Total Pageviews

Tuesday, 7 June 2011

editorial maha times

काँग्रेसचे भ्रमिष्ट
 सत्तरीच्या दशकात इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या संघटनेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि कम्युनिस्ट सहप्रवाशांना पक्षात सामील करून घेतले, तेव्हा देशातील विरोधी पक्षांच्या कोणत्याही आंदोलनामागे 'परकीय हात' असल्याचा शोध लावला जात असे. आता सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या नेत्यांना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'चा मुखवटा विरोधी सूर लावणाऱ्या कोणत्याही नेत्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे!
बाबा रामदेव यांचा स्वतंत्र 'पंथ' आहे आणि त्याच्या नावाने हजारो कोटींचा त्यांचा व्यवसायही आहे. रामदेव यांना गुरू मानणारा मोठा वर्ग आहे आणि तो पद्धतशीरपणे बांधला गेला आहे. त्यांची ही संघटनात्मक ताकद काँगेस देशातील अन्य सेक्युलर राजकीय प्रवाहांपासून तोडण्यात भाजपपरिवाराला रस असणे साहजिक आहे. त्यामुळे काळ्या पैशाचे निमित्त करीत आपली ताकद दाखवून देण्यासाठी बाबा रामदेव यांनी दिल्लीत तथाकथित उपोषणाचा घाट घातल्यानंतर, त्यात कट्टरवादी हिंदुत्ववाद्यांचे अनेक गट जाणूनबुजून उतरले.
अण्णा हजारे आणि त्यांच्यासोबतच्या नागरी समाजाच्या प्रतिनिधींत प्रामुख्याने उदारमतवादी लोकशाही शक्तींचा समावेश होता. त्यापैकी अनेक गट हे बिगरराजकीय अभिजनांचे असले, तरी धामिर्क कट्टरवाद्यांशी जोडले गेलेले त्यात कोणी नव्हते. भारतीय जनता पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला असला, तरी आंदोलनाचे नियंत्रण नि:संशयपणे भाजपपरिवाराकडे नव्हते. त्यामुळे बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांना एकाच मापाने मोजणे आणि दोघांनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुखवटा ठरवणे, हे मानसिक तोल ढळल्याचेच लक्षण आहे. रामदेव यांची विचारसरणी आणि कार्यपद्धती देशातील पुराणमतवादी धामिर्क शक्तींना जवळची जरूर आहे, पण रामदेव हे स्वयंभू असल्यामुळे संघ त्यांचे नियंत्रण करू शकत नाही. मात्र तसा आभास निर्माण करण्यास भ्रमिष्ट झालेले काँग्रेसी नेते हातभार लावीत असतील, तर त्याचे संघपरिवारच नव्हे, भाजपही आनंदाने स्वागतच करील! राजघाटावर त्याचे प्रत्यंतर आलेच! रामदेव यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी केंद सरकारने मध्यरात्री पोलिसी बळाचा वापर केल्यानंतर, देशातील सर्वच काँग्रेसेतर पक्ष संघटनांनी लोकशाही हक्काच्या या गळचेपीचा निषेध केला असला, तरी राजघाटावर देशभक्तीपर गाण्यांवर नाच करून लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज. पंतप्रधानपदाच्या स्वप्नांनी त्यांना इतके बेभान केले काय, हे कळायला मार्ग नाही. अर्थात बाबा रामदेव यांना मात्र राजघाटावरच्या नाच्यांच्या पाठिंब्याने धीर आला आहे असे दिसत नाही. त्यांनी हरिद्वार येथे वार्ताहर बैठकांचे सत्र सुरू ठेवून बेफाम आरोप चालू ठेवले असले, तरी त्याचवेळी माघारीचे मार्गही शोधण्यास सुरुवात केलेली दिसते. पंतप्रधानांविषयी आदरभाव व्यक्त करणे, सरकारला माफ करीत असल्याचे जाहीर करणे, यातून ते निश्चितच तडजोडीचे संकेत देऊ पाहत आहेत.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी रामदेव यांच्यावर शाब्दिक हल्ला चालू ठेवला असतानाच, रामदेव यांच्या विविध आथिर्क तसेच अन्य व्यवहारांच्या चौकशीच्या बातम्या पेरून काँग्रेसी मंत्र्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. बाबांचे उजवे हात म्हणून या आंदोलनाच्या वाटाघाटीत सहभागी असलेले आचार्य बाळकृष्ण हे नेपाळी असून, त्या देशात गुन्हा करून येथे पळून आले आहेत, असा आरोप केला जात आहे. हे बाळकृष्ण पोलिसी कारवाईनंतर गायब आहेत आणि बाबाही त्यांच्या ठावठिकाण्याविषयी मुग्धता पाळून आहेत. रूरकी येथे सुमारे तीन हेक्टर जमीन बाबांच्या पातंजली योग पीठाने हडप केल्याचा अहवाल तेथील जिल्हादंडाधिकाऱ्याने दिला आहे, असेही वृत्त आहे. काळ्या पैशांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे आथिर्क व्यवहार पारदर्शक आणि शुद्ध असावेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने दबावतंत्राचा भाग म्हणून कारवाई सुरू केली, तरी बाबा रामदेव त्यांच्या समर्थकांनी याचे स्वागतच केले पाहिजे.
अण्णा हजारे यांच्यावर असेच आरोप केले गेले, तेव्हा त्यांनी हे आव्हान स्वीकारले होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. रामदेव यांच्यावरील पोलिस कारवाईमुळे अण्णा हजारे त्यांचे सहकारी यांना सरकारशी असहकाराची भूमिका घ्यावी लागेल आणि लोकपाल विधेयकासाठी नेमलेली संयुक्त समिती आपोआपच गुंडाळली जाईल, हा सरकारचा डाव सोमवारी यशस्वी झाला असला, तरी पुढच्या बैठकांना आपण हजर राहणार असल्याची भूमिका घेऊन नागरी समाजाच्या सदस्यांनी हा डाव उलटवला आहे. विधेयकाच्या चचेर्चे थेट प्रक्षेपण करावे यासारख्या नव्या अटी टाकून सरकारला ही प्रक्रिया गुंडाळण्याची संधी हजारे त्यांच्या सहकाऱ्यांनी देऊ नये, अशीच लोकांची अपेक्षा राहील. रामदेव बाबांचे उपोषण मोडून काढण्यासाठी केलेला प्रयोग, अण्णा बुधवारी करीत असलेल्या उपोषणाच्या वेळीही करण्याचे धाडस काँग्रेसी मंत्र्यांनी दाखविले, तर 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असेच म्हणावे लागेल

No comments:

Post a Comment