Total Pageviews

Wednesday, 6 July 2011

THOUSANDS OF CRORES TRESURE FOUND IN TEMPLE

पद्मनाभस्वामी मंदिरात कुबेराचा खजिना
ऐक्य समूह
Tuesday, July 05, 2011 AT 11:04 PM (IST)
Tags: lolak
तिरुपतीचे श्री बालाजी मंदिर आतापर्यंत देशात सर्वात श्रीमंत होते, पण आता मात्र केरळची राजधानी थिरुअनंतपुरम शहरातल्या प्राचीन श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सापडलेल्या लाखो कोटी रुपयांच्या प्र्रचंड संपत्तीने, हे मंदिर सर्वात श्रीमंत ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या मंदिराच्या गर्भगृहात वीस फूट खोलवर असलेल्या तळघरातील सहा पैकी पाच खोल्या उघडल्या गेल्या. एकेका खोलीत सापडलेली अगणित संपत्ती पाहून, मोजणी करणाऱ्या पथकाचे डोळेही अक्षरश: दिपून गेले. या पाच खोल्यात टनावारी सोन्याची मोठी भांडी, सोन्याचे रत्नजडित मुकुट, अडीच किलो वजनाचे हिरेजडीत, पंधरा फूट लांबीचे सोन्याचे हार व हत्ती, चार फूट उंचीची सोन्याची हिरेजडीत शेषशाही विष्णूची मूर्ती, सोन्याची हजारो नाणी, पोत्यात भरून ठेवलेले हिरे, माणके, मोती असा अफाट खजिना सापडला. या खजिन्याची मोजदाद अद्यापही संपलेली नाही. 28 जून रोजी या खोल्या कडक बंदोबस्तात उघडल्या गेल्या, तेव्हा अशी कुबेरला लाजवील अशी संपत्ती दडवलेली असेल, असे चौकशी पथकालाही वाटले नव्हते. चौकशी पथकाच्या सदस्यांनी प्रत्येक वस्तूची नोंद करून तिची मोजदाद सुरु केल्यावर हे पथकही थकून गेले.
तळघरातल्या या खोल्यात सापडलेल्या सोने, हिरे, माणके, मोती या संपत्तीची सध्याच्या बाजारभावाने असलेली किंमत लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज असला तरी, या सर्व वस्तू प्राचीन काळातल्या असल्यामुळे त्यांची किंमत अब्जावधी कोटी रुपयांच्या
आसपास असल्याचे पुरातत्व खात्याच्या तज्ञांचे म्हणणे आहे.
बंद असलेली सहावी खोली मोजदाद पथकाने मंगळवारी उघडायचा प्रयत्न केला. खोलीच्या भिंतीचे दगड बाजूला केले. पण, त्या खोलीला लोखंडाचा भक्कम दरवाजा असल्यामुळे ती उघडता आली नाही. त्या दरवाजावरच पूर्ण सर्पाची प्रतिमाही असल्याने, ती उघडू नये, असेही मत धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केले. ही खोली  शुक्रवारी उघडली जाईल. श्री पद्मनाभाच्या अफाट  खजिन्यातील अमूल्य रत्ने, दागिन्यांची पूर्ण नोंद करायलाच महिना-दोन महिने लागतील. ही संपूर्ण यादी सर्वोच्च न्यायालयात सादर होईल, तेव्हाच श्री पद्मनाभ मंदिराची संपत्ती नेमकी किती, हे देशाला कळेल.
सहाव्या शतकातल्या शेषशाई श्री विष्णू मंदिराचा त्रावणकोरच्या मार्तंड वर्मा या राजाने सोळाव्या शतकात जीर्णोध्दार केला. अपूर्व शिल्पकला असलेले हे मंदिर प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या वैभवाचा हेवाही आहे. त्रावणकोरचे राजघराणेच या मंदिराचे व्यवस्थापन परंपरेने करीत असे. स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतात विलीन झाले. विलिनीकरणाच्या करारात हे
मंदिर आणि त्याचे व्यवस्थापन त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच राहिले. या माजी संस्थानिकांनी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट स्थापन करून परंपरेने श्री पद्मनाभाची पूजा/अर्चा, धार्मिक कार्यक्रम सोहळे सुरु ठेवले. या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष उथ्थरामन थिरुमन मार्तंड श्री पद्मनाभ स्वामींची सेवा करणे हा आपल्या राजघराण्याचा प्राचीन काळापासूनचा हक्क असल्याचा दावा करून, मंदिराचे व्यवस्थापन राज्य सरकारकडे द्यायला केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 1884 नंतर या मंदिरातील तळघरातल्या गुप्त खोल्या उघडल्याच गेल्या नव्हत्या. मंदिरातील या प्रचंड संपत्तीची सुरक्षा करण्यास मंदिराचे व्यवस्थापन समर्थ नसल्याने, मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी जनहित याचिका टी. पी. सुंदरराजन यांनी उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयानेही ती मान्य करून राज्य सरकारला तसे आदेशही दिले होते. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच असल्यामुळे, श्री पद्मनाभ मंदिराच्या अफाट खजिन्याच्या मालकी हक्काचा निकाल लागेल.
त्रावणकोरच्या राजघराण्याने दागदागिने, रत्ने, सोने, माणिक, हिरे अशी अमूल्य संपत्ती वेळोवेळी श्री भगवान पद्मनाभ देवतेला अर्पण करायचा पायंडा कटाक्षाने पाळला. त्यामुळे या राजघराण्याकडे व्यक्तिगत मालकीचा खजिना फारच थोडा राहिला. ब्रिटिश कारकिर्दीत हा अमूल्य खजिना तळघरातल्या खोल्यात दडवला गेला. राजघराण्याने श्री पद्मनाभाच्या संपत्तीतील एक पैसाही स्वत:च्या वापरासाठी कधी वापरला नाही. त्याचा मोहही धरला नाही. त्यामुळे ही सारी अमाप संपत्ती श्री पद्मनाभाचीच आहे आणि ती त्याचीच राहावी, या पलिकडे आपली काहीही इच्छा नसल्याचा खुलासा त्रावणकोर राजघराण्याच्या वारसदारांनी जाहीरपणे केला. मुख्यमंत्री ओम्मान चंडी यांनीही हा खजिना
पूर्ववत मंदिराच्या तळघरातच ठेवला जाईल
आणि सरकार त्याची सुरक्षा करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment