तिबेटी स्वातंत्र्याला तोंडदेखली सहानुभूती
हेमंत महाजन
स्वतंत्र तिबेटची मागणी सुरवातीपासून करणारे दलाई लामा आता स्वायत्त तिबेटच्या मागणीचा आग्रह धरताना दिसत आहेत. तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्याला जगाची तोंडदेखली सहानुभूती आहे. चीनशी वैर कोणाला परवडणारे नाही.
कर्मपा लामा प्रकरणाची चर्चा अद्याप संपलेली नसतानाच तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामांनी राजकीय नेतृत्वातून निवृत्त होण्याची घोषणा करून मोठाच धक्का दिला. नेता हवाहवासा वाटताना त्या नेत्याने निवृत्त व्हावे, हे खरोखरच धक्कादायक ठरू शकते. सर्वाधिक आदरणीय, धार्मिक, आध्यात्मिक नेते हे दलाई लामांबद्दलचे जागतिक स्तरावरील मत आहे.
आपण राजकारणातून मुक्त होत असल्याची घोषणा करून तिबेटी जनतेचे नेते दलाई लामा यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. 1950 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी तिबेटचे राजप्रमुख व धर्मप्रमुख म्हणून ल्हासाच्या गादीवर आलेले दलाई लामा 1959 मध्ये भारताच्या आश्रयाला आले. त्याआधी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने 1949 मध्येच तिबेटचा ताबा घेतला होता. त्या प्रदेशावर आपली पाशवी हुकूमत लादायला त्यांना दहा वर्षे वाट पाहावी लागली. ती अशी लादली जाताच दलाई लामा आपल्या शेकडो अनुयायांसह गुप्तपणे भारतात आले. तेव्हापासून हिमाचल प्रदेशातील धरमशाला या शहराच्या मॅकलिओडगंज या छोट्याशा कोपऱ्यात ते व त्यांचे अनुयायी तिबेटचे अनिवासी सरकार चालवितात. त्यांना भारताची मदत व संरक्षणही आहे. गेली 60 वर्षे दलाई लामा व त्यांचे हे सरकार चीनविरुद्ध पत्रके काढणे आणि मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली कैफियत मांडणे, या गोष्टी करताना दिसले.
दरम्यान, चिनी सरकारने तिबेटी जनतेचा उरलासुरला संघर्ष व विरोध अतिशय क्रूरपणे मोडून नाहीसा केला. या संघर्षाच्या बाजूने जगात सहानुभूतीच्या साध्या लाटेपलीकडे काहीएक उमटलेले कधी दिसले नाही. चीन हा फार झपाट्याने महाशक्ती बनलेला देश आहे. त्याच्याशी वैर करणे लष्करी वा आर्थिक अशा कोणत्याही दृष्टीने जगाला परवडणारे नव्हते. चीनशी जुळवून घ्यायचे आणि तिबेटी स्वातंत्र्याला तोंडदेखली सहानुभूती दाखवायची, असा दुटप्पीपणा करण्याखेरीज पाश्चात्त्य लोकशाह्यांनीही काही केले नाही. दलाई लामांनी धर्मसत्ताक परंपरा मोडीत काढून प्रजासत्ताक तिबेट अस्तित्वात आणण्यासाठी अज्ञातवासातील सरकारात संसदीय पद्धती लागू केली. तिबेटच्या त्या ऐतिहासिक उठावाच्या बावन्नाव्या स्मृतिदिनानिमित्ताने दलाई लामांनी राजकीय सत्ताधीशपद सोडत असल्याची घोषणा केली. इजिप्त आणि येमेनमधील लोकक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ती करण्यात असली तरी दलाई लामांचा हा सत्तात्याग अनेक बाबतींत वेगळा आहे. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्थलांतरित तिबेटींनी गेली पन्नास वर्षे लढा दिला, तरी तो दिवसेंदिवस निरर्थक ठरतो आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी तिबेटवरील चीनचा हक्क मान्य केला आहे. चीननेही तिबेटला स्वायत्त प्रदेशाचा दर्जा देऊन त्यावरील आपली पकड भक्कम केली आहे. हे वास्तव खुद्द दलाई लामांनीही मनोमन मान्य केले. तिबेटला कागदोपत्री स्वायत्तता नको, तर ते खरेखुरे स्वायत्त असावे, अशी त्यांची मागणी आहे.
"दलाई लामा' म्हणजे बुद्धीचा सागर. धर्मगुरू म्हणून त्यांचे सर्वोच्च स्थान तिबेटी बौद्धांनी आदरपूर्वक मान्य केलेले आहे. यापुढेही त्यांचे ते स्थान अढळ राहील. शिवाय संसद बरखास्त करणे, अधिवेशन बोलावणे, निवडणूक आयुक्त- सरन्यायाधीश- महालेखापाल अशा महत्त्वाच्या नेमणुका करणे, हे अधिकार साधारणतः अध्यक्षपदाप्रमाणे दलाई लामांकडे राहतील; पण तिबेटसंदर्भात जागतिक पातळीवरील भेटीगाठी- वाटाघाटी, तसेच मुख्यतः चीनबरोबरच्या चर्चेची सूत्रे यापुढे दलाई लामांऐवजी नव्या पंतप्रधानांकडे जातील. दलाई लामांचे राजकीय प्रमुखपद मान्यच न करणारा चीन हे "सत्तांतर' स्वीकारून तिबेटचा प्रश्न सोडविण्यासाठी तयार होणार का?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दलाई लामा यांची घोषणा म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष मुख्य विषयावरून वळविण्यासाठीची क्लृप्ती आहे, अशी टीका केली आहे.
सुरवातीपासून स्वतंत्र तिबेट मागणीचा जोर धरणारे दलाई लामा हे स्वायत्त तिबेटच्या मागणीचा आग्रह धरताना दिसत आहेत. वारंवार बदललेल्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिबेटी जनतादेखील काहीशी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काहींनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी त्यांच्या विरोधात सूर काढला आहे.
तिबेटी जनतेकडे आज सैन्य नाही, शस्त्रे नाहीत, त्यांच्या संस्कृती, भाषा, धर्ममत, त्यांचा निसर्ग या सर्वांवर चीनचे आक्रमण होत आहे. त्यांच्यापाशी आज स्वतःचा देश म्हणून तिबेटही राहिलेला नाही. अनेक कारणांनी विद्यमान दलाई लामा हे तिबेटच्या इतिहासात आज आणि भविष्यातही सर्वांत महत्त्वाची भूमिका व अत्यंत कठीण उत्तरदायित्व पाळणारे दलाई लामा म्हणून स्थान मिळविणार आहेत, हीदेखील तिबेटींची श्रद्धा आहे. कदाचित भविष्यात दलाई लामा हे पद नसेल, तिबेटमध्ये एक दलाई व परदेशात एक दलाई अशी दोन पदे असतल. या शक्यता गृहीत धरून तिबेटींनी लोकशाही मार्गाने स्वातंत्र्यलढा पुढे न्यायचा आहे
No comments:
Post a Comment