच त्यामागचा हेतू असावा. चीन आणि पाकिस्तानशी एकाच वेळी युद्ध करण्याची तयारी आपण करायला हवी. माओवाद्यांना साह्य करून आणि पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मदतीने चीन आपल्याविरूध्द तिसरी आघाडी उघडत आहे.तिबेट, सिकयांग,तैवान येथील "स्वातंत्र्य चळवळी चीनचे मर्मस्थान आहे. चीनला जशास तसे उत्तर द्यायला हवे. चीनच्या शस्त्रबलाशी केवळ अध्यात्मिक विचार आणि वायफळ बडबड करून उपयोग होणार नाही. एखाद्या हिंस्त्र पशूच्या पुढे जर तुम्ही मोदकाचा नेवैद्य ठेवला तर तो मोदक खाईल की तुम्हाला खाईल. हे पुस्तक संशोधन प्रबंध नाही.मी अनेक वर्तमान पत्रात या विषयी लिखाण केले आहे.ते एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. भारत चीन संबधाचा पुर्ण आढावा घ्यायचा असेल, तर एक महाग्रंथच तयार करावा लागेल.पुस्तक बोजड होऊ नये, सहजपणे वाचले जावे, असा मी प्रयत्न केला आहे. एखादा सुगरण शितावरुन भाताची परीक्षा करतो,तसे तुमच्या सारखे जाणकार वाचक या अल्प माहीतीवरुन आक्रमक चीनचे संपुर्ण चित्र डोळ्यासमोर आणु शकतील. देशविरोधी चिनी कारवायाच्यां विरूध्द जनजागृती करण्याचा प्रयत्न, या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात किती यश मिळाले, हे वाचकांनी ठरवायचे. चीनला एकवार धडा शिकवायलाच हवा, असा सूर देशातील जनतेतूनही उठू लागला आहे. या ड्रॅगनचे कंबरडे मोडण्याची संधी भारताला आहे. भारत हे करू शकेल काय?

No comments:

Post a Comment