SUPPLYING ELECTRICITY TO BANGLADESH
बांगलादेशचा पुळका कशासाठी?
ससध्या देशात सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीत एका अतिशय महत्त्वाच्या घटनेकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. ही घटना आहे,
भारताने बांगलादेशला ५०० मेगावॅट वीज पुरविण्याची. आपल्या देशात आजही हजारो खेडी भारनियमनाने त्रस्त झाली असताना, स्वत: पंतप्रधान कार्यालयात वीज नसल्यामुळे जनरेटरवर काम भागविले जात असताना, बांगलादेशचा भारताला एवढा पुळका येण्याची काय गरज होती?
आज ५०० मेगावॅट विजेचा पुरवठा सुरूही झाला आहे. भविष्यात हा आकडा एक हजार मेगावॅटवर नेण्यात येणार आहे. म्हणजे, ‘घरची म्हणते देवा देवा आणि शेजारणीला चोळी शिवा’ असलाच हा प्रकार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेश हा काही भारताचा मित्रदेश नाही.
बांगलादेशातून आतापर्यंत सुमारे तीन कोटी लोक अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात आले. आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये हे बांगलादेशी लोक घुसखोरी करून भारताच्या छातीवर बसले आहेत.
यासाठी आसामात मोठे आंदोलन झाले. सर्व विद्यार्थी संघटना रस्त्यावर आल्या. हजारो लोकांचे रक्त सांडले. कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. विद्यार्थ्यांचे सरकार आले. तरीही हा प्रश्नक सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून सर्व अवैध लोकांना बाहेर काढावे, असा आदेश दिला. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. उलट, या घुसखोरांना रेशनकार्ड, राहण्यासाठी जागा, नागरिकत्व बहाल करण्यात आले. नंतरच्या काळात याच बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने तेथे कॉंग्रेसने सरकार स्थापन केले.
आज आसामात सुमारे ५० मतदारसंघांत तेथील मूळ रहिवासी हे अल्पसंख्येत आले आहेत. तेथील सरकार बदलण्याची ताकद या घुसखोरांमध्ये आली आहे आणि काही मुस्लिम विघटनवादी नेते त्यांना मदत करीत आहेत.
ही वस्तुस्थिती लपलेली नाही. कदाचित, याची भेट म्हणून भारताने बांगलादेशला वीज पुरविण्याचा निर्णय घेतला आहे का? याचे उत्तर या वीज प्रकल्पाचे उद्घाटन करणारे भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला दिले पाहिजे. केवळ बांगलादेशच नव्हे, तर पाकिस्तानातही विजेचा प्रचंड तुटवडा आहे. नापाक पाकिस्तान हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. तरीही भारत पाकिस्तानलाही वीज पुरविण्याच्या विचारात आहे. बांगलादेशचा इतिहास सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाला विचारा. भारताच्या बारा जवानांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्याचे नापाक कृत्य याच बांगलादेशने केले होते. घुसखोरांना प्रतिबंध केल्याचा हा परिणाम होता. अशा कुठल्याही बाबींकडे लक्ष न देता, शत्रूंना मदत करण्याची खुमखुमी कॉंग्रेस पक्षाला का आहे, हे कळायला मार्ग नाही. येणार्या काळात मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकीचा लाभ उपटण्यासाठी देशाचे हित खुंटीला टांगण्याचा कॉंग्रेसचा हा विचार निंदनीय तर आहेच, पण देशासाठी अतिशय घातक आहे.
तथाकथित धर्मनिरपेक्ष संघटना, लेखक याबाबत काहीही आवाज का उठवत नाहीत? फक्त त्यांना ‘मोदीज्वरा’ने तेवढे ग्रासले आहे! कारण, त्याच्या मोबदल्यात त्यांच्या संस्थांना मोठ्या रकमा मिळतात. विदेशदौरे फुकटात करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळेच हे लोक कॉंग्रेसच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत, हेही आता लपून राहिलेले नाही. भारत, बांगलादेशला वीज देण्यासाठी आपल्या नॅशनल ग्रीडमधून वीज ओढणार आहे. गरज भासली तर बाजारातून वीज खरेदी करून बांगलादेशला खूष ठेवणार आहे. केवळ मुस्लिम मतांसाठी आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याच्या नादात, भारताचे आणखी तुकडे करण्याच्या नापाक प्रयत्नांना स्वत: भारतच खतपाणी घालत आहे. कॉंग्रेसचे हे कृत्य बरे की वाईट, याचा निर्णय आता जनतेलाच घ्यायचा आहे.
No comments:
Post a Comment