Total Pageviews

Sunday, 13 March 2011

NATIONAL SECURITY

जनतेसाठी काम करणारे चांगले प्रशासकीय अधिकारी हवेत "
नक्षलवाद्यांपुढे लोटांगण
अनेक राजकीय नेते नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती दाखवतात आणि त्यांच्यावरील कारवाईला विरोध करतात. देशातील बुद्धिजीवी वर्गातही अशीच भावना असल्याचे दिसते. ओदिशातही याचेच प्रत्यंतर मिळाले.गेल्या दशकभरापासून देशात दहशतवादी हल्ल्यांबरोबरच नक्षलवादी कारवायांचाही धोका वाढला आहे. आंध्र प्रदेशासह पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये नक्षलवाद्यांनी भू-सुरूंगाचा स्फोट घडवणे, रेल्वेरूळ उडवून देणे, प्रशासकीय कार्यालयांवर हल्ले करणे, बंद पुकारणे यासारखे हिंसक प्रकार अवलंबून प्रशासनाला जेरीस आणले आहे. प्रशासकीय अधिक-यांचे अपहरण करून आपल्याला हव्या असलेल्या मागण्या मान्य करून घेण्याचे तंत्र नक्षलवाद्यांनी सुरू केले आहे. ओदिशामधील मलकानगिरीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा आणि कनिष्ठ अभियंता पवित्र माझी यांचे अपहरण हे या तंत्राचेच एक उदाहरण आहे.
ओदिशातील चित्राकोंडा येथे प्रशासकीय कामासाठी गेले असताना कृष्णा आणि माझी यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. या दोघा अधिका-यांच्या सुटकेसाठी प्रशासनाने पकडलेल्या काही नक्षलवाद्यांची सुटका करण्याबरोबरच अन्य 14 मागण्या नक्षलवाद्यांनी केल्या होत्या. या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी आठवडाभर ओदिशातील प्रशासकीय यंत्रणेला जेरीस आणले होते. सध्या तुरुंगात असलेला नक्षलवादी म्होरक्या श्रीरामलू श्रीनावासुलू याच्यासह 12 नक्षलवाद्यांना जामीन मिळावा, ही नक्षलवाद्यांची प्रमुख मागणी होती. नक्षलवाद्यांनीच सुचवलेल्या तीन मध्यस्थांनी ओदिशा सरकार आणि तुरुंगातील नक्षलवादी नेत्यांशी चर्चा केली. अखेर अपहृत अधिका-यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य करत ओदिशा सरकारने सपशेल लोटांगण घातले.
नक्षलवाद्यांसमोर नतमस्तक
ओदिशा सरकारने अपहृत अधिका-यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्यांच्यासमोर नतमस्तक होणे गरजेचे नव्हते. नक्षलविरोधी कारवाई काही काळासाठी थांबवल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांची यादी वाढवली. यातूनच ते केंद्र राज्य सरकारांवर दबाव आणण्यास सक्षम असल्याचे दिसून येते. सरकारी अधिका-यांचे अपहरण करून नक्षलवादी आपल्या हव्या असलेल्या मागण्या मान्य करून घेतात. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने कठोर पाउले उचलणे गरजेचे आहे
'कृष्णा लोकप्रिय

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा यांची अखेर माओवाद्यांनी सुटका केली. कृष्णा हे 2005 च्या तुकडीचे "आयएएस' अधिकारी. 'कृष्णाच्या इच्छाशक्तीमुळे मलकनगिरीचा भाग बदलू लागला होता. माओवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती. आर. व्ही. कृष्णाची लोकप्रियता त्यांना सलत होती. त्यासाठीच त्याचे अपहरण झाले. अर्थात, अशा घटनांमुळे घाबरून जाणाऱ्यांतील तो नाही. त्यामुळे सुटकेनंतर तो पुन्हा आपल्या कामाशी पूर्णपणे समरस होऊन काम करेल, यात शंका नाही.
तरुण कार्यक्षम अधिकाऱ्यांना ओरिसा सरकारने अशा जिल्ह्यांत पाठविले आहे. त्यामुळे या भागातील प्रशासन जनतेपर्यंत पोचू लागले आहे. यात कृष्णाने त्याच्या स्वभावाप्रमाणे आघाडी घेतली. थेट जनतेत जाऊन काम करण्याची त्याची हातोटी आहे. त्यामुळे त्याचा संपर्कही चांगला आहे. आपल्या भागातील समस्यांवर तातडीने मार्ग निघण्यासाठी तो फार आग्रही असतो. वेळ पडली तर थेट मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्र्यांशीही तो बोलून समस्या सोडविण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. कामातील पारदर्शकतेवर त्याचा भर आहे. ग्रामसभांत जाणे, आदिवासींशी संवाद साधणे, त्यांच्यासाठीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना कार्यक्षमपणे राबविणे, यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी करणे, यासाठी त्याने प्राधान्य दिले होते. या भागात रस्त्याचे जाळे नसणे, ही मोठीच समस्या आहे. त्यावर त्याने चांगले काम केले आहे. आदिवासीबहुल जिल्हा असूनही कुपोषणाची समस्या येथे नाही. सरकारबद्दल आदिवासींमध्ये विश्‍वास वाढला आहे. यामुळेच नक्षलवाद्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे अपहरण केले आणि या विश्‍वासाला तडा जाण्यासाठी प्रयत्न केले.जिल्हाधिकारी पदाचा कुठलाही बडेजाव दाखवता कृष्णा दुर्गम भागात चक्क मोटारसायकलवरून जात असत.
विकास रोखणे हेच नक्षलवाद्यांचे उद्दिष्ट
 नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी कायदा सुव्यवस्थेसोबत विकासाचा अजेंडा समोर नेणे गरजेचे आहे. यासाठी या भागातले प्रशासन प्रभावीपणे काम करणारे हवे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नक्षलवादग्रस्त भागांतील प्रशासन ठप्प पडण्याचा त्याचा परिणाम विकासप्रक्रियेवर होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भाचा विचार केला तर गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात नक्षलवादी प्रभावी आहेत. या दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा आहे. इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र जीव धोक्यात घालून फिरावेच लागते. मध्यंतरी राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना आश्रमशाळांची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. गडचिरोली गोंदियातील अधिकाऱ्यांनी सुरक्षा घेताच ही पाहणी केली. नक्षलवाद्यांनी या अधिकाऱ्यांना काही केले नाही म्हणून या दौऱ्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ देत नाहीत. निवडणूक विभागाच्या जिल्हाधिकारी यांनी दुर्गम भागात दौरे करून स्थानिकांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घ्यायला सुरुवात केली. या कामात त्यांना मदत करणारे भामरागडचे तहसीलदार यांना अखेर नक्षलवाद्यांनी थेट धमकीच दिली. अशा अनेक घटना या भागात घडत असतात, पण त्याची वाच्यता केली जात नाही.
दुर्गम भागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली


या भागात नक्षलवाद्यांच्या प्रभावाचा बाऊ करून दुर्गम भागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा गेल्या काही वर्षांत कमालीची वाढलेली आहे. शिक्षक, तलाठी, कृषी आरोग्य सहाय्यक, डॉक्टर हे गावपातळीवर महत्त्वाचे समजले जाणारे प्रशासनाचे घटक दुर्गम भागात जातच नाहीत. नक्षलवाद्यांच्या नावाने मिळणारा प्रोत्साहनभत्ता मात्र या साऱ्यांना हवा असतो. भीतीचा बागुलबुवा निर्माण करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या या साऱ्यांचे आता ओरिसाच्या घटनेच्या निमित्ताने चांगलेच फावले आहे. ही सारी मंडळी आता दुर्गम भागाला वाऱ्यावर सोडण्यासाठी सज्ज झाली आहे. या घटनेच्या निमित्ताने काम करण्याची इच्छा असलेले नसलेले अशा दोन्ही घटकांच्या मनात निर्माण झालेली भीतीची भावना विकास कामांवर परिणाम करणारी ठरणार आहे. आधीच नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे या भागात विकास प्रक्रियेची गती मंद आहे. ती आता आणखी मंदावण्याची शक्यता जास्त आहे. नक्षलवाद्यांना नेमके तेच हवे आहे.
आपल्याला  कृष्णा सारख्या हीरोज्ची गरज आहे. आम्हाला जनतेसाठी काम करणारे केवळ चांगले प्रशासकीय अधिकारीच हवेत असे नाही. दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविणारे चांगले डॉक्टर्स हवेत, उत्तम रस्ते बांधणारे इंजिनीअर हवेत, खेडोपाडी जाऊन शिकविणारे शिक्षक हवेत, प्रामाणिक स्वयंसेवी संस्था हव्यात, सुजाण पत्रकार हवेत, उद्योजक हवेत आणि या सर्वाची सांगड घालणारे प्रगल्भ राजकीय नेतृत्व हवे. हे सर्व आपल्याकडे निश्चित आहेत. अल्पसंख्य असतील, पण आहेत. त्यांच्या पाठीशी मलकनगिरीतील आदिवासींप्रमाणे सर्वदूर समाजाने निर्धाराने उभे राहिले पाहिजे.

No comments:

Post a Comment