केवळ
शस्त्रास्त्रे युद्ध जिंकत नसतात,
तर त्याहून नैतिक धैर्य व
सत्याचे अधिष्ठान असावे लागते. भारत-पाक युद्धानंतर सापडलेल्या एका पाकिस्तानी
लष्करी अधिकार्याच्या रोजनिशीतील ही नोंद अतिशय बोलकी आहे. ‘राजकारणात
पडझड होताच इस्लाम खतरे में हैं । अशी आवई उठवून राष्ट्राला हिंदुस्थान विरुद्ध
जिहाद पुकारून झुंजावत ठेवणे हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा खेळच होऊन बसला आहे.
हिंदुस्थानी सैन्याचा बागुलबुवा उभा करून मिळेल तेवढे अमेरिकेसारख्या व इतर
राष्ट्रांकडून सैनिकी मदत लाटणे,
हा पाकिस्तानी कावा आहे.
गोबेल्स थाटाचा प्रचार करून भारताला मुस्लिम राष्ट्रांच्या मैत्रीपासून तोडणे हा
पाकिस्तानचा आवडता छंद. जिहाद पुकारून पाकिस्तानने भारताविरुद्ध स्वातंत्र्योत्तर
काळात तीन युद्धे लादली व सपाटून मार खाल्ला तरीही ‘लढते रहेंगे।’ ही
पोकळ गर्जना काही बंद होत नाही. आजही पश्चिम सीमा पेटलेलीच आहे.’
काळ
बघता-बघता निघून गेला. भारतीय उपखंडामध्ये ‘बांगलादेश’ हे एक
नवीन राष्ट्र उदयास येऊन भारतीय सैन्याने इतिहास घडविला त्याला 45 वर्षे
झाली. परंतु, आजही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना मनापासून या
उपखंडात शांतता नांदावी, असे मुळीच वाटत नाही. म्हणूनच प्रश्न पडतो की, हिंदुस्थानी
फौजा पूर्व व पश्चिम तथा दोन्हीही आघाड्यांवर विजयी आगेकूच करत असतानाच इंदिरा
गांधींनी एकतर्फी युद्धबंदी का केली?
7 डिसेंबर 1970 रोजी
पाकिस्तानमध्ये प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार देऊन निवडणुका घेण्यात आल्या.
नवनिर्वाचित प्रतिनिधी राष्ट्रीय घटना तयार करणार होते. परंतु, झुल्फीकार
अली भुट्टो व जनरल याह्याखान यांचे मनसुबे धुळीला मिळवत पूर्व पाकिस्तान संपूर्णतः
आवामी लीगने काबीज केला. परंतु,
स्वातंत्र्योत्तर
काळात-स्पष्टच म्हणायचे तर फाळणीनंतर पंजाबी-पठाण यांचे पाकिस्तानात असलेले
प्रभुत्व ते एकाएकी सोडण्यास तयार नव्हते. त्यातूनच सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली
आणि पाकिस्तानची दोन शकले होणार,
हे निश्चित झाले.
संस्कृती, भाषा, आचार-विचार, संस्कार
व भौगोलिक दुरत्व यात महदांतर असताना केवळ धर्माच्या आवरणाखाली पूर्व व पश्चिम
पाकिस्तान एकरूप होऊ शकले नाही. आर्थिक, राजनैतिक, सामाजिक, लष्करी
या सर्व बाबतीत पश्चिम पाकिस्तानने पूर्व विभागावर अन्याय केल्याने विषमतेची दरी
रुंदावत गेली आणि म्हणून पूर्व पाकिस्तानी जनता या अन्यायाचा सूड उगवण्यासाठी, प्रतिकार
करण्यासाठी काया, वाचा, मनाने कटिबद्ध झाली. भारतीय उपखंडात आपल्याच धर्म बांधवांच्या विरुद्ध लढण्याचे
अग्निदिव्य बंगाली मुस्लिमांना करावे लागले. यासाठी त्यांना भारताकडेच याचना करावी
लागली. हा पाकिस्तानच्या निर्मात्यांवर काळाने उगवलेला सूड होता.
No comments:
Post a Comment