पाटण्यातले स्फोट
vasudeo kulkarni
नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यात झालेल्या हुंकार मेळाव्याच्या आधी झालेले साखळी बॉंबस्फोट, म्हणजे पाकिस्तानच्या चिथावणीने देशात धार्मिक अशांतता निर्माण करायचा धर्मांधांचा कुटील डाव होय. मोदी यांच्या देशव्यापी जाहीर सभा सुरू झाल्यावर, केंद्रीय गृह खात्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. त्यांच्या सभात बॉंबस्फोट घडवले जायची शक्यता असल्यानेच सभा होणाऱ्या संबंधित राज्य सरकारांनाही केंद्रीय गुप्तचर खात्याने, कडक बंदोबस्त ठेवायच्या आणि दहशतवाद्यांच्या कट कारस्थानांवर लक्ष ठेवायच्या तातडीच्या सूचना दिल्या होत्या. बिहार पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कारवाया उधळून लावायसाठी पाटणा शहर आणि राज्यभर काळजी घेतलेली असतानाही, मोदी यांच्या सभेच्या आधी सलग सात साखळी स्फोट झाले, ते बिहार पोलिसांच्या गुप्तचर खात्याचे अपयश होय. या मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी होणार, हे अपेक्षित होतेच. मेळाव्याला तशी गर्दीही झाली. मेळाव्यासाठी वाहने आणि रेल्वेने हजारोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, लोक पाटणा शहरातील गांधी मैदान या सभेच्या ठिकाणी झुंडीने जात होते. या सभेत आणि रेल्वे स्टेशनवर बॉंबस्फोट घडवून सामूहिक हत्याकांड घडवायचे कारस्थान दहशतवाद्यांनी रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सभेच्या आधी सकाळी साडे अकरा वाजता पाटणा रेल्वे जंक्शनवर पहिला बॉंबस्फोट झाला. त्या पाठोपाठ साडे बारा वाजेपर्यंत म्हणजे तासाभरात झालेल्या सहा बॉंबस्फोटात पाच लोक ठार आणि शंभरच्यावर लोक जखमी झाले. सभेच्या ठिकाणीच प्रचंड गर्दीत घड्याळाद्वारे ठरावीक वेळीच स्फोट घडवून प्रचंड मनुष्यहानी घडवायसाठीच, इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या टोळीने अत्यंत नियोजनपूर्वक स्फोटाची ही ठिकाणे निश्चित केल्याचे स्फोटांच्या जागेमुळे उघड झाले आहे.
पहिला स्फोट घडल्यावर पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात आणि गांधी मैदानावर तातडीने तपास सुरू करूनही हे स्फोट झालेच. पण, पोलिसांनी केलेल्या धावपळीने चार जिवंत बॉंब निकामी करण्यात यश मिळाले. या बॉंबचे स्फोट झाले असते, तर अधिक लोकांचे बळी गेले असते. केवळ निरपराध्यांचे हत्याकांडच नव्हे, तर राज्यात दहशत निर्माण करायचाही दहशतवाद्यांचा कुटील डाव असावा, या संशयाला बळकटी येते. स्फोट घडल्यावरही गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. जमलेले लाखो लोक परतही गेले. बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांनी वेळ न दवडता, हे स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीचा तपास सुरू केल्यामुळेच या स्फोटांचा उलगडा आणि त्याच्या सूत्रधाराच्या कटाचे धागेदोरे मिळवण्यात यश आले आहे. इंडियन मुजाहिदीनचा मानू उर्फ तहसीन याने उत्तर प्रदेशात झालेल्या मुजफ्फरमधल्या धार्मिक दंगलीचा सूड उगवायसाठी या स्फोटांचा कट झारखंडची राजधानी रांचीमध्ये रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला आणि देशभर स्फोट घडवणारा यासिन भटकळचा सहकारी असलेल्या तहसीनला पकडायसाठी पोलिसांनी देशव्यापी शोध मोहीम सुरू ठेवलेली असतानाच, त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. पोलिसांना चकवून तहसीनने रांचीत सहा ते आठ सहकाऱ्यांच्या मदतीने मोदींच्या सभेच्या आधी आणि सभा सुरू असताना बॉंबस्फोट घडवायचा कट रचल्याची कबुली, पोलिसांनी पकडलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी दिल्यामुळे, पोलिसांनी राज्यव्यापी छापेमारी सुरू केली. प्रेशर कुकरसह अडीच किलो वजनाची स्फोटके पोलिसांनी या छाप्यात जप्त केली असल्याने, या स्फोटांच्या कटाचे भयानक स्वरूप चव्हाट्यावर आले आहे.
सरकारला आव्हान
राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सध्या सुरू आहे. या प्रचंड गर्दीतच घातपात घडवून पुन्हा धार्मिक दंगलींना चिथावणी द्यायचा व्यापक कट पाकिस्तानच्या चिथावणीने इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी रचला असावा, या संशयाला बळकटी येते. निवडणुकीच्या प्रचाराच्या बंदोबस्तात आणि नेत्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांना-गुप्तचर यंत्रणांना गाफिल ठेवून शक्तिशाली बॉंबस्फोट घडवायचे, दहशत निर्माण करायची असा कटच दहशतवाद्यांनी रचला असावा, अशी शंका घ्यायला पाटण्यातल्या साखळी बॉंबस्फोटाने नक्कीच जागा आहे. मुजफ्फरनगर मधल्या धार्मिक दंगलींना राजकीय रंग फासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर प्रचंड चिखलफेक सुरू केली असतानाच, केंद्र आणि राज्य सरकारांना आव्हान द्यायचे धाडस दहशतवाद्यांना झाले, ते पाकिस्तानच्या सक्रिय चिथावणीनेच! पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि मोदी यांनी देशवासीयांनी शांतता राखावी, दहशतवाद्यांचे डावपेच उधळून लावावेत, सामाजिक एकता कायम ठेवावी, असे केलेले आवाहन राष्ट्रीय एकतेसाठी महत्त्वाचे ठरते. सत्ता आणि राजकारण बाजूला ठेवून पाकिस्तानची कटकारस्थाने मोडून काढायसाठी, दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचायसाठी सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी एकजुटीने दहशतवाद्यांचा सामना केल्याशिवाय पर्याय नाही. बिहारमधल्या सरकारमधून भारतीय जनता पक्ष बाहेर पडल्यानंतरच असे स्फोट सुरू झाले, अशी शंका व्यक्त करणाऱ्या राजकारण्यांची डोकी तपासून पहायला हवीत. पाटण्यातल्या मोदींच्या सभेआधी बॉँबस्फोट झाले, तशाच घटना अन्य राजकीय पक्षांच्या जाहीर सभा आणि पक्षांच्या मेळाव्यातूनही घडू शकतात, याचे भान या घटनेचे राजकीय भांडवल करणाऱ्या स्वार्थांध राजकारण्याता नसावे, ही दुर्दैवाची बाब होय. मुझफ्फरनगरमधल्या दंगलींचे खापर त्या राज्यातल्या सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या सरकारवर फोडण्यात सारेच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. धर्मांध शक्तींनीच त्या दंगलीसाठी तिथल्या धार्मिक एकतेला सुरुंग लावून धार्मिक चिथावणी दिली. दंगल उसळल्यावरही तिथल्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारने तातडीने दंगलखोरांवर कारवाई केली नाही. परिणामी दंगलीचा वणवा शेजारच्या जिह्यातही पेटला. शंभर निरपराध्यांचे हकनाक बळी गेले. 50 हजार लोक बेघर झाले. त्या दंगलींचे चटके त्या भागातल्या जनतेला अद्यापही बसत आहेत. सत्तेपेक्षाही राष्ट्र आणि सामाजिक एकता सर्वाधिक महत्त्वाची आहे, याचे भान ठेवून निवडणुकीच्या प्रचारातही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भाषेवर संयम ठेवायला हवा. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला देशात अशांतता निर्माण करायची संधी मिळेल, असे वातावरणही होऊ नये, याची काळजी जनतेनेही घ्यायला हवी. जनतेनेही जागरूकपणे या अशा हिंसक कारवायांच्या धोक्यापासून सातत्याने सावध राहायलाच हवे. धर्मांध दहशतवाद्यांचे हे आव्हान केंद्र किंवा राज्य सरकारपुरतेच मर्यादित नाही, ते सर्व भारतीयांना दिले गेलेले आव्हान आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment