म.टा.वृत्तसेवा,निपाणी
काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेवर केरन येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी येथील लष्करी जवान साताप्पा महादेव पाटील (वय २४) गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहीद झाले. याबाबतचे वृत्त शनिवारी सकाळी गावात दूरध्वनीवरून साताप्पा यांचे वडील व भाऊ यांना समजताच गावावर शोककळा पसरली. शनिवारी रात्री उशिरा पार्थिव विमानाने मुंबईत व रविवारी (ता.१३) सकाळी सात वाजता कोल्हापुरात आणि तेथून आठ वाजता मासा बेलेवाडी येथे आणले जाणार आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात याच तालुक्यातील पिंपळगाव (बु) चा जवान कुंडलिक माने पाकच्या गोळीबारात शहीद झाला होता.
श्रीनगर सेक्टर येथील पाकिस्तान सीमेवर गुरुवारी सायंकाळी २६ ए डी रेजिमेंटचे जवान साताप्पा पाटील व त्यांचे सहकारी कर्तव्य निभावत असताना सातच्या सुमारास अतिरेक्यांनी त्यांच्या तळावर हल्ला केला. यावेळी त्यांच्याशी लढताना साताप्पा शहीद झाले. याबाबतचे वृत्त शनिवारी सकाळी गावात समजले. अद्यापही त्यांच्या घरी केवळ वडील महादेव आणि मोठा भाऊ दिलीप यांनाच ही माहिती दिली आहे. शनिवारी सायंकाळी पार्थिव जम्मू येथून दिल्ली येथे व तेथून विमानाने मुंबई येथे आणले जाणार आहे. दरम्यान, साताप्पा पाटील शहीद झाल्याचे वृत्त गावात समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
शहीद साताप्पा हे २००८ मध्ये २६ ए डी रेजिमेंटमध्ये सेनादलात भरती झाले होते. जोधपूर येथे प्रशिक्षण घेऊन त्यांनी तीन वर्षे राजस्थानमध्ये सेवा बजावली. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांची बदली श्रीनगर येथे झाली. त्यानंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात ते एक महिना गावी सुटीवर आले होते. दरम्यान, दीड वर्षापूर्वी तवंदी येथील अश्विनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या पश्चात आई आनंदी, वडील, मोठा भाऊ दिलीप, दोन बहिणी असा परिवार आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी साताप्पा यांचे वडील व त्यांचा भाऊ यांची भेट घेऊन सांत्वन केले. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने दोन लाखांची मदत देण्याचे जाहीर केले, शिवाय मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिवसेनचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संभाजी भोकरे यांनीही भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव, तहसीलदार शांताराम सांगडे यांनी येथे भेट दिली. रविवारी होणाऱ्या अंत्यसंस्काराबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्वरित शोकसंदेशाचे पत्र पाठवून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
रविवारी शहीद जवान साताप्पा यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गावच्या पश्चिमेला असलेल्या जोतिबा रोडवरील माळावर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment