Total Pageviews

Wednesday, 23 March 2011

तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या जावयांना व्यवसायात प्रचंड लाभ

तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या जावयांना व्यवसायात प्रचंड लाभ हवाला रॅकेट प्रकरणातील आरोपी , कुख्यात घोड व्यापारी हसन अलीच्या स्वीस बँक आणि इतर बँकांच्या खात्यांत असलेल्या काळ्या पैशांचे मूळ मालक हे महाराष्ट्रातील वजनदार राजकीय नेते आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचा खुलासा खुद्द अलीने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिका-यांसमोर केला असल्याचे वृत्त आहे. या तपासादरम्यान अलीने महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावे घेतल्याचे वृत्त दिल्लीतील एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले.
हसन अलीच्या या धक्कादायक खुलाशानंतर तपास अधिका-यांनी युबीएस , बर्कले आणि क्रेडिट स्वीस या आंतरराष्ट्रीय बँकांच्या भारतातील प्रतिनिधींना पाचारण करून याबाबत अधिक माहिती पुरविण्यास सांगितले आहे.
तपास यंत्रणेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , भारतातील राजकीय नेत्यांकडचा कोट्यवधीचा काळा पैसा हवालाच्या माध्यमातून अली देशाबाहेर घेऊन जायचा. नंतर मॉरिशससह जगभरातल्या विविध देशांच्या बँकांमध्ये तो हा काळा पैसा स्वतःच्या नावाने जमा करायचा. त्यानंतर हाच पैसा भारतात परत आणून तो राजकीय नेत्यांच्या सुचनेनुसार विविध व्यक्तींच्या नावाने शेयर बाजारात गुंतवायचा. अनेकदा हा काळा पैसा राजकीय नेत्यांचे सखे-सोबती किंवा कुटुंबियांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये थेट परदेशी गुंतवणूक म्हणून गुंतवला जात असे , अशी माहिती सूत्रांनी दिली.

'
१९९० आणि २००० च्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला जात असे. या पैशांचे स्त्रोत शोधणं कठीण होतं. सेबीकडे नोंदणी करण्याची झंझट नको म्हणून अली हा मोठ्या चलाखीनं पार्टिसिपेटरी नोट्स तयार करून थेट शेयर बाजारात पैसे गुंतवायचा. यापैकी काही प्रमाणात पैसा हा राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवला जात असे .
पैसा गुंतवणुकीच्या अलीच्या या तंत्रामुळं महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या जावयांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड लाभ झाला असल्याचे या सूत्रांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.
कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याच्या खटल्यातील आरोपी असलेला हसन अली याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर , गुरुवारी रात्री तो सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिका-यांसमोर शरण आला होता.

No comments:

Post a Comment